देश पारतंत्र्यात होता तेव्हाची गोष्ट. १९०६ या वर्षी महाराष्ट्रात प्लेगची साथ जोरात सुरू होती. गावेच्या गावे ओस पडत होती. गावाबाहेर झोपडय़ा बांधून त्यात लोक राहात होते. त्या झोपडय़ांमध्येही मृत्यूचं तांडव सुरूच असे. जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद तालुक्यातील दाभाडी या गावावरही प्लेगनं अवकळा आणली होती. गावातील लोक वेशीबाहेर तात्पुरती वस्ती करून राहू लागले होते. वीस-पंचवीस झोपडय़ात काय तो जीवनाचा झरा मृत्यूच्या सावलीत वाहात होता. त्यापैकी एका झोपडीत आचार्य कुटुंब राहात होतं. कृष्णाचार्य हे कुटुंबप्रमुख होते. त्यांचा दोन वर्षांचा लहान मुलगाही होता. नियती अशी क्रूर की या सर्वच झोपडय़ातील माणसं प्लेगच्या साथीनं दगावली. आचार्य कुटुंबातील हा लहानगा मुलगा वगळता कुणीही उरलं नाही. ज्या वस्तीत जिवंतपणाच्या सगळ्याच खुणा पुसल्या जातात तिथं मृत्यूची वर्दी द्यावी कुणी कुणाला? या लहान मुलाला तर मृत्यू म्हणजे काय, हेसुद्धा नीटसं माहीत नव्हतं. तो मृत आईच्या कुशीत पडून तिला जागं करू पाहात होता. दुसरा दिवस उजाडला. मुलाचा धीर सुटलाच होता. तो आक्रंदन करू लागला. त्याचवेळी बाळकृष्णपंत भारजकर नावाचे एक गृहस्थ घोडय़ावरून त्या वस्तीवरून जात होते. त्यांना एका झोपडीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांच्याचानं पुढं जाववेना. ते त्या झोपडीत शिरले आणि जागीच थिजून गेले. घरातले सर्वचजण मृत्यमुखी पडले होते आणि केवळ हा दोन वर्षांचा मुलगा आईच्या जवळ पडून रडत होता. त्या मुलाला त्या अवस्थेत टाकून निघून जाणं काही बाळकृष्णपंतांना सहन होईना. त्या मुलाला तसंच तिकडे टाकलं तर त्यालाही प्लेगची लागण होईल, हेही दिसत होतंच. बाळकृष्णपंतांनी त्या निराधार, निराश्रित मुलाला उचलून घेतलं आणि आपल्या घरी नेलं. त्याचा तीन र्वष सांभाळ केला. मग साखरखेडर्य़ाला देसाई देशपांडे यांच्याकडे त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. वर्ष – दोन र्वष उलटली. रामानंद महाराज साखरखेडर्य़ास आले होते. त्यांच्या दर्शनास अनेक लोक लोटले होते. ‘सद्गुरू आणि सच्छिष्य’ या विषयावर सत्संग सुरू होता. महाराजांची अमृतवाणी ऐकण्यात श्रोते तल्लीन होते. त्यावेळी या पाच-सहा वर्षांच्या मुलाला घेऊन  देसाई तिथं आले. त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला. त्या मुलानंही मोठय़ा नम्र भावानं महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवलं. त्याचा तो भाव पाहून महाराजांना कौतुक वाटलं. या मुलावर इतके चांगले संस्कार करणारे त्याचे आईवडील आहेत तरी कोण, या भावनेनं त्यांनी या मुलाला विचारलं, ‘‘बाळ तू कोणाचा रे?’’ तो मुलगा लगेच उद्गारला, ‘‘महाराज मी तुमचाच!’’ महाराज या उत्तरावर प्रसन्न झाले. त्यांनी या मुलाची चौकशी केली तेव्हा त्यांना सर्व प्रकार समजला. या मुलाला स्वत:चं नावही माहीत नव्हतं. त्यामुळे त्याचं नामकरण करायचं ठरलं. त्या दिवशी वामन द्वादशी होती म्हणून त्याचं नाव ठेवलं वामन.. वामन आचार्य. हेच पुढे वामनाचार्य किंवा नानाचार्य म्हणून प्रख्यात झाले. बाबा बेलसरे यांना परमार्थ उमजून करणाऱ्या श्रेष्ठ साधकाचा सहवास लाभावा, यासाठी महाराजांनी त्यांना जालन्याला ज्या नानाचार्याकडे नेलं होतं, तेच हे नानाचार्य! ‘महाराज मी तुमचाच,’ हे विलक्षण आत्मीय उत्तर ज्यांच्या मुखातून अवघ्या सहाव्या वर्षी आलं त्यांचं अवघं जीवनच सद्गुरूमय असेल, यात काय शंका?

– चैतन्य प्रेम