श्रीगणपती अथर्वशीर्षांच्या अखेर फलश्रुतीत म्हटलं आहे की, ‘एतदथर्वर्शीष योधीऽते। स ब्रह्मभूयाय कल्पते। स सर्वविघ्नैर्नबाध्यते। स सर्वत: सुखमेधते। स पंचमहापापात् प्रमुच्यते।’ याचा शब्दश: अर्थ असा की, ‘जो या अथर्वशीर्षांचं अध्ययन करतो, तो ब्रह्मरूपच होतो. त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा उरत नाही. तो सर्वत्र सुखच प्राप्त करतो. तो पंच महापापांपासून मुक्त होतो.’ तर अथर्वशीर्षांचं जो अध्ययन करतो त्याला किती परमलाभ प्राप्त होतो हे सांगितलंय. नीट पाहा.. अथर्वशीर्ष नुसतं वाचायचं नाही. त्याचं अध्ययन करायचं आहे! म्हणजेच त्याचा ध्यानपूर्वक, ध्यासपूर्वक अभ्यास करायचा आहे. सद्गुरू तत्त्वाची व्यापकता आणि महत्ता त्यातून जाणून घ्यायची आहे. सद्गुरूभक्तीचं ते तत्त्वज्ञान जगण्यात उतरवायचं आहे. या अध्ययनाची सुरुवात त्यामुळे ‘अथर्वशीर्ष’ या शब्दापासूनच व्हायला हवी! पारडीतील पं. सातवळेकर यांच्या ‘स्वाध्याय मंडळा’नं अथर्वशीर्षांवर एक पुस्तक काढलं होतं. त्यातलं विवेचन संक्षेपानं जाणून घेऊ. या पुस्तकात म्हटलं आहे की : ‘‘मूळ ‘थर्व’ धातूचा अर्थ ‘चंचल होणे’ असा आहे. त्या चंचलतेचा निषेध करणारा ‘अ-थर्वा’ हा शब्द आहे. म्हणून त्याचा अर्थ शांति, स्थैर्य, अचंचलता होय. मनाची वृत्ती चंचल असते, त्या वृत्तीचा निरोध करून मनाची चंचलता दूर करणे हे योगाने साधायचे असते (योगश्चित्तवृत्तिनिरोध:). हाच चित्तवृत्तीची चंचलता दूर करण्याचा आशय अथर्वा शब्दात आहे. तेव्हा अथर्व शब्दाचा अर्थ निश्चल, शांत तर ‘शीर्ष’ म्हणजे मस्तक, डोके. अर्थात ‘अथर्वशीर्ष’ म्हणजे डोके शांत ठेवण्याची विद्या!’ आता डोकं अशांत कशानं होतं हो? तर आपल्या डोक्यातल्या कल्पनांशी, विचारांशी, धारणांशी, भावनांशी विपरीत असं काही जेव्हा घडतं तेव्हा डोकं अशांत होतं! मन, चित्त भरकटतं. बुद्धी ठिकाणावर राहात नाही. पण हे सर्व घडतं तेव्हा मुळात आपल्या डोक्यातल्या कल्पना, विचार, भावना, धारणा योग्य आहेत का, याचा आपण कधीच विचार करीत नाही! चुकीच्या कल्पनांनुसार आपण वागतो-वावरतो आणि त्यातून बरोबर तेच होईल, असं मानत असतो! बरं ‘बरोबर’ म्हणजे काय? तर आपल्या मनासारखं! तेव्हा मुळात जगण्याचा पायाच कच्चा असल्यानं त्यावर इमारतीचा डोलारा उभा राहात नाही. अर्थात तृप्त समृद्ध जीवन लाभत नाही. मात्र केवळ खरा सद्गुरू हा जिवाच्या डोक्यातील चुकीच्या कल्पना, धारणांची दुरुस्ती करतात. पेठेकाका यांचं वाक्य आहे की, ‘संत आपली दृष्टी बदलण्यासाठी आहेत, सृष्टी बदलण्यासाठी नाहीत. दृष्टी बदलल्याने पुढे आपल्याच कर्माने सृष्टी बदलते!’ अर्थात आपल्याला खुपणारा आपला भवताल संत बदलत नाहीत, तर त्या भवतालाला दु:खकारक बनवणारी आपली वर्तणूक बदलवतात! आपल्या वर्तणुकीचा उगम आपला विचार, आकलन, धारणांतूनच झाला असतो. तेव्हा संत आपला विचार, वृत्ती बदलतात. विचार योग्य झाला की आचार सुधारतो. वृत्ती सुधारली की कृती सुधारते, मग स्थितीही सुधारते. अस्थिरता ओसरते आणि मग डोकंही शांत होतं! तेव्हा डोकं शांत करणारी जर काही विद्या असलीच, तर ती सद्गुरू बोधानुरूप जीवन जगूनच प्राप्त होते. मग त्या बोधानुरूप जीवन जगणं सहज होत गेलं की सद्गुरू एकरूपता विलसू लागते. मग ब्रह्ममयता काही वेगळी आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara loksatta philosophy
First published on: 20-09-2018 at 00:03 IST