News Flash

१८०. कर्ता, धर्ता, हर्ता

या अवघ्या चराचराचा विस्तार ॐ या आकारात आहे

या अवघ्या चराचराचा विस्तार ॐ या आकारात आहे आणि त्या आकाराच्या विस्ताराला व्यापून सद्गुरूतत्त्व त्यापुढेही आहेच. अशा या सद्गुरूंची वंदना म्हणजे, ‘‘ॐ नमस्ते गणपतये!’’ गणपती म्हणजे साधकाच्या समस्त इंद्रियगणांचा अधिपती! आपल्या इंद्रियांवर साधकाचा ताबा नाही, पण सद्गुरूबोधानं आणि कृपेनं त्या इंद्रियांद्वारे सुखाशेने जगाकडे जी ओढ असते ती निमू लागते. अर्थात इंद्रियांना वळण लागते. तर अशा माझ्या इंद्रियांना, इंद्रियजन्य कल्पनांना जो वळण लावतो त्या सद्गुरूला नमस्कार असो, हेच ॐ नमस्ते गणपतये, या वचनातून म्हटलं आहे. पुढे म्हणतात, ‘त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि,’ तूच प्रत्यक्ष तत्त्व आहेस! सद्गुरू हा परमतत्त्वाशी एकरूप आणि अभिन्न असतो आणि त्यामुळेच तोच त्या तत्त्वाचं साकार रूप होतो. हा सद्गुरू प्रत्यक्ष असतो अर्थात डोळ्यांना थेट दिसणारा असतो. त्यामुळे त्याला, ‘त्वमेव प्रत्यक्षं तत्वामसि,’ असं म्हटलं आहे. पुढे म्हटलं आहे की, ‘‘त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि।’’ म्हणजे तूच केवळ कर्ता आहेस, तूच केवळ त्राता-धाता आहेस आणि तूच केवळ हर्ता आहेस. आता तूच केवळ कर्ता आहेस, म्हणजे काय? आपण स्वत:ला कर्ता मानत असतो. पण खरं कर्म आपण करतो का? मुळात खरं कर्म कोणतं, तेच आपल्याला कळत नाही. मनाच्या ओढीला जे भावतं, आवडतं, महत्त्वाचं वाटतं ते आपण करीत राहातो. त्यामुळे कर्मबंधनातून सोडवणारं, कर्मपाश तोडणारं कर्म कोणतं आणि ते कसं करावं, हेच आपल्याला कळत नाही. जीवांना जीवदशेतून सोडवत भक्तीपंथाकडे वळवत आसक्तीतून मुक्त करीत नि:संग करणारं आणि त्यायोगे जीवनमुक्ती प्रदान करणारं कर्म केवळ सद्गुरूच करतो. आणि त्यामुळे तोच खरा एकमेव कर्ता आहे! त्वमेव केवलं कर्तासि! मग म्हटलं आहे, त्वमेव केवलं धर्तासि. म्हणजे माझ्या अंतरंगात भक्तीची धारणा तोच टिकवतो. त्या अर्थानं तो मला तारणारा आणि माझं रक्षण करणारा आहे. परिस्थितीच्या चढउतारांनी जिवाचं आधीच चंचल असलेलं मन भयानं वेढलं जाऊन अधिकच अस्थिर होतं. मग सद्गुरू बोधाची धारणा टिकवणं त्याच्या आवाक्यात राहात नाही. त्यावेळी त्याच्यातील आस्था, चिकाटी, धैर्य आणि सत्यदर्शनाची इच्छा टिकवण्याचं, पोसण्याचं कार्य सद्गुरूच पार पाडत असतात. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं धर्ता आहेत. मग या मार्गावर वाटचाल करीत असताना माझ्या अंतरंगातील साधनेला विपरीत अशा ज्या कल्पना आहेत, जे विचार आहेत, ज्या धारणा आहेत त्यांचा नाश सद्गुरू करतात, माझ्या भवदु:खाचं हरण ते करतात आणि म्हणूनच त्यांना ‘‘त्वमेव केवलं हर्तासि,’’ असं म्हटलं आहे. कृती, धारणा आणि नाश अशा या तीन गोष्टींचा संकेत ब्रह्मा (उत्पत्ति), विष्णु (पालन) आणि महेश (नाश) यांच्या सृष्टीविषयक कृतीचंच सूचन करतो. गुरूगीतेतही म्हणूनच सद्गुरूच ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहे, असं म्हटलं आहे. (गुरूब्र्रह्मा गुरूर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:). अर्थात साधकाच्या अंत:करणात भक्तीचं बीज तो ब्रह्मारूपी सद्गुरूच उत्पन्न करतो, त्या बिजाचं पोषण तोच करतो म्हणून तो विष्णुरूप आहे आणि त्या बिजातून अंकुरणारं जे भक्तीमय जीवन आहे त्याच्या पूर्णतेच्या आड जे जे येतं त्याचा नाश करणारा महेशही तोच आहे. म्हणून त्याचं स्मरण म्हणजे त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि!

– चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 1:42 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 52
Next Stories
1 १७९. विस्ताराचा आकार
2 १७८. जुडगा
3 १७७. नाम, प्रेम आणि चिंतन
Just Now!
X