जो माझा भक्त मला सर्वत्र पाहतो तो माझ्यापासून आणि मी त्याच्यापासून दुरावत नाही, असं भगवंत सांगतात. सर्वत्र या शब्दाचा, ‘उत्तम, मध्यम आणि वाईट’ हा अर्थ आपण गेल्या वेळी पाहिला. तेव्हा परिस्थिती उत्तम असो, मध्यम असो की वाईट असो; ती माझ्याच इच्छेनं आली आहे, असं जो मानतो तो आणि मी एकमेकांपासून दुरावत नाही, असंही भगवंत सांगतात. जो आयुष्यातील उत्तम, मध्यम आणि वाईट माणसांबरोबर वावरत असतानाही भगवंताच्याच इच्छेनं ही माणसं वाटय़ाला आली आहेत, असं मानून त्यांच्याविषयी आवश्यक ती कर्तव्यं तेवढी करतो पण त्यांच्या प्रेमात किंवा द्वेषात अडकून वाहवत जात नाही, त्यांच्याविषयीची कर्तव्यं पार पाडून जो मनानं मोकळा राहून माझ्याच चिंतन, मनन, ध्यान आणि विचारात रममाण असतो तो भक्त मला दुरावत नाही, असंही भगवंत सांगतात. आता वाईट माणसांतही जो मला पाहतो तोही माझ्यापासून दुरावत नाही, हे म्हणण्याचं तात्पर्य काय असावं, हा मुद्दा गेल्या वेळी उपस्थित झाला होता. त्याचा विचार आपण करीत आहोत. चांगुलपणावर आपला किती विश्वास आहे आणि आपण खरंच चांगले आहोत का, याची परीक्षा भगवंत वाईट माणसाच्या रूपानं किंवा निमित्तानं घेत असतो, अशीही अर्थछटा आहे. ‘अवधभूषण रामायणा’त सर्व काही रामच झाला आहे, असं सांगताना रावण हादेखील रामच आहे, असं मांडताना म्हटलं आहे की, ‘‘स्वयं राम रावनहिं स्वरूपा।। दीन्हेउ जीवहिं सीख अनूपा।। करु गुमान जनि प्रभुता पाई।। प्रभु अहार मद अवसि नसाई।।’’ म्हणजे, ‘‘त्याच परम परमात्मा रामाने रावणाचे स्वरूप धारण करून हा बोध केला आहे की, हे जीवात्म्यांनो, अहंकारात बुडून तुम्ही कितीही ऐश्वर्य प्राप्त केलंत आणि सामथ्र्य मिळवलंत, तरी गर्वानं फुगून जाऊ नका. कारण अहंकार हाच प्रभुंचा आहार आहे! तो अवश्य नष्ट होतो!!’’ अर्थात अहंकार हा कसा आत्मघातक असतो, परमात्म्याविरोधात संघर्षांसाठी उभं ठाकण्याचं बळ तुच्छ जिवाला देऊन तो त्याचा कसा अध:पात करतो, हा बोध रामानंच रावणाचं रूप धारण करून शिकवला आहे! तेव्हा चांगल्याचा आदर्श जसा आवश्यक असतो तसाच वाईटाचा दाखलाही आवश्यक असतो. संतांची चरित्रं चांगुलपणाचं महत्त्व बिंबवणारे सूक्ष्म संस्कार करतात, तर दुर्जनांची चरित्रं ही वाईटाकडे असलेला ओढा अखेरीस कसा आत्मघातक होतो, हे मनावर ठसवतात. अर्थात एवढय़ानं आपला वाईटाकडे असलेला ओढा संपत नसला, तरी सर्वमांगल्याच्या इच्छेचं बीजही रोवलं जातं. मग जगात जे काही आहे ते भगवत्सत्तेनं आहे. मग ते चांगलं असो की वाईट. प्रत्येकाचं अस्तित्व आहे आणि जे जे अस्तित्वात आहे त्या प्रत्येक अस्तित्वाचा नाशही आहे, हे सत्य मनात प्रकाशित होऊ लागतं. सर्व अस्तित्वाला कारणीभूत चैतन्यशक्तीच आहे. तोच भगवंत. वीज समान असते. ती दिवे प्रकाशित करते तेव्हा अनेकांना प्रकाश देते आणि तिच्याच प्रवाहाचा धक्का लागला तर अनेक जीवनं उद्ध्वस्त होतात. तेव्हा शक्ती एकच, तिचा वापर, तिचं प्रकटीकरण हे ‘चांगलं’ आणि ‘वाईट’ अशा दोन टोकांचं होऊ शकतं. पण म्हणून मुळात वीज स्वत:हून ‘चांगली’ किंवा ‘वाईट’ असते का? अगदी त्याचप्रमाणे सज्जन आणि दुर्जन या दोघांचं जगणं चैतन्यशक्तीवरच अवलंबून असतं, पण म्हणून ती चैतन्यशक्ती ‘सज्जन’ किंवा ‘दुर्जन’ नसते!

– चैतन्य प्रेम