सदगुरूंचा सहवास ज्यांना ज्यांना लाभत असतो त्या सहवासाच्या आठवणी जितक्या मनोरम्य असतात तितक्याच त्या प्रेरकही असतात. प्रत्यक्ष प्रसंग घडतो तेव्हा तो सहजसाधासा वाटतो. जसजसा काळ सरतो तसतशी त्या प्रसंगातली गोडीही वाढत जाते आणि अनेकांसाठी ते प्रसंग बोधप्रदही ठरतात. म्हणूनच अशा आठवणी लिहून ठेवणारे प्रसिद्ध असोत की अप्रसिद्ध, त्या आठवणींना मोठंच मोल असतं. मला अशा आठवणी वाचायला खूप आवडतात कारण त्यातूनच सद्गुरूंच्या मधुर चरित्राच्या अनेकानेक ज्ञात-अज्ञात छटा प्रकाशित होत असतात. मालवण येथील हेमलता ऊर्फ प्रभाताई काळे यांनी ‘माझ्या आठवणीतील कलावती आई’ या नावाची छोटीशी पुस्तिका लिहिली आहे. त्यातला एक प्रसंग मोठा उद्बोधक आहे आणि सद्गुरूंच्या सर्वज्ञतेचं दर्शन घडविणारा आहे. साधकानं आपल्या कमाईतला किमान दहा टक्के हिस्सा हा देवासाठी खर्च केला पाहिजे, असा कलावती आईंचा दंडक होता. शिष्याच्या प्रपंचाची घडी बसवण्यात आणि त्याची जमा लक्षात घेऊन त्यानं खर्च कितपत केला पाहिजे  आणि त्यात दहा टक्के देवासाठीचा खर्च कुठे केला पाहिजे, याची आखणी करण्यातही आई साह्य़ करीत. बेळगावी हरिमंदिरात येण्याजाण्याचा खर्चही त्यात अंतर्भूत केला जात असे. प्रभाताई लिहितात : एकदा शिरोडय़ाला आम्ही नवीन बिऱ्हाड केलं. आईंनी स्वत: खर्चाचं अंदाजपत्रक करून दिलं होतं. सत्तर रुपये पगार होता. मिळकतीतला दहावा हिस्सा हा देवासाठी खर्च करावा, असे आईंचे सांगणे होते. त्यामुळे दरमहा सात रुपये आम्ही मंदिरात पाठवत असू. या नियोजनात गोकुळाष्टमीच्या उत्सवाला हरिमंदिरात जाण्यासाठी गाडीभाडय़ाची तरतूद म्हणून एक रुपया वेगळा ठेवला जात असे. कारण त्यावेळी दोन माणसांना जाऊन येऊन बारा रुपये खर्च येत असे. त्यामुळे दरमहा एक रुपया याप्रमाणे जे बारा रुपये वाचत असत ते असे जमा होत असत. एकदा माझ्या सासूबाई ज्येष्ठ महिन्यात आमच्याकडे राहण्यास आल्या होत्या आणि जाताना त्यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली. आमच्याकडे पैसे अजिबात नव्हते, पण त्या हट्टालाच पेटल्या. तेव्हा मंदिरात जाण्यासाठी बाजूला ठेवलेले दरमहा एक याप्रमाणे दहा रुपये तोवर जमले होते. पती मला म्हणाले की, ‘‘हेच पैसे आता आईला देऊ. शेवटी ही आई काय आणि ती आई काय? एकच! तेव्हा आता पैसे देऊ, मग काय करायचं ते पाहू.’’ सासूबाई त्यांच्या गावी गेल्या. त्यानंतर त्याच महिन्यात मी खूप आजारी पडले. मुलगा लहान, घरात करणारं कुणी नाही. मुलाची आणि पतीची खाण्याचीही आबाळ होऊ लागली. सासूबाईंना सर्व परिस्थिती कळवली आणि थोडय़ा दिवसांसाठी यायला सांगितले, पण त्या काही आल्या नाहीत. आजार उतरत नव्हता. कलावती आई त्यावेळी देशी औषधेही देत असत. मला त्यांच्या औषधाचा गुण येत असे. योगायोगानं एक विद्यार्थी बेळगावला सुटीत जाणार होता. त्याच्याबरोबर कलावती आईंना आजाराची माहिती देणारे पत्र पतीने पाठवले. आईंनी औषध त्वरेने पाठवले आणि ते कसं घ्यायचं, हेही लिहून पाठवलं. सोबत एक कागद होता आणि त्यावर कलावती आईंनी लिहिलं होतं, ‘‘ही आई काय आणि ती आई काय!’’ थोडक्यात आईइतकं निस्वार्थ प्रेम जगात अन्य कुणाचंही नसलं तरीही, सद्गुरूमाउलीच्या वात्सल्याची तुलना जगातल्या कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही!

Struggle of women in Borpada village of Trimbakeshwar taluka for water
कशासाठी ? हंडाभर पाण्यासाठी…
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास
Raju Shetty
शेतकरी, कामगारांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी विजयी करा – राजू शेट्टी यांचे आवाहन