संयोग भक्तीचं हृदयंगम चित्र लक्ष्मणानं केलेल्या प्रभु रामांच्या सेवा-व्रतातून दिसतं. इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही ‘सेवा’ नुसती केली किंवा पार पाडली जात नव्हती. त्यात आंतरिक ऐक्यतादेखील सहजतेनं होती. समजा आपल्या मनात एखादी वस्तू उचलण्याचा विचार आला, तर तत्क्षणी आपला हात ती वस्तू उचलतो ना? त्या हाताला सांगावं किंवा विनवावं लागत नाही, की ही वस्तू उचल. लक्ष्मण हा तसा प्रभुंशी एखाद्या अवयवासारखा एकरूप अभिन्न झाला होता. प्रभुंच्या मनात एखादी गोष्ट यायचा अवकाश, लक्ष्मण ती गोष्ट तत्क्षणी पार पाडत होता. लक्ष्मणाप्रमाणे सद्गुरूंचा खरा आंतरिक हेतू ओळखून साधकानंही त्या हेतूपूर्तीच्या कृतीसाठी तत्परतेनं लागणं, ही खरी संयोगभक्ती आहे! खऱ्या सद्गुरूंचा खरा हेतू काय असतो हो? तो असतो शिष्याचं शुद्ध आत्महित! त्या आत्महितासाठी जगाच्या अर्थात भौतिकाच्या प्रभावातून, पकडीतून सुटून निर्भय, नि:शंक, निश्चिंत होण्यासाठी सद्गुरूंनी ऐसांगितलेली साधना करीत राहणं, हेच साधकाचं मुख्य कर्तव्य आहे. संतांचं सांगणं असं की, ही साधना जगण्यापासून वेगळी राहता कामा नये, त्याचं जगणं हीच साधना झाली पाहिजे. म्हणजेच सद्गुरूंच्या बोधाला अनुरूप अशीच जगण्याची तऱ्हा व्हावी, यासाठी त्यानं प्रामाणिकपणे  आत्मपरीक्षण आणि अभ्यास करीत गेलं पाहिजे. साधना म्हणजे नुसतं काही काळापुरतं नाम घेणं, नुसता प्राणायाम करणं, नुसत्या यौगिक क्रिया करणं, नुसतं ध्यानमग्न होणं नव्हे. साधनेचं साध्य काय, याबाबत सजगता असली पाहिजे. आपण का साधना करतो, हे स्वच्छ माहीत असलं पाहिजे. आणि ज्या कारणासाठी साधना करीत आहोत त्या कारणाचं भान सुटत तर नाही ना, याचीही जाग असली पाहिजे. नाहीतर देहानं माळ ओढणं सुरू आहे, पण मन भौतिक सुखंच ओढू पाहात आहे, तर तो खरा जपच नव्हे! देहानं प्राणायाम सुरू आहे, पण भौतिकासाठी प्राण कासावीस होणं तसूभरही कमी झालेलं नाही, तर त्या प्राणायामालाही काही अर्थ नाही. अगदी त्याचप्रमाणे देहानं योगसाधना सुरू आहे, पण मन भौतिकाच्या योगासाठीच व्याकूळ आहे, तर देह ध्यानमग्न भासत आहे, पण खरं ध्यान अर्थात खरा ध्यास भौतिकाच्या लाभाचाच आहे, तर त्या योगाला आणि ध्यानाला काही अर्थ नाही. तेव्हा जर ईश्वराशी एकरूपता हवी असेल, तर नश्वराशी असलेली एकरूपता कमी होत गेली पाहिजे. ईश्वराशी योग हवा असेल, तर नश्वराचा आसक्तीयोग सुटत गेला पाहिजे. थोडक्यात साधना ही शुद्ध आणि खरी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे. तर ती सद्गुरूंची खरी ‘सेवा’ होईल! या सेवेत ‘सेवन’ही अभिप्रेत आहे. म्हणजेच ही सेवा करीत असतानाच सद्गुरूबोधाचं अखंड सेवनही अंत:करणात सुरू असलं पाहिजे. ‘श्रीअवध भूषण रामायणा’त एक दोहा आहे : ‘‘स्वसुख त्यागि सिय राम हित सावधान सब काल। सेवइ मन क्रम बचन ते लछिमन सदा निहाल।।’’ लक्ष्मणाला स्वसुखाची म्हणजे देहसुखाची चिंताच उरली  नव्हती, पर्वा उरली नव्हती. देहबुद्धीमय होण्यात नव्हे, तर सीताराममय होण्यातच खरं हित आहे, हे जाणून लक्ष्मण सर्व काळ सावधान राहात. ‘सावध दक्ष तो साधक,’ अशी समर्थाचीही व्याख्या आहे ना? तेव्हा सावधानता, दक्षता राखणं आणि तीसुद्धा क्षणोक्षणी बरं का, हा साधकाचा मुख्य गुण आहे. पण ही सावधानता कशाची आहे?

– चैतन्य प्रेम