News Flash

५३. चर्म आणि मर्म

स्वामी नित्यानंद बहुतेक वेळा मौनातच असत.

स्वामी नित्यानंद बहुतेक वेळा मौनातच असत. कधी कुणी त्यांच्या जीवनचरित्राबद्दल विचारलंच तर हसून म्हणत, ‘‘त्यात काय आहे सांगण्यासारखं? एक कावळा आला आणि एक कावळा गेला!’’ त्या बोलण्यातला गूढार्थ कुणाला कळावा? पण नित्यानंदांसारखे साक्षात्कारी सत्पुरुष मनुष्यरूपात येतात तेव्हाच जीवरूपी कावळा मुक्त होत असतो, हेही खरंच! या नित्यानंदांची काही वचनं अत्यंत अर्थगर्भ आहेत. नित्यानंद म्हणत, ‘‘मर्माला न जाणता चर्माला अलंकार केला तर कर्म सोडून जात नाही.’’ अर्थात मर्माला न जाणता चर्माला अलंकृत करून कर्माचा पाश तुटत नाही! मर्म, चर्म आणि कर्म हे तीन शब्द नुसते ध्वनीसाम्याच्या आधारावर उच्चारले गेलेले नाहीत. मर्म म्हणजे जीवनाचा मूळ उद्देश काय, हे जाणणं. हा उद्देश माहीत नसताना नुसतं चर्माला, चामडय़ाला अर्थात शरीराला अलंकृत करून काय होणार?  त्या शरीराला सुगंधी साबणानं न्हाऊ घातलं, अत्तरानं माखलं, उंची वस्त्रं नेसवली, अत्यंत महागडय़ा अलंकारांनी सजवलं, पण त्या शरीरात प्राणच नसेल, तर त्याचा काय उपयोग? ज्याप्रमाणे प्राण नसलेल्या शरीराला चामडय़ाइतकीही किंमत नाही त्याचप्रमाणे उद्देशहीन जगण्यालाही काही किंमत नाही!  जीवनाचा उद्देशच कळला नसल्यानं कर्माचं मर्मही उकलत नाही. अर्थात नेमकं कोणतं कर्म करावं, कसं करावं, कसं जगावं, हेच कळत नाही. मग या जगण्याचा आधार असलेला हा जो देह आहे त्या देहालाच सदोदित जपत राहाणं, त्याच्याच सुखाला अंतिम सुख मानत त्या सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडत राहाणं, हाच जीवनाचा एकमात्र उद्देश बनतो. पण त्यामुळे अनेकदा करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो. मग विपरीत कर्माची विपरीत फळं वाटय़ाला येतात. ती भोगताना पुन्हा विपरीतच कृती घडत जाते आणि कर्मबंधनाची ही शृंखला कधीच तुटत नाही!   जोवर शरीर धडधाकट असतं, तोवर या शरीराच्या योगे किती मोठा लाभ प्राप्त करून घेता येतो, याची जाणीवच होत नाही. एक अगदी साधा उपाय आहे. आपण लहानपणापासून आपल्या परिचयातील किंवा नात्यातील ज्या ज्या व्यक्तींना जवळून पाहिलं आहे, त्यांच्यात आता वयपरत्वे झालेला बदल फक्त आठवून पाहा किंवा निरखून पाहा! पूर्वी किती ताकदीनं ती व्यक्ती वावरत असे, काम करीत असे, फिरत असे, हे आठवून पाहा.. आणि आताची तिची अवस्था डोळ्यासमोर आणा. कित्येकांची गात्रं खचली असतात, देहाच्या क्षमता कमी झाल्या असतात, डोळ्यांना नीटसं दिसत नाही, कानांनी नीटसं ऐकू येत नाही, बोलताना-चालताना दम लागतो.. कित्येकजण मनानंही खचले असतात.. आपल्याच आप्तांच्या देहाचा वयपरत्वे झालेला प्रवास आणि त्यांच्या देहाची काळानुरूप झालेली झीज जरी नुसती लक्षात घेतली तरी या घडीला आपल्या देहात अद्याप असलेल्या क्षमतांचं, त्या देहाचं आणि आपल्या जीवनाचं खरं मोल हळूहळू उमगू लागेल! मग जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व लक्षात येईल आणि तो क्षण देहाला नव्हे, तर अंतर्मनाला सद्विचारांनी, सद्प्रेरणांनी अलंकृत करण्यासाठी व्यतीत करून कर्मपाशातून हळूहळू मुक्त होण्याचा स्वाध्याय सुरू होईल!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 2:30 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 4
Next Stories
1 ५२. रिता डेरा
2 ५१. सारंगधर
3 ५०. फणस अन् कर्दळी
Just Now!
X