खरा सत्संग ऐकताना मनाला जी शांती मिळते, ती सत्संगानंतर जगात वावरताना टिकत का नाही, या प्रश्नाचं उत्तर ऐकायलाही प्रत्येक जण आतुर होता.  सत्पुरुषानं सांगितलं, ‘‘याचं कारण सत्संगाच्या प्रवाहात तुम्ही स्वत:ला विसरता आणि जगात शिरताच परत तुमचा ‘मी’ तुमच्या उरावर बसतो! मग जगातली प्रत्येक गोष्ट या ‘मी’च्याच भिंगातून पाहिली जाते. जे या ‘मी’ला हवंसं वाटतं त्यासाठीच मन तळमळू लागतं. ते जे हवं आहे ते योग्य की अयोग्य, हेसुद्धा समजत नसतं.’’ मग एकानं विचारलं की, ‘‘या काळजीतून सुटणार तरी कसं? काळजी कुणालाही नकोशी असते, तरी आम्ही सर्वच जण काळजी करतो..’’ सत्पुरुष म्हणाले, ‘‘तुम्ही लहानपणापासून जेवढं आठवतं ते आठवून पाहा. प्रत्येक वेळी तुमची काळजी वेगवेगळी नव्हती का? आज विचार करता, त्यातील किती तरी गोष्टींसाठी तेव्हा जी काळजी वाटत होती, जी मनाची तगमग होत होती ती कशी निर्थक होती, हे समजतं ना? कित्येकदा तर गरज नसताना आपण एखाद्या गोष्टीची काळजी करू लागतो. अमुक एक गोष्ट घडणार आहे समजा, तर काय घडेल, याचाच विचार करण्यात कल्पनेच्या इतक्या भराऱ्या मारतो आपण की त्यामुळे मनाची भीती अकारण अधिकच वाढते. तेव्हा काळजीच्या, भीतीच्या चिमटीतून सुटण्यासाठी तरी मनाला जो खऱ्या अर्थानं निर्भय आहे, अशा सत्पुरुषाच्या बोधाची जोड द्या. त्या बोधाचं परिशीलन करा. मनन, चिंतन करा. आपण जे अन्न खातो त्यानंच शरीराला शक्ती लाभत असते. त्या अन्नाचंच रक्त बनतं. टाकाऊ घटक मल-मूत्र, घामावाटे टाकले जातात. अगदी त्याचप्रमाणे बोधान्नाचं सतत श्रवण, मनन, चिंतन करीत गेलं की त्यानंच मनाची शक्ती वाढत जाते. आपल्या अंतरंगात जे जे टाकाऊ आहे, मग तो अविचार असेल, काळजी असेल, भय असेल.. त्याचाही आपोआप निचरा होऊ लागतो. तेव्हा ज्याप्रमाणे अन्न कसं तरी खाऊन नीट पचत नाही त्याचप्रमाणे सत्संग नीट मन लावून श्रवण केला नाही, तर त्याचाही परिणाम झालेला दिसत नाही. जोवर उच्च तत्त्व जोवर जगण्यात जिरवण्याचा अभ्यास होत नाही, तोवर त्या उच्च तत्त्वांनाही काहीच अर्थ नाही. आमची परंपरा थोर असेल, तर आमचा वर्तमानही त्याला साजेसा थोर का नाही, याचा विचार प्रत्येकानं अंतर्मुख होऊन केला पाहिजे. ही अंतर्मुखतेची संधी खरा सत्संग देत असतो. भक्तांची चरित्रं वाचताना, माझ्या जीवनात ते मला का साधत नाही, त्यांच्यासारखा माझा भाव शुद्ध का नाही, हा विचार मनात आलाच पाहिजे. भौतिकात दुसऱ्याची प्रगती पाहून, आपली तशी प्रगती का होत नाही, अशी खंत वाटते. तशीच खंत अशा भक्त चरित्रांनी वाटली पाहिजे. पोथी ही पारायणापुरती नाही. भक्तांची चरित्रं ही नुसती त्यांना हात जोडून त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या पाळण्यापुरती नाहीत, ती आचरणाची प्रेरणा देण्यासाठीच आहेत. जर या दृष्टीनं कोणाही संताचं चरित्र वाचू लागलो, त्यांचे अभंग, त्यांचा बोध वाचू लागलो आणि त्यानं मन जागं होऊ लागलं, तर सत्संगासाठी कुठे आणखी जायलाही नको! जीवनाची चुकीची दिशा, चुकीची रीत जोवर बदलत नाही, तोवर खरा सत्संगच साधलेला नाही, हीच गोष्ट खरी. एकीकडे सत्संगात मन रमवायचं आणि तिथून बाहेर पडताच त्याच मनानं परनिंदा, परद्वेष यात रमायचं, अशी रीत असेल, तर जीवन सत्संगमय कसं होणार? सत्संगात लाभणारी शांती जगण्यात कशी उतरणार?’’