25 November 2020

News Flash

२५३. स्मरणानंद

श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हैसूरला गेले होते.

श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हैसूरला गेले होते. हुच्चुराव म्हणून एक भक्त बरोबर होते. श्रीमहाराज एका शिल्पकाराकडे गेले होते. तिथं काही तयार मूर्ती, काही अर्धवट मूर्ती, काही नुसते दगड पडले होते. श्रीमहाराज म्हणाले, माझ्याकडे येणाऱ्या माणसांना मी असंच करतो. काही या जन्मात, काही पुढच्या जन्मात तयार करतो. कारण त्यांना सहन झालं पाहिजे ना? देह शुद्ध, लायक पाहिजे ना? तो तसा नसेल, तर पुन्हा जन्म! (संदर्भ – सत्संग, पृ. ६२). मग थोडा विचार करा, त्या मूर्तीकाराकडे पाषाणातून घडवलेली, पूर्ण झालेली मूर्ती जर मूर्ती घडविण्यासाठी पडून असलेल्या पाषाणाकडे पाहून हसली किंवा त्या पाषाणाला तुच्छ मानू लागली, तर कसं होईल? अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराच्या दयेसाठी त्याच्या द्वारी आलेल्या एखाद्या सामान्य माणसाकडे किंवा तथाकथित दुर्जनाकडे, अध्यात्माच्या मार्गावर आलेल्यानं तुच्छतेनं पाहणं आहे. मुळात साधना ही स्वत:साठी आणि स्वत:पुरती गोष्ट आहे. आपल्यात किती पालट झाला, याकडेच आपलं लक्ष पाहिजे. आपल्यातला पालट स्वबळावर होणारा नाही, यात शंकाच नाही. केवळ सद्गुरूकृपेनंच तो होणार आहे, तरीही प्रयत्न मात्र आपल्याला करावे लागतील. त्यातून पालटासाठीची आपली तयारी, आपला होकार दिसतो. त्या प्रयत्नांसाठी आपण आपला वेळ आणि मन दिलं पाहिजे. सुरुवातीला थोडा वेळ आणि मनही अगदी थोडं थोडं दिलं जाईल! पण तरी हरकत नाही. भगवंतानं तर ‘निमिषभरा’चीही तयारी दाखवली आहेच! एक निमिषभर तरी मनापासून मला दे, असं त्यानं सांगितलं आहे. मग त्या निमिषमात्र क्षणाच्याच आधारावर  माणसाला आपल्याकडे हळुहळू वळवायचं आणि अगदी आपलंसं करायचं, अशी ही भगवंताची प्रक्रिया आहे. गढूळ पाण्यात तुरटीचा छोटासा खडा फिरतो आणि पाणी स्वच्छ करतो. तसंच गढूळ चित्तात भगवंताच्या स्मरणाची तुरटी जितकी फिरते तितकं चित्त स्वच्छ होऊ लागतं. तेव्हा हे स्मरण रुजवणं हीच आपली साधना आहे. आता भगवंताचं स्मरण म्हणजे संकुचित ‘मी’चं विस्मरण. त्यासाठी मनाचा निर्धार मात्र पाहिजे. तो शिकावा तुकाराम महाराजांकडून. त्यांचा अभंगच आहे :

देह तव आहे प्रारब्धा अधीन।

याचा मी कां शीण वाहू भार।।१।।

सरो माझा काळ तुझिया चिंतनें।

काया वाचा मनें इच्छितसे।।२।।

लाभ तो न दिसे आणिक दुसरा।

कृपेच्या दातारा येणें जन्में।।३।।

तुका म्हणे आलो सोशीत संकटें।

मी माझें वोखटे आहे देवा।।४।।

हे देवा, माझा देह प्रारब्धाच्या अधीन आहे, पण मी का त्या प्रारब्धा अधीन रहावं? छे! मी त्या प्रारब्धभोगाचा भार मनात घेऊन व्यर्थ शीण भोगणार नाही. काया-वाचा-मने माझा सर्व काळ केवळ तुझ्या चिंतनात सरावा, असंच मी इच्छित आहे. हे कृपेच्या दातारा, या जन्माचा दुसरा काही लाभ आहे, असं मला वाटतच नाही. हे ‘मी’ आणि ‘माझे’ खोटंच आहे आणि त्या मिथ्या ‘मी’ आणि ‘माझे’पायी अनंत जन्मांपासून मी केवळ संकटच सोसत आलो आहे. आता हा जन्म तरी तुझ्या स्मरणानंदात सरावा! भगवंताचं स्मरण म्हणजे त्याचं ऐक्यच. हे सदर आता संपलं, पण ऐक्यतेची इच्छा संपलेली नाही. पुढील वर्षी म्हणजे उद्यापासूनच त्या ऐक्याचा पाठ आपण गिरवणार आहोत.. एकात्मयोग!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:07 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 84
Next Stories
1 २५२. अधिकार : ३
2 २५१. अधिकार : २
3 २५०. अधिकार : १
Just Now!
X