देह आहे म्हणून या जगात वावर आहे. आणि या देहात प्राण आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. मात्र या देहाला जर सद्गुरूबोधाचं वळण नसेल, तर हाच देह हा मोठा घातक सापळा आहे. ‘श्रीअवध भूषण रामायणा’तही या मनुष्य शरीराला ‘साधन धाम’ म्हटलं आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘‘लाभ मनुज तनु साधन धामा।। साधत हित आतम बिश्रामा।।’’ म्हणजे साधन धाम असलेला मानवी देह मिळाला असेल, तर आत्महित साधून खरी विश्रांती मिळवणे हाच त्याचा खरा लाभ आहे. तेव्हा हा देह साधनेचं घर आहे, म्हणजे काय? तर साधनेसाठी प्रामुख्यानं त्याला राबवायचं आहे. ती खरी साधना कोणती आणि ती कशी साधायची, हे कळण्यासाठी सद्गुरूबोधाचा आधार पाहिजे. या देहाला जर बोधाचं वळण नसेल, तर मग हाच देह घातक सापळा ठरू शकतो. कारण तो मग मनाच्या मागे फरपटत जातो आणि मग देहाच्या सर्व क्षमतांचा वापर मनाच्या आवडी पूर्ण करण्यासाठीच जन्मभर सुरू राहतो. या देहप्राप्तीसाठी देवही कसे तळमळतात, हे रहस्य मांडताना ‘श्री अवध भूषण रामायणा’त म्हटलं आहे की, ‘‘अति दुर्लभ यह मनुज सरीरा।। पाइ मोह बस बिषयहिं कीरा।। करत न सदुपयोग तनु पाए।। दुरुपयोग तम मोह भुलाए।। सुर समूह तरसत तनु एहा।। भोग योनि भोगत निज देहा।। पुन्य छीन सुर बपुहिं बिहाई।। बहुरि विषय भव क्रम भ्रमनाई।।’’ हा अतिदुर्लभ देह प्राप्त होऊनही मोहवश होऊन जीव विषयांतला कीडा होतो. विषय म्हणजे देहसुखासाठीची मनाची ओढ आणि आवड. ती ओढ शमवण्यासाठीच जीव जन्मभर तळमळत प्रयत्न करीत राहतो. त्यामुळे हा देह लाभूनही जीव त्याचा सदुपयोग करीत नाही, तर मोहअंध:कारात भरकटून त्याचा दुरूपयोगच करतो. देवांचे समूहदेखील या मानवी देहाची प्राप्ती व्हावी, म्हणून तळमळत असतात. कारण या देहाच्या आधारे खरी साधना आणि खरी पुण्यप्राप्ती शक्य आहे, ही जाणीव त्यांना झाली असते. कारण पुण्यांशाच्या जोरावरच तर त्यांना देवयोनीची प्राप्ती होऊन स्वर्गलाभ झाला असतो. जेव्हा त्यांचं पुण्य क्षीण होतं तेव्हा त्यांना पुन्हा या द्वंद्वमय जगातच यावं लागतं! ‘गीते’तही भगवंतानं स्पष्ट सांगितलं आहे की, ‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ति’ पुण्य क्षीण झालं की त्या देवतांना पुन्हा मर्त्यलोकात ढकललं जातं! तेव्हा मागे सांगितल्याप्रमाणे नरकाइतकाच स्वर्गही वाईट, कारण तो पुण्यकर्मभोगांत अडकवून ठेवतो. तेव्हा सद्गुरूबोधानुसार जीवन घडवणं आणि स्वर्गसुखही ज्यापुढे फिकं असतं अशा आत्मसुखात स्थित होणं, हाच या देहाचा खरा लाभ आहे. त्यामुळेच भरतांना राम नसलेल्या राज्यात कणमात्र रस नव्हता. रामप्रेमाशिवाय हा देहच व्यर्थ आहे, असाच त्यांचा भाव होता. त्या रामाच्या चरणांची ओढ त्यांच्या मनाला तीव्रपणे लागली होती. भरतजींना जे मंत्री आणि ऋषी राज्य स्वीकारण्यास समजावत होते त्यांना भरत म्हणूनच म्हणाले की, प्रारब्ध माझ्या विरोधात आहे, तुम्ही तरी निदान मला विन्मुख होऊ देऊ नका! ‘‘भयउ जनम एहिं परम अभागी।। सुख स्वरूप रामहिं वन लागी।।’’ या अभागी जिवाचा जन्मच सुखस्वरूप अशा प्रभू रामांना वनात जावं लागावं, यासाठी झाला आहे! एकप्रकारे भरत सांगत आहेत की, सद्तत्त्वाला जीवनातून हद्दपार करून भौतिक राज्य भोगू पाहणाऱ्या जिवाचा जन्मच व्यर्थ आहे. कारण तो सुखस्वरूपाला विन्मुख होऊन दु:खरूप अशा इच्छांच्या सापळ्यातच अडकून पडतो आणि जन्मभर अतृप्तीच भोगत राहतो.

– चैतन्य प्रेम