ज्या मुलाला आपलं नावही माहीत नव्हतं त्याला, ‘महाराज मी तुमचाच,’ हे पक्केपणानं माहीत होतं! हे सांगण अभावित नव्हतं, उत्स्फूर्त नव्हतं, त्याच क्षणी सुचून मग विचारपूर्वक मांडणी करून दिलेलं नव्हतं. अनेकांचा आधार मिळाला असल्यानं आपण जिवंत आहोत, त्यामुळे ज्यांनी वाचवलंय, पालनपोषण केलंय तेच खरे माझे आहेत आणि मी त्यांचाच आहे, या व्यावहारिक जाणिवेचा या उत्तराला स्पर्शही नव्हता. आता कुणी म्हणेल, की लहान मुलाला व्यवहाराचं भान कसं असेल? तर मग, ‘महाराज मी तुमचाच,’ हे उत्तर देण्याचं भानही कसं असेल? तेव्हा हे उत्तर आलं कसं? कारण एकच असावं. या मुलाला वाचवण्यात, त्याचं पालनपोषण आणि शिक्षण पार पाडण्यात काही जणांचा मोठाच वाटा होता. पण हे सारं घडलं त्याची सुरुवात त्या मुलाची कीव येण्यापासून झाली होती! त्यात दयाभाव होता, परोपकाराच्या पुण्यभावनेचीही सूक्ष्म छटा होती. आई मात्र मुलाला कीव येत असल्यानं, दयेपोटी किंवा परोपकाराच्या भावनेनं सांभाळत नाही!  केवळ निरपेक्ष वात्सल्यानं ती त्याच्यावर प्रेमवर्षांव करीत असते. महाराजांना पाहताच या मुलाच्या अंत:करणातील प्रेमभावच जागृत झाला आणि, ‘महाराज मी तुमचाच,’ हे उत्तर अंत:करणातल्या प्रेमातूनच बाहेर पडलं! बघा, ज्याला स्वत:चं नावही नव्हतं आणि ते देण्याचं कुणाला सुचलंही नव्हतं त्याचं नामकरण गुरुमाउलीनं करावं, हेदेखील सूचकच आहे. ‘वामन’ हे नावही अगदी समर्पक होतं.आता जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्था कोणत्या? तर इंद्रियांच्या आधारावर सुखभोगाच्या ओढीनं जीव जगात वावरत असतो, ती जागृत अवस्था असते. कारण या वेळी अहंभाव सतत जागृत असतो! माणूस झोपतो तेव्हा डोळे मिटल्यानं दृश्य जग मावळतं आणि मनोपटलावरील त्या जगाचं आंतरिक प्रतिबिंब ठळक होऊ  लागतं. अर्धवट झोपेत आणि मग निद्रेत स्वप्नांच्या प्रांतात इंद्रियजाणिवा जागरूकच असतात आणि मन ‘मी’ आणि ‘माझे’पणाच्या भावानं अंतरंगातील प्रतिबिंबित जगाचा अनुभवही घेतच असतं. ही दुसरी अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. मग मनही गाढ निद्रेच्या आधीन होऊन ‘मी’ आणि ‘माझे’च्या ओझ्यातून मोकळं होतं. देह जिवंत असतो, पण देहजाणीव पूर्णपणे मेली असते, ही सुषुप्ति अवस्था! मात्र देहाला जरा धक्का लागू द्या, जीव देहबुद्धीच्या जागृतावस्थेत लगेच येतो. तेव्हा या तिन्ही अवस्थांत, ‘‘ ‘मी’ अशाश्वत जगात वावरत असलो तरी अशाश्वताचा नव्हे तर सत्यस्वरूपस्थ सद्गुरूचाच आहे,’’ ही जाणीव व्याप्त होणं, हा साधक जीवनाचा कळसाध्याय आहे. सद्गुरूंना विचारलं की, ‘‘कर्तव्य कधी संपतं आणि मोहवशात कर्म कधी सुरू होतं, ते कळत नाही. ते ओळखायचं कसं?’’ तर म्हणाले की, ‘‘कर्तव्यात मोह नसतो. जिथे कर्म करताना त्याचं अमुक फळ मिळावं, अशी इच्छा उत्पन्न होऊ  लागते, तिथं मोह सुरू झालाय, हे ओळखावं!’’ किती खरं आहे! बरेचदा कर्तव्यं आपण अनिच्छेनं, तर मोहकर्म मात्र समरसून पार पाडत असतो. तेव्हा अध्यात्मपथावर आल्यानं माणूस कर्तव्यविन्मुख होत नाही. उलट कर्तव्याबद्दल अधिक जागरूक होतो! अशाश्वतामागचा शाश्वत आधार कोणता, हे शोधत आपण खरं तर त्या शाश्वताचेच आहोत, हे वास्तवभान जोपासत असतो.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com