साधना ही दिवसभरातील काही तासांपुरती गोष्ट नव्हे. साधना म्हणजे सावधानता! ही सावधानता कशाबद्दलची? तर ज्या आत्मिक उन्नतीच्या हेतूनं आपण अध्यात्माच्या मार्गावर आलो त्या हेतूला सुसंगत असं आपलं जगणं आहे का, याबाबतची ही सावधानता आहे. साधना करीत असताना मनानं उच्च भावनेनं प्रेरित होणं पुरेसं नसतं. उलट साधनेनंतरही जगण्याला सामोरं जात असताना तो उच्च भाव टिकवून ठेवता येणं महत्त्वाचं असतं. ते साधणं सोपं नाही, हा तर आपल्या सर्वाचाच अनुभव आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत, ‘गिधाड खूप उंच उडत असतं, पण लक्ष सगळं असतं ते जमिनीवर कुठं सडका देह पडला आहे का याकडे!’ म्हणजेच ती उंची गाठूनही खरा लाभ झाला का? आपलीही तीच गत असते. साधनेनं, शाब्दिक अध्यात्मज्ञानानं आपल्या मनाची अवस्था कधी कधी उदात्त झाल्यागत आपल्याला वाटतं खरं, तरी आपलं सगळं लक्ष, सगळी जाणीव घोटाळत असते ती आज ना उद्या प्रेतवत होणार असलेल्या आपल्याच देहाभोवती!  मग या आपल्या देहालाच ‘मी’ मानून या देहाचं सुख तेच माझं खरं सुख, या देहाचा मान तोच माझा मान, या देहाचा अपमान तोच माझा अपमान, या भावनेनं आपण वावरत असतो. मग त्या भावनेची मोजपट्टी लावून आपण इतरांचा आपल्याशी होत असलेला वर्तन व्यवहार तपासत असतो. त्यावरूनच कोण आपल्यावर ‘प्रेम’ करतो, कोण खरा आपला आहे, याचे आडाखे बांधत असतो. कुणी आपल्या मनाविरुद्ध वागलं तर उद्विग्न होत असतो. तेव्हा अशा आपल्या या अध्र्याकच्च्या मनाला साधनेत भासणारी उच्च भावावस्था टिकवण्याचा अभ्यास सतत करावाच लागतो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? सदा दक्ष तो साधक! तर ही दक्षता जोपासण्यासाठी साधनेच्या जोडीला चिंतन आणि मनन अत्यंत आवश्यक आहे. हे चिंतन-मनन आध्यात्मिक वाचनातूनच गवसलं किंवा सुरू झालं पाहिजे, असं नव्हे. एखादी पोथी, एखादा अभंग वाचणं आणि मग त्यावर विचार करीत बसणं, म्हणजे चिंतन-मनन नव्हे. चिंतन-मनन ही नित्य प्रक्रिया आहे. हे चिंतन-मनन जगण्यातल्या प्रसंगांपासूनच सुरू झालं पाहिजे. एखादा प्रसंग कसा घडला, त्या प्रसंगाचे काय संस्कार होते, तो आपल्या मनावर काय बिंबवून गेला, त्या प्रसंगातलं आपलं वागणं कसं होतं? या सर्व गोष्टी चिंतन, मननाचा भाग झाल्या पाहिजेत. तरच साधक म्हणून थोडी जडणघडण सुरू होईल. सत्पुरुषांचे काही विचारही आपल्या चिंतनाची पातळी वाढविणारे असतात. त्यामुळे असे विचारही अवश्य वाचले पाहिजेत. मग त्यावर चिंतन-मननही सहज सुरू होतं. पुद्दुचेरीच्या ‘श्रीअरिवद आश्रमा’नं साधकांच्या चिंतनाला वाव देणारी अशी एक अगदी लहानशी पुस्तिका काढली होती. साधनकाळात अशी पुस्तकं आपलं पोषण करीत असतात. या पुस्तिकेतली काही चिंतनं आपण पाहू आणि त्यावर आपल्या अंतरंगात उमटत असलेल्या पडसादांचाही मागोवा घेऊ! यात म्हटलं आहे, ‘सर्व प्रकारच्या उतावीळ कर्माचा त्याग करणे, कोणत्याही प्रकारच्या वादंगात न पडणे, निर्थक गप्पागोष्टी न करणे, कोणत्याही कर्माचा बडेजाव न करणे, त्यातील कष्टांचा बाऊ न करणे, कल्पनावारूवर बसून इकडेतिकडे भटकण्यास मनास मना करणे, स्वतच्या क्षेत्राच्या बाहेर बुद्धीला लुडबुड करू न देणे; या सर्व गोष्टींमुळे परमेश्वरी इच्छेचे अनुसरण सोपे होऊन जाते!’ नीट पाहा. इथं साधक जीवनाचं मुख्य उद्दिष्ट काय असलं पाहिजे आणि ते साधण्यासाठी काय काय केलं पाहिजे, ते स्पष्ट सांगितलं आहे!

– चैतन्य प्रेम