भगवद्गीतेत भगवान कृष्ण अर्जुनाला आपल्याशी ऐक्य पावण्याचा उपाय सांगतात. आता एक गोष्ट खरी की कृष्णाला अर्जुनानं सगुण रूपात प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्याचं दिव्यमधुर बोलणं, पाहणं, हसणं, ऐकणं आणि वावरणं त्यानं पाहिलं आणि अनुभवलं होतं. त्यामुळे त्या प्रत्यक्ष मधुर रूपाचा अमीट ठसा त्याच्या अंत:करणावर उमटला होता. त्यामुळे कृष्ण प्रत्यक्षात समोर नसतानाही तो त्याच्या स्मरणात सहजतेनं होता. त्यामुळे जो उपाय भगवान सांगत आहेत, तो अर्जुनाला सुसाध्य होता. हा उपाय कोणता? तर प्रभू सांगतात :

यो मां पश्यति सर्वत्र र्सव च मयि पश्यति।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति।।

(अध्याय ६, श्लोक ३०)

या श्लोकाचा अर्थ असा की, ‘‘जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधी दुरावत नाही, तसंच तोही मला कधी दुरावत नाही!’’ आता हे पाहणं म्हणजे काय आहे हो? हे नुसतं डोळ्यानं पाहणं आहे का? तर नाही. हे पाहणं धारणेचंही आहे. म्हणजेच माझ्या वाटय़ाला जी काही परिस्थिती आलेली आहे ती भगवंताच्याच इच्छेनं आली आहे, ही धारणा टिकणं म्हणजे त्यांना सर्वत्र पाहणं आहे. आता इथं जो ‘सर्वत्र’ शब्द आहे ना, तोही अनेक छटांसह आहे. ‘त्र’ म्हणजे तीन. थोडक्यात उत्तम, मध्यम आणि वाईट अशी तीन तऱ्हेची परिस्थिती असो की उत्तम, मध्यम आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसं लाभणं असो; त्या प्रत्येक ठिकाणी जो भगवद्इच्छाच पाहतो ते खरं पाहणं आहे. या ‘सर्वत्र’ पाहण्याबरोबरच ‘र्सव च मयि पश्यति’ म्हणजे या जगात जे जे काही चर अचर आहे ते सारं भगवंतातच सामावलेलं आहे, हेही जो पाहतो असा माझ्यापासून कदापि विभक्त नसल्यानं माझा भक्त असलेला जो आहे तो माझ्यापासून कधीच दुरावत नाही आणि मीदेखील त्याच्यापासून दुरावत नाही, अशी ग्वाही भगवंत देतात. थोडक्यात जे जे काही दिसतं त्यात भगवद्इच्छा पाहणं आणि जे जे दिसतं ते सर्व भगवंतातच सामावलेलं आहे, हे जाणणं महत्त्वाचं आहे. आता मग कुणाला वाटेल की, जगात जे काही वाईट आहे, विध्वंसक आहे, त्याज्य आहे त्यात भगवंताला कसं पाहणार? तर याचं उत्तर दोन प्रकारे देता येईल. पहिली गोष्ट म्हणजे काही वाईट वाटय़ाला आलं असेल, तर ते भगवद्इच्छेनं आहे, हे मानणं म्हणजे काय? तर जी खडतर परिस्थिती आपल्या वाटय़ाला येते ती आपल्याच प्रारब्धकर्मानं आली असते, पण ती भगवंताच्या इच्छेनं वाटय़ाला आली आहे, अशी धारणा निर्माण झाली, तर त्यात खचून न जाता त्या परिस्थितीत जे कर्तव्यं करणं आवश्यक आहे ते करून मनाला मोकळं ठेवण्याचा अभ्यास करता येतो. त्याचबरोबर हे ही खरं की, आपले अनेक प्रारब्धभोग सद्गुरू कृपेनं कमी झाले असतात. तरीही मग जे खडतर भोग वाटय़ाला आले आहेत तर ते माझा, माझ्या मानसिक क्षमतांचा, धैर्याचा, सहनशक्तीचा कस लागावा, या त्यांच्याच इच्छेनं माझ्या वाटय़ाला आले आहेत, या दृष्टीनंही त्या भोगांकडे पाहता येईल. तेव्हा त्या खडतर परिस्थितीशी झगडतानाच मन स्मरण साधनेकडे वळविण्याचा अभ्यास करता येईल. आता वाईटातही त्यांना कसं पाहावं? कारण राम थोडाफार तरी समजतो, रावणातला राम उमगत नाही!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com