कोणी अध्यात्माच्या मार्गानं मनानं व्यापक होत उन्नत जीवन जगू लागतो तर कुणी सामाजिक, वैचारिक चळवळींच्या मार्गानं मनानं व्यापक होत उन्नत जीवन जगू लागतो. जो अध्यात्माच्या मार्गानं उन्नत जीवन जगत असतो त्याच्या जाणिवा भगवद्भावाच्या चिंतनातून सूक्ष्म आणि व्यापक होत जातात. त्या जाणिवेनं जे ज्ञान आतूनच गवसू लागतं त्याचा आनंद वेगळा असतो. त्या ज्ञानदृष्टीनं त्याला जे दर्शन होतं तेही तितकंच व्यापक असतं. कारण सर्वत्र त्याला भगवंतच दिसू लागतो. तोच त्याच्यासाठी सुष्ट बनून येतो आणि दुष्टही बनून येतो, तोच चांगला बनून येतो आणि वाईटही बनून येतो. तेव्हा त्याला त्या दर्शनातून जे गवसतं त्यातला आनंदही कुणाला समजत नाही. अगदी त्याचप्रमाणे जो सामाजिक विचारानुसार समर्पित जीवन जगत असतो त्याचं जगणंही व्यापकच होतं. त्याच्या जाणिवा या सर्वव्यापी प्रेमभावानं सूक्ष्म आणि व्यापक होत जातात. त्या जाणिवेनंही त्याला मानवतेच्या व्यापक प्रेमाचं जे ज्ञान गवसू लागतं त्या चिंतनातला आनंद वेगळाच असतो. त्या ज्ञानदृष्टीनं त्याला समाजपुरुषाचं जे विराट दर्शन होतं, तेही व्यापकच असतं. तेव्हा कोणीही कोणत्याही क्षेत्रातला वा विचारधारेतला का असेना, तो जर खऱ्या अर्थानं व्यापक झाला तर त्याचं जीवन तितकंच उन्नत होतं. आपण साधनेपुरता विचार करीत असल्यानं साधकापुरतं हे चिंतन पाहात आहोत. तर, साधकाचं जीवन उन्नत, व्यापक असलं पाहिजेच, पण हा व्यापकपणा म्हणजे मूळ उद्दिष्टापासून घसरण मात्र होता कामा नये! कारण सद्गुरूबोधानुरूप जीवन जगणं, हे साधकाचं मुख्य कर्तव्य आहे. तेव्हा त्याचं जीवन अंतरंगातून उन्नत झालं पाहिजे. समाजात वावरताना तो त्याच्या शक्तीनुरूप दुसऱ्यासाठी अवश्य श्रम करील, त्याला अवश्य मदत करील, पण आत्माभ्यासाचं अग्रस्थान ढळू देणार नाही. समाजात वावरतानाही आत्मभान सुटत नसेल, तर मग असा साधक उत्तुंग सामाजिक कार्यही करू शकेल, पण आत्मभान नसेल तर तेच कार्य त्याचा अहंभाव जोपासणारं मुख्य कारण ठरेल आणि संकुचित होत तो पुन्हा अवनत जगू लागेल. तेव्हा दुसऱ्याइतकंच आपलं जीवन घडवण्याकडे साधकाचं अगदी तत्पर आणि काटेकोर लक्ष असलं पाहिजे. स्वामी तुरीयानंद एका संवादात स्वामी विवेकानंद यांची वचनं उद्धृत करताना म्हणतात :  ‘‘स्वामीजी (विवेकानंद) म्हणत असत की- एखादं जीवन घडवणं ही काय साधी गोष्ट का आहे? किती सतर्क राहावं लागतं! चहुकडे किती लक्ष ठेवावं लागतं! लोक भलेही मला त्रास देतील, पण मी मात्र त्यांचं वाईट करणार नाही, असा भाव ठेवावा लागतो. सगळं काही सहन करावं लागतं. हे जीवन म्हणजे काय पोरखेळ आहे? सर्वत्र फक्त जन्म-मरण जन्म-मरण, याचाच प्रवाह वाहत आहे. आणि हा (साधना) म्हणजे तर जीवनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न! जो नेहमी सद्विचार करील तोच त्यातून सहिसलामत बाहेर पडेल.’’ थोडक्यात दक्षता आणि सतर्कता राखूनच जीवनाला वळण लावता येतं, असं स्वामीजी सांगतात. पण ही सतर्कता सगळं सहन करण्यापुरती आणि कशाचाही प्रतिवाद न करण्यापुरती असली पाहिजे, असं वाटून या बोधानं साधकाच्या मनात अनेक शंका-कुशंकाही उसळून येतात!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com