07 March 2021

News Flash

१६९. प्रेम सेवा शरण : १

भगवंत हा त्रिगुणातीत आहे. म्हणजे तो गुणरहित आहे का?

भगवंत हा त्रिगुणातीत आहे. म्हणजे तो गुणरहित आहे का? तो गुणरहित असता, तर मग त्याचे गुण अनंत आहेत, या संतोक्तीला अर्थच नसता. तेव्हा तो त्रिगुणातीत आहे याचा अर्थ सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांच्या पलीकडे तो आहे, या गुणांच्या पकडीत तो नाही, तर हे गुण त्याच्या पकडीत आहेत. याचाच अर्थ त्याच्या लीलाचरित्रात सत्त्वगुणांचा प्रत्यय येतो, तसाच तो दुष्प्रवृत्तीच्या नाशासाठी रजोगुणीही होतो आणि प्रसंगी तमोगुणाचाही वापर करतो. तेव्हा त्रिगुणातीत असलेल्या या भगवंताचे प्रेम, सेवा आणि समर्पण हे तीन गुण भक्ताच्या जीवनात विलसताना दिसतात. त्याचं भक्तावर निरतिशय प्रेम असतं, देहबुद्धी हरपलेल्या भक्ताची तो सेवा करतो आणि त्याला तो जणू समर्पितच असतो. तर बाबामहाराज आर्वीकर सांगतात की, ‘‘त्याचे गुण अनंत आहेत, पण तो तुमच्याशी ज्या गुणांनी परिचित आहे; ते गुण म्हणजे प्रेम, सेवा आणि समर्पण हे होत. ते तुम्ही त्याच्याबाबत बाणवून घ्या.’’  आणि आधीच सांगितल्याप्रमाणे या वाक्यात त्याच्याबाबत हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण आपण या गुणांचा अनेकदा जगासाठी अतिरेक करीत असतो. म्हणजे आपण जगावर ‘प्रेम’ करतो, जगाची ‘सेवा’ अर्थात चाकरी, गुलामी करीत असतो आणि जगाला शरण जाऊन म्हणजेच जगाच्या विचाराला, जगाच्या मताला, जगाच्या आवडी-निवडीला शरण जाऊन जग सांगतं आणि अपेक्षितं त्याप्रमाणे वागण्याबाबत काटेकोर असतो. तेव्हा हे गुण आपण जगाबाबत आचरित असतोच, ते आता त्याच्याबाबत म्हणजे भगवंताबाबत आचरणात आणायला बाबामहाराज सांगत आहेत. आता भगवंतावर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हो? कसं प्रेम करायचं त्याच्यावर? त्याची सेवा करायची म्हणजे नेमकी कशी आणि कोणती सेवा करायची? त्याला समर्पित व्हायचं म्हणजे नेमकं कसं राहायचं; असे प्रश्न आपल्या मनात स्वाभाविकपणे उमटतात. यातल्या प्रेमाची थोडी चर्चा आपण बाबामहाराज यांच्या व्याख्येनुसार केलीच आहे. बाबामहाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे त्याचे गुणानुवाद गाणे आणि त्याचे गुणधर्म आणि आज्ञा जीवनात सप्रेम अट्टाहासाने सांभाळणे होय.’’ थोडक्यात, आपलं जीवन त्याच्या आज्ञेनुरूप घडवणं आणि त्याच्याच गुणांना आदर्श मानून ते आपल्या जगण्यात उतरवणं, म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं आहे. आता त्याची ‘सेवा’ म्हणजे काय? आपण मानतो की, तो परमात्मा जगात भरून आहे त्यामुळे जगातल्या दीनदुबळ्यांची सेवा करणं म्हणजे त्याचीच सेवा करणं होय. अनेकानेक संतांनीही तसं सांगितलं आहे, पण या ‘सेवे’त निरपेक्षता, निष्कामता नसेल, तर अहंकार वाढण्याचाच धोका असतो. त्यातून पुन्हा लौकिकात अडकून भगवद्भावापासून दुरावण्याच धोका मोठा. तेव्हा भगवंताची खरी सेवा म्हणजे त्याच्या बोधाचं सेवन आणि त्यानुसार आचरण! स्वामी स्वरूपानंद यांचं उच्छिष्ट म्हणजे त्यांनी उष्टावलेलं अन्नं मिळावं, असा हट्ट एका भक्तानं धरला. तेव्हा स्वामीजी म्हणाले की, ‘‘सद्गुरूचं उष्टं अन्न खाणं म्हणजे उच्छिष्ट खाणं नव्हे, तर त्याच्या मुखातून आलेला जो बोध आहे त्या बोधाचं सेवन करून तसं आचरण करणं, हे खरं उच्छिष्ट सेवन आहे!’’ तेव्हा भक्त म्हणून आपलं जीवन खऱ्या अर्थानं घडवणं आणि ढोंगीपणा सोडून खऱ्या भक्तीपंथाला लागणं, हीच त्याची खरी सेवा आहे!

– चैतन्य प्रेम

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 2:14 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 48
Next Stories
1 १६८. त्रिगुण!
2 १६७. अट्टहास
3 १६६. जशास तसं!
Just Now!
X