देवस्थानाचा पुजारी हा साधक वृत्तीनं सदाचरणी आणि तपाचरणी राहिला, तर तो संपर्कात येणाऱ्यांवर आपल्या सहज वर्तणुकीतून आध्यात्मिक संस्कार करू शकतो. पण तोच जर देवाच्या चरणांपेक्षा त्या चरणांवर वाहिल्या जाणाऱ्या दक्षिणेच्या चिंतनात गढू लागला, तर लोकांचा धार्मिकतेवरचा विश्वासच उडू शकतो. मग अध्यात्म प्रेरणा लाभण्याची गोष्ट तर दूरच. तुलसीदासांनी ‘रामचरितमानसा’त म्हटल्याप्रमाणे, सत्तेचा मद कुणाला भ्रमित करीत नाही? सिंहासनावर बसलेल्या राजाची जशी सत्ता असते तशीच त्याच्या राजवाडय़ाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याचीही ‘सत्ता’ असते! कोणताही विशेषाधिकार हा सत्तेचंच रूप असतो आणि अशी विविध मानसिक पातळ्यांवर वावरणारी सत्ताभावना अहंकारच जोपासत असते. मंदिराचा पुजारीही ‘विशेषाधिकार’ भावनेनं फसून आध्यात्मिक परमलाभापासून वंचित होऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे श्रीसद्गुरूंचा सहवास मिळू लागला की, त्यांच्यापाशी सतत राहात असलेल्या साधकाचा काही ‘विशेषाधिकार’ असला पाहिजे, असा इतरांचा समज होऊ लागतो. आणि एकदा इतरांचा असा समज झाला की मग त्या साधकाचा गैरसमज व्हायला कितीसा वेळ लागणार! त्यामुळे जागृत देव आणि पुजारी यांच्या जागी सद्गुरू आणि शिष्य, हे रूपक गृहित धरून पुढील विवरण वाचावं, अशी विनंती आहे. कारण अशा साधकाचं लक्षही सद्गुरू चरणांपाशी न राहता जगाकडे वळतं आणि तोही मग परम लाभापासून वंचित होऊ शकतो. पण असा तो परम लाभापासून समजा वंचित झाला, तरी त्यानं आळवावं कुणाला? अर्थात सद्गुरूलाच! ते आळवणं कसं असतं, याचा हा दाखला आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. इसवी सन १८९१. श्रीवासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी महाराज यांचं वाडीवर विशेष प्रेम होतं. तेथे पुजाऱ्यांकडून अनाचार होऊ नये, याकडे त्यांचं कटाक्षानं लक्ष असे. पुजाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी सावध केलं होतं की, ‘‘तुमच्या वर्तणुकीचा दत्तांना वीट आला आहे. तेव्हा वेळीच आचरण सुधारा!’’ सद्गुरूही जेव्हा साधकाला खडसावून सावध करतात तेव्हा तो जे बोलेल, तेच हा पुजारीवर्गही म्हणाला की, ‘‘महाराज, क्षमा करा. आम्ही आमची चूक सुधारू. पुन्हा असं होणार नाही. आमचं आचरण सुधारू!’’ पण काही दिवसांतच हा निश्चय विस्मृतीत जातो आणि पूर्वीसारखं स्वाभाविक म्हणजे स्वभावानुसारचं आचरण सुरू होतं. जसजशी र्वष सरू लागली तसं महाराजांचं सांगणं विस्मृतीत गेलं. अनाचार बोकाळण्याची भीती निर्माण झाली. मग ती घटना घडली! १९०५मधील चातुर्मासाचे दिवस होते. चातुर्मास हा खरं तर आंतरिक जागृतीचा काळ. आत्माभ्यास करीत आपल्या मनाला सन्मार्गाकडे वळवीत राहण्याचा काळ. अशा चातुर्मासात वाडीत पालखीची प्रथा उत्साहात पार पडे. एकदा पालखी चालली असताना उत्सवमूर्ती एकदम खाली उतरली. पुजाऱ्यांना हा मोठा अपशकुन वाटला. त्यावेळी स्वामी महाराज हिंगोली जिल्ह्य़ात कयाधू नदीच्या काठी नरसी येथे चातुर्मासासाठी थांबले होते. त्यांना शोधत गाणगापूरमार्गे हे पुजारी पोहोचले आणि झाला प्रकार त्यांच्या कानी घालून प्रायश्चित काय, म्हणून विचारलं. या प्रायश्चित्ताच्या निमित्तानं श्रीगुरूदत्तांची आळवणी करणारं एक मोठं भावतन्मय काव्य जन्माला आलं!

– चैतन्य प्रेम