ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं ना? त्याचा जो विचार, तोच आपल्याला आपलासाही वाटतो ना? त्याचं जे जीवनध्येय तेच आपलंही होतं ना? समजा कुणी म्हणाला की, प्रभु रामचंद्रांवर त्याचं प्रेम आहे, पण प्रत्यक्ष जगण्यात त्याचा सत्याचरणाशी आणि सदाचरणाशी दूरान्वयानंही संबंध नसला, नव्हे त्याची त्याला नावडच असली, तर त्याचं रामावर प्रेम आहे, हे म्हणता येईल का? अंधाऱ्या खोलीतल्या भिंतीवर कुणी दिव्याचं चित्र काढलं म्हणून त्या चित्रानं प्रकाश पडेल का? तीच गत या बेगडी भक्तीप्रेमाची आहे. आपल्याला रामाचा सेवक म्हणवून घ्यायचं आणि प्रत्यक्षात कामाचा गुलाम बनायचं, यानं काय साधणार? ज्या परमेश्वराला जगातही कुठं पाहाता येत नाही, त्याला एका मूर्तीत, एका तसबिरीत कसं पाहता येईल? जर त्याच्या अस्तित्वाची जाणीव जगतानाही पदोपदी टिकत वाढत गेली, तर मग मूर्ती आणि तसबिरीतही त्याला पाहून अष्टसात्विकभाव जागृत होतील. तेव्हा त्याला जे आवडतं, ते आपल्याला आवडू लागलं की त्याच्यावर प्रेम होऊ लागलं. ते सोपं नाही आणि म्हणूनच ते सप्रेम अट्टहासानं सांभाळायला सांगितलं आहे! आता हा ‘सांभाळणं’ शब्दही मार्मिक आहे बरं. कारण मिळवणं एकवेळ सोपं असतं, पण सांभाळणं कठीण! म्हणूनच तर भगवंतानं वचन दिलं की, ‘‘योगक्षेमं वहाम्यहम्!’’ योग म्हणजे मिळणं आणि क्षेम म्हणजे सांभाळणं. तर जो माझा अनन्य भक्त आहे, ज्याला माझ्याशिवाय अन्य कुणीच नाही, त्याला जे जे हवं ते मिळवून देणं आणि ते ते टिकवणं, या दोन्ही गोष्टी मीच पार पाडीन! तर त्याचे गुण काय ते कळले, त्याच्या आज्ञा काय त्या कळल्या, त्याचं प्रेमही समजलं आणि त्याच्यावर प्रेम करण्याची इच्छाही झाली, तरी हे सगळं सांभाळलं गेलं पाहिजे! तरच ते टिकेल. म्हणजे त्याचे गुण जगण्यात उतरवण्याचा अभ्यासही सांभाळायचा आहे. त्याच्या आज्ञेनुरूप जीवनाला आकार देण्याचा अभ्यासही सांभाळायचा आहे. आणि त्या अभ्यासातही प्रेम हवं, कंटाळा नको! तर त्याचे गुण अंगी बाणवायचे, तर ते गुण आधी कळले तर पाहिजेत! बाबामहाराज सांगतात,

‘‘त्याचे गुण अनंत आहेत, पण तो तुमच्याशी ज्या गुणांनी परिचित आहे; ते गुण म्हणजे प्रेम, सेवा आणि समर्पण हे होत. ते तुम्ही त्याच्याबाबत बाणवून घ्या.’’ वाक्य नीट लक्षात घ्या बरं! प्रेम, सेवा आणि समर्पण हे गुण आहेत आणि ते त्याच्याबाबत बाणवून घ्यायचे आहेत! म्हणजे काय, ते पाहू. तर महाराज सांगतात त्याप्रमाणे त्या परमेश्वराचे गुण खरोखर अनंत आहेत. किती गुण पहावेत, यादी संपणारीच नाही. पण ज्या गुणांनी तो आपल्याला परिचित आहे, त्याच्या ज्या गुणांचा प्रत्यय आपल्याला आपल्या जीवनातही खरं तर आला आहे, ते तीन गुण म्हणजे प्रेम, सेवा आणि समर्पण. म्हणजेच त्याचं भक्तावर निरतिशय प्रेम असतं, भक्त मानतो की तो भगवंताची सेवा करतो, पण प्रत्यक्ष पाहता भगवंतच भक्ताची मोठय़ा प्रेमानं सेवा करीत असतो. सासुरवास भोगत असलेल्या संत सखूला त्यानं दळणकांडणात मदत केली, श्रीखंडय़ा बनून नाथाघरी पाणक्याचंही काम केलं.. अनेक कथा आहेत संतचरित्रांमध्ये. तेव्हा तोच मोठय़ा आनंदानं भक्ताचा सेवक होतो. तिसरा त्याचा गुण म्हणजे समर्पण. म्हणजे भक्त त्याला शरणागत होतो, समर्पित होतो. पण प्रत्यक्षात भगवंतच भक्ताला समर्पित होतो, आपलं सर्वस्व त्याला देऊन टाकतो!

– चैतन्य प्रेम