साधकाच्या जडणघडणीसाठी उमदीकर महाराज पुढचं जे सूत्र सांगतात, त्याचं दडपण प्रत्येक साधकावर असतंच. ते सूत्र म्हणजे ‘विकार दूर करावेत.’ आपल्यात विकार नसावेत, असं प्रत्येक साधकाला वाटत असतंच, पण ‘विकार’ या शब्दापासूनच मनातला गोंधळ सुरू होत असतो. जन्मापासून जी विकारशरणता अंत:करणात रुजली असते, तिच्यापासून स्वबळावर सुटका करून घेणं सोपं नाही आणि शक्यही नाही, असंही अनुभवानं प्रत्येकाला जाणवत असतं. पुन्हा विकार म्हणजे कामविकार, असंच एक समीकरण मनात असल्यानं ज्या वासनेत आपला जन्म झाला आहे तीच कशी टाकता येईल, असाही स्वाभाविक प्रश्न असतो. मुळात त्याची गरज तरी आहे का, असंही वाटतं. एकूण काय, तर मनातला गोंधळ वाढतच असतो. तेव्हा विकार म्हणजे नुसता कामविकार नाही, किंबहुना कामविकाराहून इतर विकार अंतापर्यंत मनाला अधिक चिकटून असतात, हे लक्षात घेऊन आधी उमदीकर महाराज जे सांगतात त्याचं तुळपुळे आणि हरिदास यांनी केलेलं सुगम मराठीकरण पाहू. महाराज सांगतात, ‘‘अप्रामाणिकपणे द्रव्य मिळवले तर शेवटी नाश होतो. त्या द्रव्याने मदांध होऊन मनुष्याचा बुद्धीभ्रंश होतो आणि तो व्यसनाधीन होऊन द्रव्याचाही नाश करतो. शेवटी दरिद्री होतो. त्याच्या बुद्धीचा भ्रम जातच नाही. कारण तो विषयासक्तीमुळे अंध झालेला असतो. अशा पुरुषाला ध्रुतराष्ट्र म्हणावे. तो आळस आणि विषय यात सापडून नाश पावतो. अशा ध्रुतराष्ट्रास विदुरनीती म्हणजे विषय दूर करणारी नीती कितीही सांगितली तरी त्याच्या बुद्धीचा भ्रम जातच नाही. सद्गुरूकृपेने नाम मिळालेले असूनही ज्यांनी साधन करून काही अल्प प्रकाशही.. अल्प साक्षात्कारही प्राप्त करून घेतला नाही, असे नामधारक म्हणजेच ध्रुतराष्ट्र, असे म्हणण्यास काय हरकत आहे? त्यांनी अंत:करणातील विकार दूर करून नेमाने नामस्मरण करून आत्मप्रचीती मिळवली पाहिजे. त्यासाठी विदुर नीती म्हणजे वैराग्य नीतीचा अभ्यास केला पाहिजे.’’ आपण विकार अथवा वासना म्हणजे कामवासनाच मानत असतो. इथं श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाची आठवण होते. काम आणि पैसा यातलं अधिक घातक काय, असं विचारल्यावर ते म्हणाले होते की, कामवासनेपेक्षा पैसा अधिक घातक आहे. त्याचं कारणही त्यांनी फार मार्मिकपणे उलगडून दाखवलं होतं. ते म्हणाले की, कामवासना भोगण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते. तेव्हा मनात आलं म्हणून कामवासना भोगता येत नाही. पैशाचं तसं नाही. पैसा हातात असला की आपल्या मर्जीप्रमाणे तो भोगता अर्थात वापरता येतो. उमदीकर महाराज सांगतात, अप्रामाणिकपणे द्रव्य मिळवलं तर शेवटी नाश होतो! आता अप्रामाणिकपणे म्हणजे काय? तर फसवून, बिनकष्टानं, दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत. कष्टानं पैसा मिळवला तर दुसऱ्याच्या कष्टाचीही जाण असते. ती जाण अकारण किंवा दुसऱ्याला फसवून जेव्हा पैशाचा ओघ वाढत जातो तेव्हा असत नाही. मग अशा पैशानं माणसाच्या अंत:करणातला अहंकार, मद, गर्व वाढत जातो. त्याची बुद्धी भ्रमित होते. पैशाच्या जोरावर जी जी सुखं भोगता येतात ती भोगण्यासाठीच आपला जन्म आहे, ही भावना बळावते. मग व्यसनांच्या आहारी सहज जाणं होतं. ती व्यसनंच हळूहळू पैशाचा नाश करू लागतात. त्यातून भणंगपणा वाटय़ाला येतो. बुद्धीचा नाश होतो.

– चैतन्य प्रेम