25 November 2020

News Flash

२३७. आत्मतृप्त

सामान्य जीवभावानं जगत असताना दिव्यभावना कशी करता येईल?

सामान्य जीवभावानं जगत असताना दिव्यभावना कशी करता येईल? त्या प्रक्रियेचं सूचन गेल्या भागात झालं. आपलं जगणं बरचंसं असद्भावानं व्याप्त आहे. म्हणजेच नकारात्मकतेचा जोर आहे. त्या असद्भावनेत गुंतणाऱ्या मनाला सद्भावनेकडे वळवायचं आहे. मात्र या सद्भावनेचं पर्यवसान दिव्यभावनेत करायचं आहे. अर्थात ही प्रक्रिया अतिशय दीर्घ आणि संथ आहेच. त्यासाठी अभ्यासाची अर्थात मानसिक आणि शारीरिक पातळीवर होत असलेल्या आपल्या प्रत्येक कृतीची छाननी करण्याची गरज आहे. अनवधानानं जगण्याची रीत बदलून अवधानपूर्वक जगू लागायचं आहे. अवधान आलं की अनवधानानं होणाऱ्या अनेक चुका आपोआप टळतील. जेव्हा सद्भावना मनात स्थिरावू लागतील तेव्हा ज्याचं चरित्र सर्वार्थानं दिव्य आहे अशा सद्गुरूंकडे मन वेधलं जाईल. मनात असद्भावनेचा जोर असताना, अशाश्वताचं प्रेम असताना मन त्यांच्याकडे आणि त्यांच्या बोधाकडे वळणं कठीण. तेव्हा जसजशा असद्भावना ओसरू लागतील तसतशी सद्भावना निर्माण होतील. मग सद्प्रेरणाही विलसू लागतील. त्या प्रेरणांनी मनात दिव्यत्वाची आस जागी होईल. मग खऱ्या सद्गुरूंच्या भेटीची तळमळ निर्माण होईल. त्यांचा बोध खऱ्या अर्थानं मनात रुजू लागतो. जीवनाचं बाह्य़ रूप तसंच असतं. आपण त्याच आप्तस्वकीयांसोबत राहात असतो, तोच संसार करीत असतो, पण आतून जागृत होण्याची प्रक्रिया सुरू झाली असते. सामान्य जीवभावाच्या जागी दिव्यभाव हळूहळू निर्माण होत असतो. गोंदवल्याच्या कृष्णाच्या आई एकदा म्हणाल्या, ‘‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हीच तुमची भावंडं आहेत, असं माना आणि जगू लागा!’’ मी थोडासा गोंधळलो, तर म्हणाल्या, ‘‘अहो ज्यांना आपण आपलं मानतो ते काय कायमचे आपले असतात का? जन्मानं निर्माण झालेली आणि या जन्मापुरती टिकणारी नाती ती! तरी त्यात किती आपलेपणा वाटतो. तो आपलेपणा अस्सल असतो का? नाही, कारण त्यांच्यातलं कुणी प्रतिकूल वागू दे, स्वार्थाच्या आड येऊ दे, लगेच नातं तुटतं! मग तसंही जर आपली मान्यता इतकी तकलादू असेल, तर मग सुरुवातीला ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाईला आपले भाऊ आणि बहिण मानायला काय हरकत आहे? प्रपंचात काही चढउतार होऊ देत, मनाला समजवावं की ही माझी या जन्मापुरती लाभलेली माणसं आहेत, पण माझं कायमचं नातं माउलीशी आहे, निवृत्तीनाथांशी आहे, सोपानदेवांशी आहे, मुक्ताबाईशी आहे! त्यांच्याशीच सुखदु:खाच्या गोष्टी कराव्यात, त्यांनाच त्यांचं होण्याची पात्रता यावी, यासाठी प्रार्थना करावी. मनानं कल्पनाच करायची तर मग उत्तुंग का करू नये?’’ त्यांचं सगळं बोलणं काही शब्दश: सांगता येत नाही, पण त्या बोलण्यानंही मनाची पातळी काही काळापुरती का होईना, उंचावली खरी! तेव्हा सर्वसामान्यपणे त्याच चाकोरीत जगत असतानाही मनाला दिव्य सत्पुरुषांच्या विचारांची, बोधाची जोड दिली आणि त्यांच्याशीच मनन, चिंतनानं जोडले जात राहिलो, तर हळुहळू संकुचित विचार, कल्पना ओसरू शकतात. चिंता, भीती, उद्वेग, त्रागा नष्ट होतात असं नाही, पण त्यांचा जोर कमी होऊ लागतो. जगण्यात एक शांतपणा विलसू लागतो.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2018 12:01 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 78
Next Stories
1 २३६. दिव्यभावना
2 २३५. राखणदार
3 २३४. पुजारी
Just Now!
X