आपण अमानी होऊन दुसऱ्याला मान द्यावा, हे काही माणसाला जन्मजात साधत नसतं. आपली सवय आपला अहंकार जपायचा, जोपासायचा आणि प्रसंगी दुसऱ्याचा मान राखायचा नाही, अशीच असते. आपल्यातले दोष जाणवून देऊन दुसऱ्यातला मोठेपणा कसा लक्षात घ्यायचा, हे सद्गुरू कसं खुबीनं शिकवतात, याचा एक प्रसंग बापूसाहेब मराठे यांनी ‘महाराजांनी बाबांना असे घडविले’ या पुस्तकात दिला आहे. पू. बाबा यांनीच तो स्वत: बापूसाहेबांना सांगितला आहे. तेव्हा बाबा हे उच्च साधकावस्थेत होते. महाविद्यालयात तत्त्वज्ञान हा विषय शिकवत असत. वाणीरूप अवतारातील श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या कृपाछत्राखाली त्यांची जडणघडण सुरू होती. तेव्हा जालना येथे प्रल्हाद महाराज यांचे राममंदिर होतं आणि नानाचार्य म्हणून एक श्रेष्ठ भक्त ते सांभाळत असत. भागवतावर ते प्रवचनं करीत आणि राज्याच्या विविध भागांत असंख्य लोकांनी त्यांच्या प्रवचनांचा आधार घेत भक्तीच्या मार्गावर वाटचाल सुरू केली होती. जालन्याच्या राममंदिरात रामजन्माचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होत असे आणि त्या उत्सवासाठी नानाचार्यानी महाराजांना एकदा आमंत्रित केलं. महाराज बाबांना म्हणाले की, ‘‘केशवराव तुम्हालाही उन्हाळ्याची सुटी सुरू झाली आहे. तेव्हा तुम्हीही चलावं.’’ पू. बाबा त्याप्रमाणे महाराजांसोबत गेले. महाराजांच्याच सांगण्यावरून त्यांनी तिथं दासबोधावर रोज प्रवचन द्यायलाही सुरुवात केली. पाच दिवस प्रवचनं झाली आणि सहाव्या दिवशी सकाळी महाराज काय म्हणाले? की, ‘‘केशवराव, तुम्ही प्रवचनं केलीत ते चांगलंच झालं. पण नानाचार्यही मोठे प्रवचनकार आहेत. त्यांचाही मान आपण राखला पाहिजे. तेव्हा आता या शेवटच्या दिवशी त्यांना प्रवचन करू द्यावं. आजवर तुम्ही काय काय सांगितलंत आणि आज तुम्ही काय सांगायचं ठरवलं होतं, त्याचा गोषवारा तेवढा त्यांना सांगावा.’’ पू. बाबाही बरं म्हणाले आणि गेले पाच दिवस आपण काय काय मुद्दे मांडले, काय काय बोललो, हे त्यांनी नानाचार्याना सविस्तर सांगितलं. त्याचबरोबर आज आपण काय सांगणार होतो, तेही सांगितलं. नानाचार्यानी सगळं मन लावून ऐकून घेतलं. प्रत्यक्ष प्रवचन सुरू झालं तेव्हा मात्र पू. बाबांनी जे काही सांगितलं होतं, त्याला नानाचार्यानी स्पर्शही केला नाही. ते काही वेगळंच सांगत होते आणि त्यामुळे ते ऐकताना पू. बाबांच्या मनात विकल्प निर्माण झाला. हे एवढे मोठे प्रवचनकार, पण मी जे काही सांगितलं ते यांना आठवतही नाही, काय हे? बरं, निदान माझं मी सांगेन काय ते, असं तरी स्पष्ट म्हणायचं.. असा विकल्प होता तो. त्यामुळे नानाचार्य काय सांगत आहेत, हे त्यांनी नीटसं ऐकलंच नाही. रात्री महाराजांशी संवाद सुरू होता, तेव्हा महाराजांनी पू. बाबांना विचारलं की, ‘‘केशवराव, नानाचार्यानी काय काय सांगितलं?’’ या प्रश्नानं नेमकं अंत:करणातल्या खळबळीवर बोट ठेवलं! पू. बाबा म्हणाले, ‘‘काय सांगू महाराज, आपण सांगितलंत म्हणून, पाच दिवस मी काय काय बोललो, ते त्यांना सांगितलं. आपण म्हणालात म्हणून पुढे काय सांगणार होतो, तेही सांगितलं. पण ते बुद्धीतच शिरलं नाही. त्यांना पाहिजे तसं ते बोलले. मला काही ते आवडलं नाही!’’ हे ऐकताच महाराजांनी बाबांना जे समजावलं ते प्रत्येक साधकासाठी फार महत्त्वाचं आहे.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com