प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो का, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येतो. प्रपंच म्हणजे स्वार्थ. स्वत:च्या सुखासाठीची अविरत धडपड. त्यात निस्वार्थीपणा रुजवणारा परमार्थ साधायचा, हे सोपं आहे का? तर नाही, पण अशक्यही नाही. अनेक संतसत्पुरुषांचाही तसा सांगावा आहेच. ‘सहज-समाधी’ या पुस्तकात, प्रपंचात राहून परमार्थ साधू इच्छिणाऱ्या  सामान्य माणसासाठी पू. बाबा बेलसरे यांनी दहा मण्यांची माळ सांगितली आहे! हे दहा मणी असे : (१) रोज अगदी नियमाने थोडे तरी नामस्मरण करावे.  (२) आठवडय़ातून एक दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगति करावी. (३) स्वत:च्या आणि लोकांच्या सांसारिक चर्चा, कार्यालयातील नित्याच्या घटना, इतर साधकांच्या वागण्याची चिकित्सा आणि फालतू पुस्तकांचे वाचन मनापासून टाळावे. (४.- हा मणी कोणता ते आपण शेवटी पाहणार आहोत.)  (५) आपल्या प्रकृतीला सोसेल असा योग्य परिमित आहार असावा. (६) स्वत: अमानी असून दुसऱ्या व्यक्तीला मनापासून मान द्यावा. (७) आपल्या वागण्यात आणि साधनात ढोंगाचा लवलेश देखील नसावा. (८) आपल्या साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकूनदेखील वादविवाद करू नये, कारण दोन्ही फार पवित्र असतात. (९) व्यवहार न सोडता मनामध्ये संतोषाची वृत्ती बाळगण्याचा अभ्यास करावा. (१०) आपले जीवन अर्थात आपला प्रपंच आणि परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी.

पू. बाबा म्हणतात, ‘‘ही दहा मण्यांची माळ गळ्यात घालून जो प्रपंच करील, त्याला हां हां म्हणता परमार्थ साधतो!’’ आता या मण्यांचा विचार करू. पहिला मणी म्हणजे, ‘रोज अगदी नियमाने थोडे तरी नामस्मरण करावे.’ आता जो सर्वसामान्य माणूस आहे, जो सदोदित प्रपंच करतो आहे आणि प्रपंचापलीकडे ज्याच्या विचाराची कक्षा आजवर गेलेली नाही,  त्याच्या आवाक्यातलं भासणारं (नीट लक्षात घ्या, भासणारं म्हटलं आहे, असणारं नव्हे!) साधन म्हणजे नामस्मरण. ते सार्वत्रिक, सर्वपरिचित साधन आहे. आपण स्वत:च्या नावाचा जप न करता, त्या नावाशी किती एकरूप झालो असतो! स्वत:च्या नावाचा जप करीत नसूनही आपल्या नावलौकिकाला किती जपत असतो! आपल्या अंतरंगाचा ताबा घेतलेल्या, ‘मी’पणा पक्का करीत असलेल्या आणि त्यायोगे अशाश्वताची ओढ वाढवीत असलेल्या या स्व-नाम प्रभावातून आपली हळुहळू सुटका करण्यासाठी नामस्मरण आहे! तेव्हा हे नामस्मरण थोडंच असलं तरी चालेल, पण ते रोज आणि नियमपूर्वक करायचं आहे. आजारी माणसानं एकदाच औषध घेतलं आणि तो खडखडीत बरा झाला, असं तर काही होत नाही. ते रोज नियमानं थोडं थोडंच घ्यावं लागतं. थोडक्यात त्याचं एक निश्चित प्रमाण आहे आणि औषधाबरोबर काही पथ्यंही पाळावी लागतात. तसंच  नामस्मरणाचं एक प्रमाण ठरवून घ्यावं, की कमीतकमी इतका तरी जप मी करीन. या घडीला जेवढा आपण रोज करू शकतो असं वाटतं त्याच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणाचा संकल्प करावा. मग काही गोष्टी पथ्य म्हणून पाळाव्यात. त्या कोणत्या? तर गेल्या भागात साधकानं काय काय सोडावं, हे जे सांगितलंय ते सर्व सोडण्याचा अभ्यास करावा. अर्थात परनिंदा, प्रमाणाबाहेरचं खाणं, बोलणं, निजणं, उगीच काळजी करणं आणि उगीच वेळ वाया घालवणं थांबलं पाहिजे. मग मन हळुहळू अविचाराकडून सुविचाराकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे वाटचाल करू लागेल.

– चैतन्य प्रेम