आपण खऱ्या अर्थानं सद्गुणी असतो का? सर्वगुणसंपन्न असतो का? तसं नसूनही आपण तोडक्यामोडक्या गुणांच्या जोरावर स्वत:ला गुणी मानत असतो आणि गुणीपणाचं ढोंग पोसत असतो.  काहीजणांच्या दोषांबद्दल टीका करीत असतो. पण स्वामी योगात्मानंद म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘साधकाने सच्चरित्र होण्याचा प्रयत्न अवश्य करावा. कसोशीने करावा, पण त्याचबरोबर हे जाणून असावं की परमेश्वराच्या शक्तीनेच, त्याच्या कृपेनेच हा प्रयत्न होऊ शकत आहे.’’ आता मग असं कुणाला वाटेल की, परमेश्वराचीच कृपा आहे म्हणून एखादा सद्गुणी आहे, तर मग त्याची कृपा नाही म्हणून एवढय़ानं कुणी दुर्गुणी आहे का? मग हा पक्षपात आहे का? तर श्रीगोंदवलेकर महाराजांच्याच एका वचनाचा आधार घेऊन एक लक्षात घ्यायला हवं की, आपण मुळातच अपप्रवृत्तीच्या बाजूनं असतो, वाईटाच्या बाजूनं असतो! म्हणजेच माणूस खरेपणानं सद्गुणी नसतो. निव्वळ चांगल्याची आवड आहे म्हणून तो चांगला नसतो. बरेचदा त्याला वाईट कर्माची नावड नसते, फक्त त्या कर्माची वाईट फळं त्याला नको असतात. त्या भीतीपोटी तो वाईट कर्म टाळू पाहतो. निसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘तुम्हाला पाप करायचंय? तर खुशाल करा. पुण्याची जशी फळं असतात तशीच पापकर्माचीही फळं असतात. पण अडचण हीच असते की, माणसाला पाप हवं असतं, त्याची फळं तेवढी नको असतात!’’ मग तरीही जेव्हा कुणी सद्गुणी होतो तेव्हा त्यामागे ईश्वरी कृपा असते म्हणजे काय? तर मुळातच ज्याचा ओढा वाईटाकडे आहे त्याच्या अंत:करणात पुण्यकर्माची क्षीण ओढदेखील जेव्हा निर्माण होते तेव्हा ती ओढ वाढवण्याची कृपा भगवंत करीत असतो! कारण मनात आलेला चांगला विचार, चांगली प्रेरणा टिकतेच असं नाही. पुढच्याच क्षणी ती लोप पावू शकते. तेव्हा ती टिकवणं, तिचं स्मरण अधेमधे जागं व्हायला वाव देणं, ही कृपा आहे. तेव्हा आपण ‘पुण्यवान’ आहोत, ‘सद्गुणी’ आहोत, यात आपलं कर्तृत्व खरं काही नाही. ती परमेश्वरी शक्तीच ते कार्य करीत आहे. मुळात पूर्णातून विलग झाल्यानं जो अपूर्ण भासत आहे, त्याला पुन्हा आपल्यात विलीन करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण तत्त्वस्वरूप सद्गुरू करीतच आहे. या प्रक्रियेला कृपा माना किंवा मानू नका, पण त्या प्रक्रियेला साजेसं जगणं सुरू होणं, ही किती मोठी कृपा आहे, हे साधना खोलवर जाऊ लागल्यावर हळुहळू उमजू लागतं. आपण खरं सद्गुणी व्हावं, हा संकल्प त्यामुळे चित्तात धारण केला पाहिजे. राजस आणि तामस भावात खोलवर बुडालेल्या जिवाला प्रथम सत्त्वगुणी होण्याचीच आस लागली पाहिजे. त्याच्यातील सत्त्वगुण जसजसा वाढीस लागेल, तस तसे रज आणि तमाचे संस्कार क्षीण होत जातील. मग त्याचं जीवन हे सत्त्वगुणाधिष्ठित होऊ लागेल. एकदा का सत्त्वगुण पक्व होत गेला की मग हा गुणही किती मोठा अडसर आहे, हे जाणवू लागेल! कारण एकवेळ राजस आणि तामस अहंकार तुटू शकेल, पण सात्त्विक अहंकार अगदी पक्का असतो. तो अन्य साधकांमधील सहजता, सरळपणा, भावभक्तीची श्रीमंती कळू देत नाही! रज आणि तमातून सुटूनही जर सत्त्वगुणाची पकड सुटली नाही, तर त्रिगुणातीत असं जे परमतत्त्व आहे त्याची खरी ओळख होऊ शकत नाही. त्यामुळेच अमानीपणा आणि ढोंगरहित अंत:करण या दोन्ही गोष्टी आपल्यात बिंबाव्यात, यासाठीची तळमळ साधकाच्या मनात असलीच पाहिजे.