आपलं सगळं जगणंच देहभावानं व्यापून आहे. त्यामुळे जो काही संग आहे तो देहाचाच आहे आणि देहाच्याच आधारापुरता आहे. म्हणजे आपण आपल्या आप्तांसकट सर्व जीवमात्रांना देहानंच ओळखतो. त्यामुळे शरीरच शरीराला भेटतं, शरीरच शरीराला पाहून आनंदी किंवा दु:खी होतं, शरीरच शरीराला टाळू पाहतं किंवा शरीरच शरीराच्या संयोग अथवा वियोगानं सुखी किंवा दु:खी होतं. त्यामुळे सद्गुरूंकडेही आपण देहरूपानंच पाहतो. आणि त्या दिव्य सद्गुरूंचा असा दैहिक पातळीवर जो लाभ असतो ना, तो देह अंतर्धान पावताच संपतो. पण जर आंतरिक पातळीवर संग सुरू झाला असेल, तर तो अंतर्मनातील संगाचा लाभ कायम राहतो. म्हणजे काय? तर जेव्हा त्यांची जीवनदृष्टी तीच आपली जीवनदृष्टी होते, त्यांचा विचार तोच आपला विचार होतो, त्यांची जीवनपद्धती तीच आपली जीवनपद्धती होते, त्यांची धारणा तीच आपली धारणा होते, तेव्हा त्यांच्या आणि माझ्या उद्देशातील विसंगतीही अस्तंगत होते. मग असा जो सहजसंग असतो तो कधीच लोपत नाही. पण आपण देहानं सद्गुरूंपाशी जाऊनही अंतर्मनानं भौतिक जगाच्या ओढीतच गुंतून असतो. त्यामुळे त्यांच्यापाशी जाऊनही देहपातळीवरही त्यांचा संग लाभत नाही, मग आंतरिक संगाची तर गोष्टच दूरची! त्यामुळे खरा आंतरिक संग सदोदित जगाशी सुरू असतो आणि मग जग सोडतानाही जगाचाच संग कायम राहतो आणि म्हणून आपला देह सुटला तरी वासनापुंज कायम राहातो आणि सनातन तत्त्वज्ञानानुसार तो पुन्हा नव्या देहाच्या आधारानं जगात परततो. अपूर्त वासनांच्या पूर्तीसाठी जगण्याचा खेळ पुन्हा सुरू होतो. पुन्हा बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यूचा क्रम उलगडतो. पुन्हा सुख-दु:खं, यश-अपयश, मान-अपमान, लाभ-हानी, संयोग-वियोग अशा द्वैताचा झंझावात सुरू होतो. त्यात ‘मी’च्या सुखासाठी आणि ‘माझे’पण जोपासण्यासाठी अखंड धडपडीत आपण भरडले जातो. जे अस्थिर आहे ते स्थिर राखण्यासाठी आयुष्यभर धडपडतो, पण जे स्थिर आहे त्याकडे एक कटाक्षही टाकत नाही! कबीरदास एका भजनात म्हणतात, ‘‘क्या मांगू कछु थिर न रहई, देखत नैन चला जग जाई!’’ काय मागावं हो परमेश्वराकडे? या जगात कायमचं असं काहीच राहात नाही. काहीच स्थिर राहात नाही. पाहता पाहता डोळ्यांसमोरचं जगही जिथं ओसरून जातं तिथं काय मागावं? जे नश्वर आहे, अशाश्वत  आहे, ते शाश्वत सुख तरी कसं देणार? मग काही काळापुरता या जगात जो वावर आहे त्याचं मोल तरी का जाणून घेऊ नये? ते जो सांगतो आणि त्यानुसार जो आपलं जगणं सार्थकी लावू शकतो, अशा सद्गुरूकडे का जाऊ नये? जो सद्शी सदैव एकरूप आहे अशा त्या सद्गुरूचा संग का अधिकाधिक मिळवू नये? कारण, ‘‘अभी संग जिसका करम बस मिला है, रहेगा हमेशा नहीं संग ये तेरा!’’ हा सत्संगदेखील कायमचा टिकणारा नाही. किती र्वष आपण या चिंतनाच्या माध्यमातूनही भेटत आहोत. हे भेटणंसुद्धा कायमचं टिकणारं आहे का? सांगणारा आणि ऐकणारा, लिहिणारा आणि वाचणारा काळाच्याच पकडीत आहे ना? मग दोघंही जगाचा निरोप घेतीलच. तेव्हा कुठलाही सत्संग कायमचा नाही. मग जोवर जगता येण्याची संधी लाभली आहे, तिचा खरा उपयोग का करून घेऊ नये? जेव्हा असं प्रामाणिकपणे वाटेल तेव्हाच संयोगभक्तीचं मोल उमगू लागेल.

– चैतन्य प्रेम