‘योगा’ आणि ‘मेडिटेशन’ची जोड जीवनाला असावी, असंही बरेचजण मानतात. त्यानं मनाला शांती मिळते, मनाची शक्ती वाढते, उमेद वाढते, हा भाव असतो. बरं या लाभणाऱ्या शांतीचा आणि वाढणाऱ्या उमेदीचा लाभ भौतिक जीवनालाच होतो, या कल्पनेमुळे ‘योगा’ आणि ‘मेडिटेशन’ला भौतिक महत्त्वही आलं आहे. नैमित्तिक उपास, व्रत, पारायण, स्तोत्रपठण, यालाही तसा विरोध नसतो. पण यापुढे कुणी गेला, तर आप्तस्वकीयांनी गजबजलेल्या ‘जगा’ला भीती वाटते! पण खरा परमार्थ नैमित्तिक उपास-तापास, पारायणं, व्रतं इथं थांबत नाही. या गोष्टींचा उपयोग असतोच. कारण या गोष्टी करून करूनच तर परमार्थाचा मार्ग गवसला असतो! पण या मार्गानं जो निर्धारानं वाटचाल करू इच्छितो त्याला रोखण्याचा प्रयत्न होतो. तर अशा साधकानं आपल्या साधनेबद्दल आणि सद्गुरूंबद्दल वादविवाद करू नये, असं पू. बाबा सुचवतात. इथं श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या एका वचनाची आठवण होते. महाराज म्हणत की, ‘जे माझी िनदा करतात, त्यांनी मला खरं ओळखलेलं नाहीच, पण जे माझी स्तुती करतात त्यांनाही मी कोण ते कळलेलं नाही!’ जो निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे आहे त्याला मनुष्यभावानं आपण निंदा आणि स्तुतीच्या कक्षेत आणू इच्छितो! सद्गुरू खरे कोण आहेत, ते परमतत्त्व खरं काय आहे, हे न जाणताच आपण त्यांची जी स्तुती करतो तीही मनुष्यभावानंच असते. आणि सद्गुरूंपुरता वादविवाद म्हणजे तरी काय? दुसऱ्याकडून सुरू असलेली त्यांची निंदा ही आपल्याला जमेल तशा आपल्या आकलनानुसारच्या स्तुतीच्या अस्त्रानं रोखण्याची केविलवाणी धडपड! खरं पाहता जोवर या सृष्टीत मनुष्य आहे तोवर त्याचं मनही राहाणारच आहे. जोवर मन आहे तोवर त्याच्या जीवनात मानसिक संघर्षही राहणारच आहे. हा संघर्ष जोवर आहे तोवर त्याला मनाचं व्यवस्थापन शिकवणाऱ्या आणि त्या मनाच्या जोरावरच मनापलीकडे जायला शिकवणाऱ्या मार्गाची, साधनेची आणि सद्गुरूची गरज लागणारच आहे. तेव्हा सद्गुरू तत्त्वाचं हे खरं व्यापक कार्य लक्षात घेता, त्यांना निव्वळ एका व्यक्तीचौकटीत चिणून त्यांच्या बाजूनं वादविवाद करण्यात वेळ घालवणं म्हणजे आपल्या अमूल्य आयुष्यातला वेळ आणि अमूल्य संधी वाया घालवणंच आहे. तोच वेळ साधनेत गेला तर खरा अधिक लाभ होईल. ही साधना आहे अंतरंगात शिरण्याची. जसजसे आपण अंतरंगात शिरू लागू तसतसे मनाचे सूक्ष्म पदर गवसू लागतील. मग ते सूक्ष्म मन सूक्ष्म तत्त्वाशी समरस होऊ लागेल. जीवनातील संकुचितपणा, ‘मी’ आणि ‘माझे’शी असलेली जखडण सुटू लागेल. या प्रक्रियेला वाव न देता, जर मन वादविवादात गुंतून पडलं तर ते हिंदूकळून अधिकच अस्थिर होईल. ते व्यापक होण्याची शक्यता दुरावत जाईल. माझेपण अधिकच पक्कं होत जाईल. त्यामुळेच बाबा सांगतात त्याप्रमाणे साधनेबद्दल आणि सद्गुरूबद्दल वादविवाद करू नये. हा वादविवाद का करू नये? तर या दोन्ही गोष्टी फार पवित्र असतात, असं बाबा म्हणतात. आता पवित्र म्हणजे काय? एखादी वस्तू पवित्र किंवा अपवित्र असते याचा अर्थ काय? तर ते पावित्र्य किंवा अपावित्र्य आपल्या मनातच असतं. मनाचा त्या वस्तूप्रतीचा भावच ते पावित्र्य निर्माण करीत असतो आणि जोपासत असतो. तेव्हा निर्थक वादविवादानं साधनेबद्दलच्या आणि सद्गुरूंबद्दलच्या आंतरिक भावाला तडा जाऊ देऊ नका, असंच बाबांना सांगायचं असावं.

– चैतन्य प्रेम