गणपती हे विठुरायाच्या जोडीनं महाराष्ट्राचं एक मानस दैवत! तशी दत्तभक्तीची, नाथसंप्रदायाची परंपराही या भूमीत बहरली आहे. पण विठ्ठल आणि गणपती यांच्याविषयी असलेला आत्मीय भाव काही वेगळाच. धर्म, धर्माची प्रतीकं, देव, देवांची रूपकं या गोष्टी खरं तर जिवाच्या अंतरंगावर भावजागृतीचे  आणि भावपोषणाचे संस्कार करीत असतात. त्या संस्कारांनी पक्व होत माणूस जसजसा अध्यात्माच्या मार्गावर वळतो आणि खऱ्या सद्गुरूच्या बोधानुसार जगत प्रामाणिकपणे चालूही लागतो तेव्हा हीच रूपकं वेगळेपणानं त्याच्या अंत:करणाला स्पर्श करू लागतात.  मग धर्माचा खरा अर्थ त्या बोधाची धारणा आणि आचरण हाच होतो. धर्माची प्रतीकंही त्याच बोधाची आठवण जागृत ठेवणारी माध्यमं वाटू लागतात. जो देतो तो देव असेल, तर कधीही नष्ट न होणारं शाश्वत असं ज्ञान देणारा सद्गुरू हाच खरा दाता अर्थात देव वाटू लागतो. मग कोणत्याही मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होताना त्या मूर्तीच्या जागी सद्गुरूरूपच जाणवू लागतं. मग आजवर वाचलेली अनेक स्तोत्रं  तरी मागे कशी राहतील? तीदेखील वेगळा अर्थ प्रकट करू लागतात. अशाच एका प्राचीन स्तोत्रातून झळकणारा, सद्गुरूमहिमा आपण आजपासून जाणून घेऊ. अर्थात संपूर्ण स्तोत्राचं चिंतन केलं तर उरलेले दिवसही पुरणार नाहीत! त्यामुळे स्तोत्राचा काही भाग आपण पाहणार आहोत. हे स्तोत्र आहे आपल्याला अगदी चिरपरिचित असलेलं.. गणपति अथर्वशीर्ष! साधकाच्या मनोदृष्टीतून ते आता पाहू.. स्तोत्राची सुरुवात अशी आहे:

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि। त्वमेव र्सव खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्मासिनित्यम्।।

ॐ नमस्ते गणपतये! मागे ‘स्वरूप चिंतन’ या सदरात ‘ॐ’ हा सद्गुरूस्वरूपाचाच संकेत कसा आहे, याचं विवेचन आपण पाहिलं होतं. पण हा ‘ॐ’ आहे काय? तर तो या दृश्य-अदृश्य, स्थूल-सूक्ष्म, साकार-निराकार, सगुण-निर्गुण अशा चराचराचा नकाशाच आहे! पण तो पाहणार कोण? साधी गोष्ट आहे. आपल्या चार भिंतींतल्या प्रपंचात आपण इतके अडकून असतो की त्याकडे आपल्याला अलिप्तपणे पाहता येत नाही. जेव्हा त्या प्रपंचापलीकडे आपण जाऊ, म्हणजेच प्रपंचात असूनही त्यात न गुंतता त्यापलीकडे आपली आकलनाची कक्षा जाईल तेव्हाच त्या प्रपंचाचं खरं रूप आपल्याला दिसू शकेल. अगदी त्याचप्रमाणे अनंत ब्रह्माण्डांनी युक्त अशा या चराचराच्या पसाऱ्यात राहूनही जो त्यापलीकडे जाऊ शकेल, त्यालाच हा पसारा नेमका कसा विस्तारला आहे, ते दिसू शकेल. इतका विरक्त शिवाशिवाय दुसरा कोण आहे? तेव्हा भगवान शंकरानं या विराट चराचराचं रूप पाहिलं आणि ते ‘ॐ’ आकारात त्याला दिसलं. तेव्हापासून चराचरातल्या कणाकणात रममाण असं जे परमतत्त्व आहे त्याची उपासना करण्यासाठी ‘ॐ’ हाच शाश्वत संकेत  झाला. वाणीरूप, दृश्यरूप, नादरूप अशा अनंत रूपांनी तो प्रवाहित झाला. परम सद्गुरूतत्त्व जे आहे ते या सृष्टीला व्यापून सृष्टीपलीकडेही आहे. ‘जेव्हा प्रकाशही नव्हता आणि अंधारही नव्हता,’ तेव्हापासून जे तत्त्व विद्यमान आहे, असं वेद सांगतात ते हेच सद्गुरूतत्त्व आहे. त्यामुळे या ॐकारातला कणन् कणदेखील त्या सद्गुरू तत्त्वानं व्याप्त आहेच. (पुढील भाग सोमवारी १७ सप्टेंबरला.)

चैतन्य प्रेम