अभी संग जिसका करमबस मिला है, रहेगा हमेशा नहीं संग ये तेरा! आता जो संग तुम्हाला लाभला आहे, तो तुमच्याच कर्मामुळे आहे. तो संग कायमचा राहाणारा नाही. आता यातला जो संग आहे तो जगाचा आहे, हे खरं. म्हणजे जगाशी, जगातल्या लोकांशी आणि अगदी आपलेपणानं ज्यांना आपण कवटाळून राहू पाहतो त्या आप्तांशीही आपला जो संग आहे आपापल्या कर्मानुसार घडलेला आहे. म्हणजे कुणाशी काही देणंघेणं बाकी आहे, कुणाला त्यांचं प्रेम परत द्यायचं आहे आणि कुणाला दिलेला त्रास या जन्मी भोगायचा आहे.. पण जेव्हा हे देणंघेणं संपतं तेव्हा हा संगही उरत नाही. सद्गुरूंशी जो संग घडतो, तो मात्र काही कोणत्या कर्माचं फळ नाही. तो केवळ त्यांच्या कृपेनंच साधला आहे. पण तरीही ‘रहेगा हमेशा नहीं संग ये तेरा’ हे सूत्र या संगालाही लागू आहे बरं! म्हणजेच हा सत्संगही कायमचा लाभेल, असा भ्रम बाळगू नका! कारण ज्या देहाच्या आधारावर तुम्ही सद्गुरूंकडे जाता आणि ज्या देहाद्वारे ते या जगात वावरत आहेत, त्या देहांना निसर्गनियमानुसार काळाची मर्यादा आहेच. श्रीगोंदवलेकर महाराज यांनी देह ठेवला ती वार्ता कळताच ब्रह्मानंद बुवा कळवळून म्हणाले, ‘‘अवघ्या दोन आण्यांत परब्रह्म पाहता येत होतं तो योग आता उरला नाही!’’ आता ब्रह्मानंदांसारखे जे अनन्य शिष्य असतात ना, त्यांचा सद्गुरूंशी असलेला आंतरिक संग कधीच ओसरत नाही. पण किती मोठा लाभ आपल्याला सहजपणे प्राप्त होत होता आणि आता किती मोठय़ा लाभाला आपण आता अंतरलो आहोत, हे इतरांना उमगावं यासाठीच अंतर्हृदयातून कळवळून आलेलं हे वाक्य आहे! गिरगावात राहणारे एक साधक एकदा दु:खानं म्हणाले, ‘‘दोन गल्ल्या सोडून निसर्गदत्त महाराज राहात होते. त्यांच्याकडे एखाद दिवस जाऊच, असं मी ठरवत असे. पण ते काही झालं नाही. ते गेल्यावर आता त्यांची पुस्तकं वाचतो तेव्हा खूप वाईट वाटतं की, किती मोठा लाभ मी गमावला!’’ आता खरं सांगायचं तर वास्तव हे की मी ठरवून काही सद्गुरूपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकंच नव्हे, तर पोहोचूनही मी तिथं पोहोचलो असतो का, हा खरा प्रश्न आहे. एकदा सद्गुरूंना म्हणालो की, ‘‘गोंदवल्यात समाधीस्थानी अनुग्रहाची एक विशिष्ट वेळ असते. त्या वेळी महाराज खरंच तिथे असतात का?’’ त्यावर उसळून ते म्हणाले, ‘‘आधी तुम्ही तिथे असता का, हे सांगा!’’ निसर्गदत्त महाराज यांना एक साधक म्हणाले की, ‘‘आम्ही इथे अनेकवार येतो तरीही आमच्या स्थितीत काहीच बदल का होत नाही? कुठं चुकतो आम्ही?’’ त्यावर महाराज म्हणाले की, ‘‘तुम्ही अजून इथं पोहोचलातच नाही आहात! जिथं मी आहे तिथं पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला लगेच खेचून घेईन, पण तुम्ही एक पाऊल तर टाका!’’ म्हणजे काय? आपण ‘सत्संगा’त आहोत असं मानतो, सद्गुरूंपाशी जातो, पण देहानं. खऱ्या अर्थानं अंत:करणपूर्वक आपण त्या संगाचा लाभ घेतो का? तो घेत नाही. आणि देहानं जो लाभ असतो तो देह ओसरताच संपतो. अंतर्मनाचा लाभ कायम राहतो, पण आपण देहानं सद्गुरूंपाशी जाऊनही अंतर्मनानं जगातच असतो ना? त्यामुळे जग सोडतानाही जगाचाच संग कायम राहतो आणि सत्संगाच्या सहजलाभावर आम्हीच कधीचं पाणी सोडलेलं असतं!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com