प्रपंचात राहून ज्याला परमार्थ साधायचा आहे, त्यानं प्रपंचाचा मनावरील प्रभाव यापुढे वाढणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. प्रपंचाचा प्रभाव नष्ट होणार नाहीच, प्रसंग उद्भवला की मनात सुप्तपणे असलेली काळजी उघड होईलच. प्रसंग म्हणजे तरी काय? तर आपण स्वत: किंवा घरातलं कुणी आजारी पडलं, आपल्या स्वत:च्या किंवा अन्य कुणाच्या शिक्षणात अडथळे आले, आपल्या स्वत:च्या किंवा अन्य कुणाच्या नोकरी-धंद्यावर अनिश्चिततेचं सावट आलं, आर्थिक हानीची शक्यता निर्माण झाली, निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होईलंसं वाटू लागलं की मग मनातली काळजी उफाळून येते. आपण अध्यात्माच्या मार्गावर नव्हतो, तेव्हा ही काळजी मोठी उद्विग्नता निर्माण करीत असे. आता जमेल तितपत का असेना, पण साधना जर प्रामाणिकपणे सुरू असली, तर मग काळजी उग्र रूप धारण करीलच, असं नाही. कारण त्या काळजीपाठोपाठ, परिस्थितीचं खरं अशाश्वत स्वरूपही अधिक स्पष्टपणे जाणवू लागेल. अशा साधकाला भगवंतावर विश्वास ठेवून ती परिस्थिती पालटण्यासाठी कार्यरत राहणं साधऊ लागेल. त्या प्रयत्नांमध्येही तगमग कमी होत जाईल आणि सकारात्मक वृत्तीनं प्रयत्न करणं आवाक्यात येईल. तेव्हा प्रपंचाचा प्रभाव असा आटोक्यात येत जाऊ शकतो. पण त्या काळजीमागे वाहत गेलो, तर हा प्रभाव वाढतच जातो. कारण प्रपंच म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियं आणि पाचही कर्मेद्रियांनी जगाकडे असलेली सततची ओढ. ती ओढ स्वार्थपूर्तीसाठी सतत उद्युक्त करीत असते. सुख ओरबाडण्याची धडपड करीत जगायची प्रेरणा देत असते. तेव्हा आगीत जसं तूप घालत गेलो, तर ती अधिकच भडकत जाते, त्याप्रमाणे ‘स्वत:च्या आणि लोकांच्या सांसारिक चर्चा, ऑफिसमधील नित्याच्या घटना, इतर साधकांच्या वागण्याची चिकित्सा आणि फालतू पुस्तकांचे वाचन,’ यामुळे प्रपंचाचा प्रभाव अधिक वाढण्यासच मदत होते. त्यामुळे साधकाने तरी याबाबतीत अतिशय सावधानता बाळगली पाहिजे. माणसाला आपल्या प्रपंचातलं दु:ख नेहमीच मोठं वाटतं आणि ते दुसऱ्यापाशी उगाळण्याचीही त्याला सवय असते. समर्थानी म्हटलं आहे की, दुसऱ्यापाशी रडावं तर तो आपल्यापेक्षा अधिक मोठय़ानं रडू लागतो, अशी प्रापंचिकांची गत आहे! तेव्हा दुसऱ्यापेक्षा आपलं दु:ख, आपली वेदना, आपली अडचण, आपलं संकट, आपली व्यथाच माणसाला मोठी वाटते. मग त्याबाबत सतत दुसऱ्याशी चर्चा करून काय उपयोग? उलट ती वेदना अधिक पक्की होत जाते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आणि दुसऱ्याच्या संसारातल्या फुटकळ गोष्टींचीही चवीनं चर्चा करायला माणसाला आवडत असतं. कधी क्षुल्लक वाद, मतभेद यांचा काथ्याकूट करायची सवय जडली असते. घरापेक्षा अधिक गुणात्मक वेळ आता कार्यालयातही जात असल्याने तेथील घडामोडी, तेथील सहकारी याबाबतच्या चर्चेतही नको तितका वेळ घालवला जातो. इतकंच नव्हे, तर निवृत्तीनंतरही नोकरीतल्या आठवणींवर चर्चा करण्यात माणूस रमतो. साधनामार्गावर आल्यावर प्रपंच किंवा नोकरीतल्या चर्चाचे प्रमाण कमी झाले, की मग अन्य साधकांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष वळते. अर्थात हे लक्ष त्यांच्यातील गुणांकडे नव्हे, तर दोषांकडेच अधिक जाते.

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com