धुळ्याजवळच्या सोनगीर या लहानशा गावाचा उल्लेख मागे केला. तेथील केशवदत्त महाराज यांच्या ‘ज्ञानेश्वर वैभव’ या ग्रंथाचाही उल्लेख झाला आहे. त्यात कृष्णचरित्रातील ज्ञात गोष्टींची लक्षात न आलेली वेगळीच बाजू अशी काही प्रकाशमान केली आहे की आपल्या विचारांना चालना मिळते. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘कित्येकवेळी असत्पक्षाकडेसुद्धा थोर आणि कर्मफलत्यागी पुरुष राहू शकतात. असत्पक्षाचा सौभाग्ययोगच म्हटला पाहिजे की कंसाजवळ अक्रूर असतो आणि धृतराष्ट्रपुत्रांजवळ सर्व श्रेष्ठ भीष्मांसारखे वंदनीय पुरुष असतात.’’ कंसाजवळ अक्रूर होता. अक्रूर म्हणजे भक्ती. अक्रूर हा कंसाच्या दरबारात होता. क्रूरकर्मा कंसाच्या दरबारात असूनही तो ‘अ-क्रूर’ होता! त्याच्या मनात भगवान कृष्णाबद्दल अपरंपार प्रेम होतं. पण ते त्यानं व्यक्त कधीच केलं नव्हतं. कृष्णाला मारण्याचे कंसाचे अनेक प्रयत्न फसले तेव्हा त्यानं एक कट रचला. एका यज्ञाच्या निमित्तानं कृष्ण आणि बलरामाला मथुरेला आणावं आणि मग त्यांना ठार करावं, अशी त्याची कुटील योजना होती. कृष्णाला मथुरेला आणण्याची कामगिरी त्यानं अक्रूरावर सोपवली. अक्रूराला ही कामगिरी ऐकून अत्यंत आनंद झाला. कंसाचा डाव त्याला माहीत नव्हता, असं नव्हे! पण कृष्णाच्या सामर्थ्यांवर त्याचा इतका नि:स्सीम विश्वास होता की आता कंसाचा शेवट जवळ आला आहे, हे त्यानं तत्काळ ओळखलं. पण या निमित्तानं का होईना, या तुच्छ जिवाला जीवनात प्रथमच प्रभूंचं दर्शन लाभणार आहे, या विचारानं त्याचं अंत:करण भरून आलं. कधी एकदा गोकुळाला पोहोचतो आणि प्रभूंचं दिव्यमधुर दर्शन घेतो, अशी तळमळ त्याच्या मनात निर्माण झाली. अक्रूर ज्या तळमळीनं प्रभूंना मथुरेला नेण्यासाठी गोकुळात आला होता त्याच गोकुळातून प्रभूंना नेले जात असताना गोपी, नंद, यशोदा यांच्या हृदयातील आर्तताही पराकोटीला गेली होती. प्रभुंवर आंतरिक प्रेम असलेल्या अक्रूराच्या हृदयाला ती भावना भिडली नसती तर नवल. अक्रूराला पाठवण्यामागे कंसाचा काय हेतू आहे, हे कृष्ण जाणत होताच. मथुरेला पोहोचताच प्रभूंनी सर्वप्रथम  आपल्या घराला पदस्पर्शानं पावन करावं, अशी अक्रूराची इच्छा होती. कंसाला मारून मग मी तुझ्याच घरी सर्वप्रथम येईन, असं वचन प्रभूंनी दिलं आणि ते पाळलं. अक्रूर म्हणजे भक्ती. तसंच भीष्म म्हणजे प्रतिज्ञा! निर्धारी बाणा!! असत्पक्षाकडे हे दोघं होते. तसंच माणसाचं अंत:करण म्हणजे प्रारंभी असत्पक्षच तर आहे! पण तरीही त्याच्यात जर या दोहोंपैकी एक गुण असला तर त्याचा सौभाग्ययोग जवळ आल्याशिवाय राहात नाही. एक म्हणजे अक्रूरासारखी आंतरिक भक्ती किंवा भीष्मासारखा निर्धारी बाणा. मग ही भक्ती किंवा निर्धारीपणा भौतिकातला असला तरी हरकत नाही! गोंदवलेकर महाराज म्हणत ना? की व्यसनी आणि हट्टी माणसं मला एकापरीनं आवडतात. कारण केवळ एका गोष्टीसाठी त्यांनी सगळ्या जगाचा विरोध पत्करला असतो. त्यांची हीच आवड जर भगवंताकडे वळवता आली तर मग त्यांची वाटचाल फार वेगानं होऊ शकते! इथं व्यसनाचं समर्थन करायचा मुळीच हेतू नाही, पण भौतिकातलं एखादं पक्कं व्यसन असेल ना, तर ते कधीतरी सुटतंच, पण त्या व्यसनासाठी निग्रहाची जडलेली सवय भगवंताकडे वळवता आली तर खरं आत्मसुख लाभेपर्यंत माणूस शांत बसत नाही. संत ती सवय भगवंताकडे वळवून असत्पक्षाचा भाग्ययोग साधून देतात!

– चैतन्य प्रेम