अनुभवानंसुद्धा माणूस शहाणा होत नाही, हीच माया आणि हेच अज्ञान! स्वामी तुरीयानंद म्हणत की, ‘‘मनच माया आहे!’’ कारण हे मन मुक्तीच्या बऱ्याच बाता मारतं, पण प्रत्यक्षात ते मुक्तीच्या आड येतं, ते मुक्त होऊच इच्छित नाही. आपल्या कल्पनेनुसारच्या, आकलनानुसारच्या ‘सुखा’साठी हे मन माणसांवर, वस्तूंवर आणि परिस्थितीवर क्षणोक्षणी अवलंबून असतं आणि ते सगळे आधार सुटणं म्हणजे मुक्ती, या विचारानं त्याला मुक्तीचीच भीती वाटत असते! पण आपण कित्येकदा अनुभवतो की, स्वार्थ हाच या जगाचा प्राणवायू आहे. स्वार्थाशिवाय माणूस जगू शकत नाही. त्याची प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, प्रत्येक विचारतरंग हा स्वार्थानंच प्रेरित असतो. आपला देह आणि मनाच्या सोयीसाठी सदोदित आपण धडपडत असतो. सद्गुरूस्थानी गेलो असताना त्यांच्या लगतच्या खोलीत आम्हा काही गुरुबंधूंची निजण्याची व्यवस्था होती. पहिल्या दिवशी अंथरुणं, पांघरुणं, उश्या अशी व्यवस्था झाली. दुसऱ्या रात्री सद्गुरूंच्या खोलीत जाताना नकळत शेजारच्या खोलीत मन डोकावलंच! कालची आपली झोपण्याची जागा रिकामी आहे ना, त्यावर उशी आहे ना, चादर आहे ना, हे सगळं पाहिल्यावरच मनाला समाधान वाटलं. मग ते ‘ज्ञान’ ग्रहण करण्यासाठी सद्गुरूंच्या खोलीत गेलं! ‘अनंतकोटी ब्रह्माण्ड नायक’ असं ज्यांचं गुणगान करतो त्या सद्गुरूंच्या चरणीही आपल्या व्यवस्थेची काळजी लागत असेल, तर देहसुखाचा लेप किती घट्ट आहे, याची कल्पना यावी. तेव्हा जगात असो की सत्पुरुषाच्या सान्निध्यात, या मनाला नेहमी स्वत:ची आणि ते ज्या देहाच्या आधारावर तग धरून असतं त्या देहाच्या सुखाचीच चिंता लागली असते. मग ते सुख वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर अवलंबून आहे, या भावनेनं ते त्यांना जखडून जगत राहातं, यात काय नवल? पण आधी म्हटल्याप्रमाणे स्वार्थ हाच जगाचा प्राणवायू असल्यानं आपल्या स्वत:सकट सर्वच जण हे स्वार्थानुसार व्यक्त होत असतात. एका मर्यादेपर्यंत माणूस नि:स्वार्थ राहू शकतो. कधी अगदी प्रेमाच्या माणसांसाठी तो मर्यादेबाहेर त्यागही करतो, कष्टही करतो, झीज सोसतो. पण संपूर्णपणे नि:स्वार्थ, निरपेक्ष असा तो होऊ आणि राहू शकत नाही. तेव्हा जगाचा हा वास्तविक स्वभावगुणधर्म समजल्याशिवाय जग-मोहाच्या पकडीतून सुटता येत नाही. जेव्हा जगातल्या माणसाचं, वस्तूंचं आणि परिस्थितीचं सततचं बदलतं रूप लक्षात येतं तेव्हाच त्यांच्यापासून नेहमी एकच प्रकारचं सुख मिळत राहील, या अपेक्षेतला फोलपणाही हळूहळू उमगू लागतो. मग असं काही सुख नाही का, जे बाहेरच्या कुठल्याही कारणावर अवलंबून नाही, हा प्रश्नही मन विचारू लागतं. मग हे जे अकारण सुख अनुभवणं आहे ते आत्मतृप्तीशिवाय शक्य नाही, हीदेखील जाणीव होऊ लागते. ही आत्मतृप्ती जो स्वत: आत्मतृप्त आहे, अशाच्याच संगानं लाभू शकते. जो स्वत:च अतृप्त आहे, तो तृप्तीचा अनुभव काय देणार? जो स्वत:च अपूर्ण आहे तो पूर्णत्वाचा अनुभव कसा देणार? तेव्हा असा जो आत्मतृप्त, आत्मस्थ, आत्मरूप आहे त्या खऱ्या सत्पुरुषाचा, खऱ्या सद्गुरूचा संग हाच मनातलं अज्ञान, भ्रम, मोह, आसक्ती दूर करू शकतो. त्याचा सत्संगच महत्त्वाचा असतो, पण संत तुलसीदास म्हणतात त्याप्रमाणे, सत्संगाशिवाय विवेक होत नाही आणि हा खरा सत्संग परमात्म्याच्या विशेष कृपेशिवाय लाभत नाही!

– चैतन्य प्रेम