माणूस भावनेशिवाय राहू शकत नाही. तो भावनाशील प्राणी आहे. त्याचं सगळं जगणं भावनामय आहे. भावनेनंच तो गुंतला आहे. या भावनेत प्रेमभावनेचा प्रभाव माणसाच्या जीवनावर सर्वाधिक आहे. माणसाला प्रेम करायला आणि प्रेम करवून घ्यायला आवडतं. पण त्याचं हे प्रेम म्हणजे त्याच्या स्वार्थाचाच एक अविष्कार असतो. जे. कृष्णमूर्ती एकदा म्हणाले की, ‘‘माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, असं एखादा माणूस म्हणतो. पण समजा ती बायको त्याला सोडून दुसऱ्या कुणाबरोबर तरी पळून गेली, तर तो तरीही असं म्हणेल का? नाही. तो तिची निंदा करील. मग, ‘माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे,’ या वाक्यातलं प्रेम नेमकं काय होतं? तर जोवर तू माझी आहेस, माझ्यासाठी कष्ट करीत आहेस, मला आधार देत आहेस तोवर माझं तुझ्यावर प्रेम आहे, असाच त्याचा अर्थ नव्हता का?’’ तर माणूस प्रेम करतो त्यामागे त्याचे कोणते ना कोणते सूक्ष्म का होईना, पण स्वार्थजन्य हेतू असतातच. या जगात कुणीही नि:स्वार्थ प्रेम करूच शकत नाही. माणसाचं प्रेम म्हणजे त्याचा व्यवहार असतो. मग ही जी  स्वार्थस्पर्शित प्रेमभावना आहे ना, त्या प्रेमभावनेनंच तो सुरुवातीला सद्गुरूंकडे पाहात असतो. म्हणजे  तो सद्गुरूंना आपल्या स्वार्थपूर्तीचा आधार मानत असतो. त्यांच्याविषयीची खरी शुद्ध भावना जागी होण्याची प्रक्रिया फार दीर्घ असते. त्याआधीच्या टप्प्यातील त्याच्या सर्वसामान्य जगण्याचा विचार केला तर जाणवतं की, भावनेशिवाय माणूस नाही आणि त्याचं सगळं जगणं हे भावनामय असतं. या सर्वसामान्य माणसाच्या भावनामय जगताविषयी गुलाबराव महाराज म्हणतात की, ‘‘जर जगत भावनामय आहे, तर वाईट भावना करून दु:खात का पडावं? चांगली भावना का करू नये?’’ नीट पहा बरं! वाईट भावना करून दु:खात का पडावं, असं विचारतानाच ‘चांगली भावना करून सुख का भोगू नये,’ असं महाराज विचारत नाहीत! म्हणजे माणूस वाईट भावना करून दु:ख अवश्य भोगू शकतो, पण नुसती चांगली भावना करून सुख भोगू शकत नाही! का? कारण तो नुसत्या भावनेनं वा विचारानं सारखी-समाधानी होत नाही. स्वयंघोषित सज्जन असं विचारतातच ना, की मी इतका चांगला आहे तरी माझ्या वाटय़ाला दु:खं का आणि अमका किती नीच वृत्तीचा आहे तरी तो सुख-वैभवात का? याचाच अर्थ आपण चांगले आहोत तर सगळं काही चांगलंच होईल, जो वाईट आहे त्याचं सुखही क्षणभंगूर आहे, असा नुसता विचार करून माणूस समाधानी होत नाही. तेव्हा वाईट भावना करून दु:खात पडण्याची सवय माणसाला जडली आहे आणि म्हणूनच चांगली भावना करायला काय हरकत आहे, असा सवाल गुलाबराव महाराज करीत आहेत. अर्थात, माणसाच्या मनात नुसती चांगली भावना स्थिर होणं पुरेसं नसतं. असद्भावनेच्या जागी सद्भावना निर्माण झाली पाहिजेच, पण सद्भावनेचं पर्यवसान दिव्यभावनेतही झालं पाहिजे. ही जी दिव्यभावना आहे ती ज्याचं लीलाचरित्र दिव्य आहे त्याच्या आधाराशिवाय शक्य नाही. अर्थात सद्गुरूच्या आधाराशिवाय आणि त्यांच्या बोधानुरूप जगणं सुरू झाल्याशिवाय खरी दिव्यभावना उद्भवणं शक्य नाही. त्या दिव्यत्वाशी एकरूप होऊन संकुचितपणाचे सगळे बंध कायमचे नष्ट व्हावेत, यासाठी तळमळणं हेच व्यापकाच्या आधारावर व्यापक होण्याच्या दिशेनं टाकलं जाणारं पहिलं पाऊल आहे.

– चैतन्य प्रेम