सद्गुरूंमध्ये जी अपरंपार सहनशक्ती असते तिचा आधार घेत काव्याच्या पुढील कडव्यात त्यांना विनवलं आहे. खरं पाहता ‘सहनशक्ती’ हा मानवी मर्यादेतला शब्द झाला. तो सद्गुरूंच्या आंतरिक कळकळीचं प्रकटन करण्यास अतिशय तोकडा आहे. सद्गुरूंशी जेव्हा जेव्हा दूरध्वनीवरून बोलणं होई ते एकीकडे लिहूनही काढत असे. एकदा ती सगळी संभाषणं सहज म्हणून वाचू लागलो आणि उमगलं दर सात-आठ दिवसांनी माझं रडगाणं तेच तेच होतं, भौतिकाला कवटाळणारं होतं. पण त्यांचं प्रत्येक वेळचं समजावणं अगदी कळकळीचं आणि आत्मीय होतं. ते वाचताना वाटलं जर एकच गोष्ट दोन-तीनदा कुणाला समजवावी लागली ना, तर आपण त्याला म्हणू, ‘‘अरे कितीदा तेच तेच सांगू? पुन्हा विचारू नकोस!’’  पण त्यांच्या समजावण्यात या भावनेची सूक्ष्मशी छटादेखील कधीच जाणवली नाही. साईबाबांनी शामाला सांगितलं ना की, ‘‘हा तुझा-माझा चौऱ्याहत्तरावा जन्म आहे!’’ म्हणजे शामाला ते जन्म आठवणं शक्य नव्हतंच, पण बाबांनी त्याचं प्रत्येक जन्मी नुसतं स्मरणच नाही तर सहवासाचं छत्रही कायम राखलं! तेव्हा याला सहनशक्ती म्हणणं फार फार तोकडं आहे. ते अमर्याद वात्सल्यप्रेम आहे. जीवहिताच्या कळकळीची ती परमावधी आहे! त्या कळकळीचं खरं मोल आणि महत्त्व उमगत नसल्यानं ते जे सांगत आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपली वृत्ती तशीच्या तशीच राहते. त्याच त्या चुका घडत राहतात. त्यांनी क्रोधाचा आविर्भाव धारण करताच आपण आपल्या चुकांबाबत सावध होतो. त्यांची क्षमायाचना करू लागतो. पण त्यांचा क्रोध मावळल्याचं भासताच पुन्हा बेसावध होतो. पूर्वीच्याच चुकांमध्ये अडकतो. स्वामी महाराज म्हणतात :

तू नटसा होऊनि कोपी, दंडिताहि आम्ही पापी॥ पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी॥ हे गुरुराया, तू ‘नटसा होऊनि’ म्हणजे एखाद्या नटाप्रमाणे क्रोधाचा आविर्भाव दाखवतोस आणि मग आम्ही क्षमायाचना करतो. पुन्हा ही चूक होऊ देणार नाही, असं परोपरीनं सांगतो. मनातल्या मनात तो निश्चयही करतो. पण तू अगदी दंडित केलंस तरी पुन्हा आम्ही चुकाच करतो! पण तरी तू आमच्यावर संतप्त होऊ नकोस. आता या ‘चुका’ तरी काय असतात हो? तर वारंवार बोध ऐकूनही, त्यांनी सांगितलेली साधना करूनही आणि अध्यात्माचं ‘ज्ञान’ तोंडपाठ होऊनही मनातली जगाची आसक्ती न ओसरणं आणि अहंकारात रुतणं हीच खरी चूक आहे. कारण मग हळूहळू साधनेचं बोटही सुटू लागतंच! आणि ती जाणीव स्वत:ची स्वत:ला होतेच बघा. सर्वच साधकांचा अनुभव आहे की, ते घरातल्या सद्गुरूंच्या छायाचित्रासमोर बसून जप वा साधना करतात. पण ती करीत असताना त्या छायाचित्रातले महाराज कधी कृपास्मित करताना भासतात. कधी उदासीन भासतात तर कधी क्रोधितही वाटतात! छायाचित्र एकच असतं, पण तरी प्रत्येक दिवशी ते वेगवेगळं वाटतं. आपली आंतरिक स्थिती त्या परमशक्तीनं ताडली आहे आणि त्या स्थितीबाबतची प्रतिक्रियाच जणू त्या तसबिरीत प्रतिबिंबित होत आहे, असं वाटतं. त्या क्षणी मन विनवू लागतं, हे गुरुराया, आम्ही असेच सतत चुकत राहणार. पण म्हणून तू संतापून आमच्यापासून दुरावू नकोस. आम्ही सतत चुका करणारे आहोत या कारणास्तव कोप न करता आमच्यावर तुझ्या कृपेचा अविरत वर्षांव कर!

– चैतन्य प्रेम