X

१७६. लाभ-योग

समर्थ रामदास म्हणतात, ‘‘जळत हृदय माझे, जन्म कोटय़ानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी!’’

समर्थ रामदास म्हणतात, ‘‘जळत हृदय माझे, जन्म कोटय़ानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी!’’ समर्थानी हे सर्वसामान्य साधकाला अंतर्मुख होता यावं, यासाठीही तळमळून लिहिलं आहे. ‘तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो,’ असं त्यांनी का म्हणावं? पण ते आपल्याला वाटलं पाहिजे, म्हणून त्यांच्या मुखातून आलं. मग लाज वाटून तरी मनात येईल की, समर्थच जर असं म्हणतात तर आपली काय स्थिती आहे? अगदी त्याचप्रमाणे संत सेना महाराज आपल्याकडे तुच्छपणा घेऊन म्हणत आहेत.. ‘‘सेना म्हणे हीनपणें। देवा काय माझें जिणें।।’’ हे म्हणणं म्हणजे आत्मकथन नव्हे. ते तुम्हा-आम्हाला जाणवून देण्यासाठी म्हटलेलं आहे. त्यांच्या या चरणानं आपण खडबडून जागं व्हावं आणि आपल्या जगण्याच्या तऱ्हेकडे थोडं पाहावं. आपलं जिणं कसं आहे? ज्या सद्गुरूंचे आपण म्हणवतो त्यांच्या बोधाला शोभेल, असं आपलं जगणं आहे का, याची तपासणी सुरू व्हावी, यासाठी हा चरण आहे. आपल्या जगण्याचं खरं स्वरूप लक्षात आलं की, अशा जीवनातही सद्गुरूंनी प्रवेश करून आपल्याला शाश्वत आधार दिला आहे, ही जाणीव होईल. मग त्यांच्याविषयीचा भाव हृदयात जागा होईल आणि विकसित होत जाईल. तेव्हा सुरुवातीच्या चरणात म्हटलेला शकुन खऱ्या अर्थानं फळेल! आता याच भावनेशी समांतर असा तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी गायलेल्या या अभंगाचा स्वर अनेकांच्या कानात गुंजत असेल. या अभंगाचा पहिला चरणही सेना महाराजांच्या अभंगाप्रमाणेच सांगतो की, देवाचं चिंतन हृदयात सुरू झालं, हा अवघा म्हणजे पूर्णपणे शकुनच आहे! तर तुकाराम महाराज यांचा हा अभंग प्रथ वाचू. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात :

अवघा तो शकुन।

हृदयीं देवाचे चिंतन।। १।।

येथें नसता वियोग।

लाभा उणें काय मग।।२।।

छंद हरिच्या नामाचा।

शुचिर्भूत सदा वाचा।।३।।

तुका म्हणे हरिच्या दासा।

शुभकाळ अवघ्या दिशा ।।४।।

हृदयात देवाचं चिंतन सुरू होणं, हाच जीवनातला अवघा म्हणजे एकमेव शकुन आहे, असं तुकाराम महाराज सांगत आहेत. या चिंतनानं मन अखंड परमभावातच निमग्न राहतं, त्या परमात्म चिंतनातच बुडून राहातं. म्हणून मग विचारतात, ‘येथे नसता वियोग, लाभा उणें काय मग?’ जर त्या परम सत्तेपासून क्षणमात्रही वियोग नाही, तर मग जीवनात लाभाशिवाय काय आहे? परमलाभात काही उणीव उरेल तरी का? माणूस विचारानं घडतो. जेव्हा आपलं मन संकुचित विचारातच रमू लागतं तेव्हा हळूहळू आपली वृत्ती, आपलं वर्तन, आपला दृष्टिकोन, आपला जीवन व्यवहार हा संकुचितच होत जातो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा विचार हा सदैव व्यापक तत्त्वाशी जोडला जातो तेव्हा हळूहळू आपल्या दृष्टिकोनातला, जीवन व्यवहारातला संकुचितपणा ओसरू लागतो. आपण अपूर्णाचा आधार घेतो आणि त्यातून पूर्ण निश्चिंती मिळेल, असा भ्रम जोपासतो. त्या अपूर्णाच्या प्राप्तीनं खरा लाभ होत नाहीच, मग त्याच्या वियोगानं तरी लाभात काय कमी-अधिक होणार? तेव्हा जो पूर्ण आहे त्याचा जर वियोग नसेल, तर मग अखंड लाभाचीच प्राप्ती होणार, यात काय शंका?

– चैतन्य प्रेम