08 March 2021

News Flash

१६७. अट्टहास

परमात्म्यावर प्रेम करायचं आहे.

परमात्म्यावर प्रेम करायचं आहे. त्यानं जसं आपल्यावर आजवर निरपेक्ष प्रेम केलं आहे, आपली पात्रता-अपात्रता न पाहता भरभरून आपल्याला दिलं आहे, त्याची जाण ठेवून हे प्रेम करायचं आहे. आता परमेश्वरावर प्रेम करणं म्हणजे काय? श्रीबाबामहाराज आर्वीकर सांगतात की, ‘‘त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे त्याचे गुणानुवाद गाणे आणि त्याचे गुणधर्म आणि आज्ञा जीवनात सप्रेम अट्टहासाने सांभाळणे होय.’’ वरवर पाहता या सांगण्याचा खरा रोख लक्षात येईलच असं नाही. तेव्हा नीट वाचू.. तर त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे पहिली गोष्ट अशी की, त्याचे गुणानुवाद गायचे आहेत. आता नुसतं गुण गाणं म्हटलेलं नाही. गुणानुवाद म्हटलं आहे. म्हणजेच त्या गुणांचा कृतीत जो अनुवाद झाला आहे, त्या कृतींचं अर्थात लीलांचं गायन करायचं आहे! कारण बोध नुसता वाचून समजतोच असं नाही. तो सत्पुरुषाच्या चरित्रातील अनेकानेक लीलांमधून अधिकच मनावर ठसतो. दासगणूमहाराज यांनी ‘गजानन विजय’ या ग्रंथात एक चित्रात्मक मनोहारी रूपकवर्णन केलं आहे. गजानन महाराज यांच्या लीलाचरित्राकडे उत्कंठेनं आणि भावव्याकूळ मनानं वळलेल्या वाचकांना ते म्हणतात, ‘‘गजाननचरित्र मेघ थोर। तुम्ही श्रोते अवघे मोर। चरित्ररूपी वर्षता नीर। नाचाल वाटे नि:संशय।।’’ खऱ्या सत्पुरुषाचं चरित्र जणू मेघासारखं असतं. आकाशात दाटलेल्या मेघांनी आनंदतो तो मोर. मोराच्या मनानं पावसाकडे पाहता आलं तर त्या पावसाचं खरं सौंदर्य उमगू शकतं. तेव्हा मोराच्या नजरेनं त्या चरित्रमेघाकडे पाहा.. मग त्या लीलाचरित्रातून भक्तीप्रेमाचा जो वर्षांव होत जाईल त्यानं त्या मोरासारखंच तुम्ही नि:संशय नाचू लागाल! तेव्हा लीलाचरित्रातील अनेकानेक प्रसंगच असे मनाला भिडणारे असतात की त्यानं मनावर भावसंस्कार होत जातात. तर गुणानुवाद म्हणजे त्या परमेश्वराच्या भक्तीलीलांचं गायन करायचं आहे. त्याच्यातली अपरंपार करुणा, दयाद्र्रता, भक्तवत्सलता, भक्तएकरूपता यांचा संस्कार घडविणाऱ्या लीलांचं हे गायन आहे, स्मरण आहे, चिंतन-मनन आहे. तर त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे प्रथम त्याचा गुणानुवाद गाणं. नंतर सांगतात की, ‘‘त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे त्याचे गुणधर्म आणि आज्ञा जीवनात सप्रेम अट्टहासानं सांभाळणं!’’  थोडक्यात, त्याच्या जगण्यात ज्या गुणांना त्यानं महत्त्व दिलं आहे, ज्या गुणांची त्यानं कदर केली आहे, ते गुण आपल्या जगण्यात उतरवणं.. आणि त्याचे गुण हेच त्याच्या इच्छेचं अर्थात आज्ञेचं सूचन करतात. म्हणजे काय? जर तो परमेश्वर सर्वावर समत्व भावानं प्रेम करतो, तर हा त्याचा गुण आहे आणि हीच त्याची आज्ञाही आहे की, त्याच्या माणसानंही सर्वावर समत्व भावानं प्रेम केलं पाहिजे! जर तो निरिच्छ आहे, तर हाच त्याचा गुण आहे आणि हीच त्याची आज्ञाही आहे. म्हणजेच तो जसा निरिच्छ आहे, तसंच त्याच्या माणसानंही निरिच्छ झालं पाहिजे. जर तो निरपेक्ष आहे, तर त्याच्या माणसानंही अपेक्षांपासून मुक्त झालं पाहिजे. आता हे सोपं आहे का? त्याच्यासारखं निरिच्छ, निरपेक्ष, अभेद, द्वेषरहित, प्रेमपूर्ण होणं आपल्याला साधेल का? ते सोपं नाहीच आणि म्हणूनच तर ते अट्टहासानं सांभाळायला सांगितलं आहे! म्हणजे त्याचे गुण आपल्यात उतरवण्याचा अभ्यास अट्टहासानं करायचा आहे आणि सप्रेम म्हणजे प्रेमपूर्वकही करायचा आहे!

– चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 2:26 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 46
Next Stories
1 १६६. जशास तसं!
2 १६५. सर्वाधिक प्रेम
3 १६४. चालवाट!
Just Now!
X