वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी महाराज यांनी श्रीदत्तांच्या कारुण्याची महत गात त्यांना प्रार्थना करणारं जे पद साकारलं त्याचा वेध आपण घेतला. या पदाचा जन्म नेमका कोणत्या कारणानं झाला, त्याबद्दलचे अन्य प्रवादही आहेत. पण तीर्थस्थानी पुजाऱ्यांच्या अनाचाराने दैवताचा रोष झाल्याने या प्रार्थनेचा जन्म झाला, हे अधिक सयुक्तिक वाटतं. स्वामी महाराजांच्या दोन पत्रांचा आधारही त्याला आहेच, पण कारण कोणतंही का असेना, या पदानं सद्गुरूंबाबतचं एक भावतन्मय स्तोत्र साधकांना लाभलं, हे अधिक महत्त्वाचं आहे. हे स्तोत्र आणखी एक गोष्ट सूचित करतं ती म्हणजे, साधक जरी पदोपदी चुकत असला तरी ज्या चुकीमुळे सद्गुरूंच्या मनात रोष उत्पन्न होईल, अशी कृती परत परत होता कामा नये. ‘शांत हो श्रीगुरुदत्ता’ हे नित्याचं आवाहन होता कामा नये! हे स्तोत्र दररोज अनेक दत्तस्थानी गायलं जातं ते साधकाच्या चित्तावर भावसंस्कार करण्यासाठी, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. याचाच अर्थ जर खरा सद्गुरू लाभला असेल, तर शिष्यानंही खरा शिष्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे! निसर्गदत्त महाराजांना एकानं विचारलं होतं की, ‘खरा गुरू कुठे मिळेल?’ त्यावर ते म्हणाले की, ‘खरा शिष्यच कुठे मिळत नाही हो!’ आणि त्यांच्याच सांगण्याप्रमाणे, शिष्य जर खरा असेल ना, तर तो खोटय़ा गुरुपाशी गेल्यास त्याचा खोटेपणा ओळखू लागतो आणि खऱ्या गुरूच्या प्राप्तीसाठी तळमळू लागतो. पण बरेचदा शिष्यच खरा नसतो त्यामुळे त्यालाही त्याच्याच भ्रम-मोहाची भलामण करणारा गुरू आवडतो. त्या भ्रम-मोहाची नुसती स्तुती करून जो थांबत नाही आणि तो भ्रम-मोह वाढेल अशा भौतिक प्राप्तीला जो चालना देतो तो गुरू तर त्याला ‘अस्सल’ ‘खरा पोचलेला’ ‘खरा सामथ्र्यवान’ वाटतो आणि मग अशाच ठिकाणी लाखो याचकांची गर्दी उसळत असते. मागणारा आणि देणारा दोघं आशाळभूत, दोघं याचकच. मग वाटचाल तरी कशी होणार? तर जर आपण खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचलो असू, तर त्याला रुष्ट न करण्याचा प्रयत्न साधकानं मनापासून केला पाहिजे. आता जो खरा सद्गुरू आहे तो कशानं रुष्ट होईल? तर त्यानं सांगितलेल्या बोधानुसार जो जगत नाही, आंतरिक सुधारणांसाठी तळमळत नाही, जगाची आसक्ती सोडत नाही, दुसऱ्याचा दुस्वास-मत्सर आणि निंदेची सवय त्यागत नाही, अशाश्वतालाच जखडू पाहतो आणि शाश्वताला मनातून दुय्यम मानून दुर्लक्षित करतो; अशा शिष्यावरच खरा सद्गुरू रुष्ट होतो. अनाचार वेगळा काय असतो? दत्तस्थानाचा पुजारी म्हणजे काही एखाद्या देवळापुरता पुजारी नव्हे. साधकाचं अंत:करण हे जर देवाचं म्हणजे खरा दाता असलेल्या सद्गुरूचं मंदिर असेल तर त्या अंत:करणातील परमतत्त्वबोधाला जपणारा साधक हादेखील पुजारीच झाला ना? मग त्याच्याकडून अशाश्वताला शाश्वत मानण्याचा, अशाश्वताला शाश्वतापेक्षा अस्सल मानण्याचा अनाचार घडला तर सद्गुरू रुष्ट नाही होणार? तेव्हा ‘शांत हो श्रीगुरुदत्ता’ हे अंत:करणस्थ सद्गुरूलाही आवाहन आहे. स्वामी महाराज म्हणतात, ‘‘परिहरिसी करुणासिंधो।। तू दीनानाथ सुबंधो।। आम्हां अघलेश न बाधो।। वासुदेव प्रार्थित दत्ता, मम चित्ता शमवी आता!!’’ हे सद्गुरो जगाच्या कुबंधात अडकलेल्या आम्हाला तुमच्या बोधाचा सुबंधच सोडवणार आहे. तुझ्या विस्मरणाच्या पापाचा उरलासुरला वाटाही न बाधो. त्यासाठी हे गुरुराया आमचं चित्तच आता मावळून जाऊ दे!

– चैतन्य प्रेम