15 February 2019

News Flash

१७०. प्रेम सेवा शरण : २

भगवंताला जे आवडतं ते आपल्या जगण्यात आणणं, ही त्याच्यावरील प्रेमाची खरी खूण आहे.

भगवंताला जे आवडतं ते आपल्या जगण्यात आणणं, ही त्याच्यावरील प्रेमाची खरी खूण आहे. भक्त म्हणून आपलं जीवन खऱ्या अर्थानं घडवणं आणि ढोंगीपणा सोडून खऱ्या भक्तीपंथाला लागणं, ही त्याची खरी सेवा आहे आणि सर्व मनोधर्म त्यागून अर्थात मनाच्या आवडी-निवडी, संकल्प-विकल्प, दुराग्रह सोडून त्या परमात्म्याची आवड तीच माझी आवड, त्याचा संकल्प तोच माझा संकल्प, ही स्थिती हेच समर्पण. स्वामी स्वरूपानंद म्हणतात ना? ‘‘मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता!’’ तसं आहे हे. समस्त ‘मी’पणा ओसरावा आणि ‘तू’पणा उरावा. जिथं जिथं ‘परमात्मा’ हा शब्द योजला आहे तिथं तिथं ‘सद्गुरू’च अभिप्रेत आहे. कारण परमात्मा कसा आहे, हे आपण पाहिलेलं नाही. पण त्याच्याशी एकरूप असा जो खरा सद्गुरू आहे, तो आपल्याला पाहता येतो. त्याच्याशी बोलता येतं. त्यामुळे परमात्म्याची इच्छा काय, त्याची आवड काय, त्याचा हेतू काय, हे मला सद्गुरूंच्याच मुखातून सहज ऐकता येऊ शकतं. आता परमात्मा कसा आहे? तो व्यापक आहे, स्वतंत्र आहे, निर्भय आहे, नि:शंक आहे. तेव्हा त्याची आवड, त्याची इच्छा ही व्यापकच असली पाहिजे, संकुचित कशी असेल? भक्तानं परावलंबी जगावं, हे त्याला आवडेल का? त्यानं भयबुद्धीनं जगावं, हे रूचेल का? शंकायुक्त मनानं त्यानं साधना करणं पटेल का? तेव्हा ‘मी’ ओसरणं आणि ‘तू’चं भान येणं म्हणजे संकुचितपणा सुटून व्यापक होणंच आहे. तेव्हा प्रेम, सेवा आणि समर्पण हे तीन गुण भगवंतासाठी आचरणं, याचा अर्थ त्याच्या बोधावर प्रेम असणं, त्या बोधाचं खऱ्या अर्थानं सेवन होणं आणि त्या बोधाला समर्पित असं जीवन घडवणं. या सर्वाचं मूळ आहे प्रेमच. ‘प्रेम सेवा शरण’ या तीन शब्दांचा क्रमही मोठा मनोहारी आहे. जणू प्रेम हे सेवाशरण आाहे, असंच ही शब्दयोजना सांगते! म्हणजे काय? तर प्रेम असेल तर ते शांत बसूच शकत नाही. ते सेवाशरण आहे. म्हणजे सेवेशिवाय ते राहूच शकत नाही. सेवाभावाला ते सर्वार्थानं शरण आहे. मग जगण्यात पदोपदी आपलं आत्मपरीक्षण सुरू होतं. आपल्या मनात येणारे विचारतरंग हे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या विचाराला अनुरूप आहेत का? आपल्याकडून होणारी कृती ही त्याला साजेशी आहे का, याची पडताळणी होऊ लागते. मग जी विसंगती असेल ती दूर कशी होईल, अशी तळमळ लागते. ती विसंगती दूर करण्याची धडपड सुरू होते. कारण प्रेम हे स्वस्थ बसू देत नाही. ते प्रेमविषयाला अनुकूल, अनुरूप होऊ आणि राहू इच्छिते. आणि अगदी व्यवहारातही पाहा. ज्या विचारांवर आपलं प्रेम असतं त्या विचाराला अनुरूप जगणं व्हावं, यासाठी ते प्रेमच कृतीला चालना देतं. मग भगवंताचा विचार हाच जर खरा पूर्ण सद्विचार असेल, आणि त्याच्यावर जर प्रेम जडलं असेल, तर साधकाचं जीवन भौतिकाच्या ओढीत मश्गुल असं राहू शकतं का? नाही. मग तो सद्विचार हा आपल्या जगण्याचा अभिन्न भाग बनावा, यासाठीच्या प्रयत्नांनी त्याचं जगणं व्याप्त होतं. त्यासाठी तो सत्संगात एकरूप होतो आणि सद्शी जोडणारा आंतरिक सत्संग हाच खरा सत्संग असतो. या खऱ्या आंतरिक सत्संगानं सत्कार्याची ओढ लागते. सद् जीवनात उतरवणं, हेच खरं सत्कार्य. तेव्हा असा प्रेम सेवा शरण साधक खऱ्या अर्थानं सद्कडे चालवाट करू लागतो!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

First Published on August 31, 2018 2:46 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 49