जो कोणी या अथर्वशीर्षांचं अध्ययन करील, तो ब्रह्मरूप होईल. ब्रह्म हे सर्वत्र व्यापक अशा तत्त्वाचं निदर्शक आहे. ‘गुरूगीते’त भगवान शंकरांनी सद्गुरू हाच ब्रह्म आहे, असा निर्वाळा दिला आहे. (गुरूर्साक्षात परब्रह्म)  तेव्हा त्या सद्गुरूंच्या बोधानुसार जीवन जगणं सुरू झालं की त्या सद्गुरूंशी एकरूपता येत जाते. माणूस म्हणजे माणसाचा विचार, माणूस त्याच्या विचारदृष्टीतूनच उकलतो. तेव्हा विचारांशी जो एकरूप होतो तो खऱ्या अर्थानं ते विचार ज्याचे आहेत त्या माणसाशी एकरूप होत असतो. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू म्हणजे सद्गुरूंचा देह नव्हे. तर त्यांच्या बोधात, त्यांच्या विचारातच ते आहेत. त्या विचारांनुसार जो जगू लागतो तोच हळुहळू त्यांच्याशी एकरूप होत जातो. अशा साधकाच्या मार्गात कोणतीही विघ्नं येत नाहीत (स सर्वविघ्वैर्नबाध्यते)! आता आपल्या वाटचालीतली बरीचशी विघ्नं आपल्याच चुकांमुळे निर्माण झाली असतात. अंतरंगातील आसक्ती, मोह आणि भ्रमातून जे चुकीचं वर्तन होतं त्यानं आपणच अनेक विघ्नांना ओढवून घेत असतो. जेव्हा सद्गुरूमयतेमुळे त्या आसक्ती, मोह आणि भ्रमाचा  लय होत जाईल तेव्हा मग विघ्नं येतीलच कशाला? तेव्हा हे अथर्वशीर्ष धारण करणं, म्हणजेच सद्गुरूबोधानुसार आचरण सुरू करणं. ते सुरू झालं की ते आचरणच अनेक विघ्नांमागची कारणं नष्ट करील. अशा साधकाच्या वाटय़ाला मग सुखाशिवाय काय येईल? ‘स सर्वत: सुखमेधते’. सध्या आपली सुखाची कल्पना काय असते? तर दु:खाचा अभाव हेच आपलं सुख असतं. खरं सुख आपल्याला उमगत नसतं. बरेचदा दु:खाकडे नेणाऱ्या गोष्टीला आपण सुखदायक आणि सुखाकडे नेणाऱ्या गोष्टीला दु:खदायक मानत असतो! त्यामुळे सुखासाठी अखंड धडपडूनही आपल्या वाटय़ाला बरेचदा दु:खच येतं. खरं सुख कोणतं, हे सद्गुरूंच्या सहवासातच उमगू लागतं. खरं सुख बाह्य़ कारणांवर अवलंबून नाही. ते तसं अवलंबून ठेवलं, तर श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘कारणांचा आनंद कारण आहे तोवरच टिकेल!’ तेव्हा खरं सुख हे आत्मतृप्त जगण्यातंच आहे, हे जाणवू लागतं. हे जगणं साधण्याची प्रक्रिया ज्या बोधानं सुरू होते, त्या बोधाचं चिंतन, मनन अंतरंगात सुरू होतं आणि मग आंतरिक सुखापासून वियोगही होत नाही. अशा स्थितीत जो राहू लागतो त्याची पाचही महापापं नष्ट होतात. (स पंचमहापापात् प्रमुच्यते). ही पाच पापं कोणती? तर, हिंसा, अनाचार, अभक्ष्यभक्षण, चोरी आणि पापांचा संसर्ग, ही पाच महापापं मानतात. सद्गुरूमयतेनं साधक त्यांच्यापासून दुरावतो, असं म्हटलं आहे. त्यातील तीन पापं पाहू. पहिलं पाप आहे हिंसा. आता हिंसा ही कायिक, वाचिक आणि मानसिक असते. त्यातही शरीरानं एखाद्याला दुखावण्याइतकंच वाणीनं दुसऱ्याचं मन दुखावणं हे तितकंच वाईट आहे. ही जाण सद्गुरूबोधानं होत जाते. वाणीवर सद्गुरूमयतेनं संस्कार होतात आणि त्यामुळे हिंसा या पहिल्या पापाशी संबंध कमी होऊ लागतो. अनाचार हादेखील शरीराइतकाच मनाचाही असतो. त्या मनावरही सद्गुरूमयतेचा संस्कार झाल्यानं सदाचारानं जगणारा साधक अनाचाराच्या प्रभावातून मुक्त होत जातो. मग खाऊ नये ते खाण्याला, अर्थात अभक्ष्यभक्षणाला पाप म्हटलं आहे. आता खाणं काही केवळ मुखातून होतं तेवढंच नसतं. डोळ्यांनी जे पाहिलं, कानांनी जे ऐकलं, मनानं जे टिपलं जातं तोही सतत सुरू असलेला आहारच आहे. त्या आहारालाही सद्गुरूमयतेचं वळण लाभतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara loksatta philosophy
First published on: 21-09-2018 at 00:02 IST