गुजरातमधील वहाणखुरा गावात एक हनुमानाचं मंदिर होतं. तिथं श्रीरंगावधूत महाराज एकदा काही दिवसांसाठी वास्तव्याला आले होते. गावखेडय़ातला समाज तसा धार्मिक वळणाचा होता. त्यामुळे मंदिरात पूजाअर्चा, भजन -कीर्तन साधेपणानं पण नित्यनियमानं होत असे. ठरावीक दिवशी मारुतीरायाला तैलाभिषेकही केला जाई. एकदा महाराजांनी सर्वाना सांगितलं की, ‘‘प्रत्येक भाविकानं आपापल्या शक्तीनुसार शेंगदाणा तेल आणावं. हनुमान चालिसाचा पाठ करीत मारुतीरायाला तेलाचा अभिषेक केला जाईल!’’ ही वार्ता आजूबाजूच्या गावांतही पसरली. महाराजांच्या उपस्थितीत आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायला मिळणार आणि तेलाचा अभिषेकही करता येणार, या विचारानं अनेकांना अपार आनंद झाला. त्यामुळे अभिषेकासाठी तेल घेऊन येणाऱ्यांची संख्या कैक पटीनं वाढली होती. मंदिरात तर एखाद्या उत्सवासारखंच वातावरण पसरलं होतं. महाराजांनी दोन मणाचं पातेलं आणून ठेवलं होतं आणि पाहता पाहता ते पूर्ण भरूनही गेलं. इतक्या तेलाचा अभिषेक त्या गावातच काय, पण आजूबाजूच्या गावांतही तोवर कधी झाला नव्हता. त्यामुळे एका विक्रमाचे आपण साक्षीदार होणार, या कल्पनेनंही अनेकांची उत्सुकता वाढली होती. महाराजांनीही तेलानं भरलेल्या त्या अवाढव्य पातेल्याकडे एकदा तृप्त मनानं पाहिलं. मग सगळ्यांकडे एकवार कटाक्ष टाकत ते म्हणाले, ‘‘खरं तर मंदिरात तुम्ही तेल आणून दिलंत तेव्हाच आपल्या सर्वाच्या तेलाचा अभिषेक मारुतीला झाला आहे. पण आता मी या तेलाचा जो वेगळ्या प्रकारचा अभिषेक करणार आहे ना, त्याला विरोध करू नका. त्याबद्दल शंकाही मनात येऊ देऊ नका. मारुतीराया आज खरोखरंच तुम्हा सर्वाच्या या अगदी वेगळ्या तैलाभिषेकानं प्रसन्न होणार आहे, यावर विश्वास ठेवा!’’ सर्वाचीच महाराजांवर श्रद्धा होती. त्यामुळे कुणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. मग महाराजांनी ते पातेलं हनुमंतांना अर्पित केल्याचा संकल्प सर्वाच्या वतीनं सोडला. त्यानंतर हनुमान चालिसा म्हणत त्या दोन मण तेलातील केवळ वाटीभर तेलाचा अभिषेक मूर्तीला केला. त्या तेलातलं पाच शेर तेल पुजाऱ्याला प्रसाद म्हणून देऊ केलं. मग गावातील गरीब वस्तीत प्रत्येक घरी चार शेर तेल, याप्रमाणे उरलेलं सगळं तेल वाटून टाकलं! प्रत्यक्षात घडलेला हा किती प्रेरक प्रसंग आहे! महाराजांनी तेलाच्या अभिषेकाच्या प्रथेवर टीका केली नाही, पण त्या प्रथेचं अगदी मर्यादित पालन करतानाच तिला किती वेगळं वळण दिलं. बरं त्यात ना दातृत्वाचा गाजावाजा ना कुणा एकाच्या अहंकाराला वाव! तेव्हा श्रावणच कशाला? आपण इतर महिन्यांतील अनेक व्रतांना आपल्यापुरतं असं सकारात्मक वळण देऊ शकूच की. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. तेव्हा केवळ आपलं घर उजळून न टाकता, जिथं वीज पोहोचली आहे अशा आदिवासी पाडय़ांवर, शाळांमध्ये आणि अनाथाश्रमांमध्ये आपण दीपदान करू शकतो. उपवासाच्या दिवशी अन्नदान करू शकतो. विचार केला तर अशा अनेक अभिनव कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आल्या की चित्तावर आपसूक त्याचे सकारात्मक संस्कारही होतील. अर्थात हे सारं करताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे, कर्तेपणाचा, दातृत्वाचा अहंकार चिकटू द्यायचा नाही. अभिषेक बाहेरून सुरू असतानाच अंत:करणावरही परमात्मभक्तीच्या विशुद्ध जलाचा अभिषेक साधायचा आहे!

– चैतन्य प्रेम