सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील भक्तीप्रेमाचे प्रसंग हे चिरकाल प्रेरणा देणारे असतात. त्या प्रसंगांचा इतका प्रभाव असतो की सद्गुरूंचं देहातून जाणं शिष्यांना सहन होत नाही. रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या शिष्यांचं हृदयच जणू भेदलं गेलं आणि वाऱ्याच्या झंझावातात पाचोळा जसा कित्येक योजनं दूर दूर उडत फेकला जावा त्याप्रमाणे हे शिष्य एकमेकांचंही भान न उरता इतस्तत: विखुरले. कित्येक महिने कुणाला कुणाचा पत्ता नव्हता! जगणंच इतकं मरणप्राय झालं होतं की मरण म्हणजे अजून काही वेगळं असतं, ही कल्पनाच उरली नव्हती. त्या धक्क्य़ातून एकेकजण सावरत गेला तेव्हा हळूहळू एकमेकांना शोधू लागला आणि एकमेकांच्या सहवासात रामकृष्णांच्या सहवासाच्या खुणा शोधत एकमेकांना पुन्हा पुन्हा भेटू लागला! पण या भेटींतही काही बोलणं होई का हो? नाही! केवळ आठवणींचा उमाळा येई आणि डोळे पाझरत. प्रत्यक्ष सहवास लाभला असताना त्याचं मोल समजतंच असं नाही. हा सहवास तुटला की मग त्याचं महत्त्व उमगू लागतं. तर अशा या आठवणी वियोगकाळात उसळून वर येतात आणि मनाच्या सरोवरात कमळाप्रमाणे उमलू लागतात. त्याचवेळी वियोगाचं भानही उफाळून वर येतं आणि शिष्याचं चित्त भावान्दोलित होत असतं. पांडुरंग बुवा यांचंच एक फार सुंदर पद आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘हीन दीन परी लेकरुं तुमचे असतां। तिळभरी नाहिं का सत्ता।। आधीं घेउनिया पदरीं मजला नाथा। दूर कां लोटितां आतां।।’’ हे सद्गुरो, मी हीन दीन आहे, पण तुमचं लेकरू आहे. मग माझा तुमच्यावर तीळभरसुद्धा हक्क नाही का? तुम्ही मला आधी पदराआड घेतलंत, म्हणजेच आधी माझ्यावर वात्सल्याचा वर्षांव केलात, मग आता मला कठोरपणे का दूर लोटता? आई दिसेनाशी होते तेव्हा लेकराच्या मनाची जी तडफड होते त्याच वेदनेचं हे दर्शन आहे. सदगुरूंच्या वियोगानं आपली जी भावविव्हल गत झाली आहे, तीच गत अन्य शिष्यांचीही झाली आहे का, असा विचारही मनाला शिवतो. मग वाटतं, या शिष्यांना सद्गुरूंचा आंतरिक संग सतत लाभत आहे आणि मी पामर मात्र त्यापासून वंचित आहे, या विचारानंच  जणू तळमळून पांडुरंग बुवा म्हणतात..

ब्रह्मानंदा काय तुम्हीं हृदयीं या चोरिलें।

आनंदसागराच्या तळिं कां हो बैसले।

गोंदावलें हेंचि काय, मज कैसें फसविलें।

महाराज कोठें माझे, पांडुरंगा दाखवा।।४।।

चैतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा।।

ब्रह्मानंद आणि आनंदसागर हे गोंदवलेकर महाराज यांचे परमशिष्य होते. त्या दोघांच्या नावांची रूपकांप्रमाणे योजना करीत पांडुरंग बुवा विचारतात की, काय हो ब्रह्मानंदा तुम्ही सद्गुरूंना तुमच्या हृदयात चोरून लपवून दडवून ठेवलं आहे काय? मग मलाही तुमच्या हृदयात प्रवेश द्या हो! की  महाराज, आनंदसागरांच्या अंतर्मनाच्या तळाशी तुम्ही स्वत:हून विराजमान झाला आहात? मग मलाही त्या भक्तीप्रेमयुक्त अथांग मनाच्या तळाशी विसावू द्या! तसं काही साधत नाही आणि ‘गोंदावले’ समजून मी या कोणत्या उजाड गावी आलो आहे हो? हे गोंदवलेच आहे, असं सांगून मला कुणीतरी फसवलं आहे. जर हे गोंदावले असेल, तर माझे महाराज, माझ्या नयनांचा विसावा मला पुन्हा दाखवा. त्यांचा तो प्रेरक, आश्वासक आणि मनाला निर्भय, निश्चिंत करणारा सहवास पुन्हा पुन्हा लाभावा, हीच एक आस आहे. ती पुरवा हो कुणीतरी!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com