मागे जे घडून गेलं त्याची आठवण ठेवायची नाही, ते विसरायचं म्हणजे नेमकं काय विसरायचं? आपल्या जीवनातल्या कोणत्या गोष्टी आपल्या स्मरणात जास्त असतात? तर ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, ज्यांनी आपल्या मनावर आघात केला, ज्यांनी अपेक्षाभंग केला, त्या गोष्टीच आपल्या स्मरणात बहुतांश असतात. हे आघात बरेचदा आसक्तीमुळेच झाले असतात. अमुकच व्हावं, अमुक होऊ नये, यासाठीचा आपला जो दुराग्रह असतो तोच याला कारणीभूत असतो. मग काळ पुढे जातो, पण मन त्या गोष्टी विसरू इच्छित नाही. बरेचदा दु:ख कुरवाळत बसून जगणंही माणसाला आवडू लागतं. तर त्या आघातांना, अपेक्षाभंगांना विसरायचं आहे. बरं काही, आघात हे खरे वास्तविक आघातच असतात, पण ते आघातही बरंच काही शिकवून जातात, मनाला अधिक कणखर बनण्याची संधी देतात, आपल्या जडणघडणीला चालना देतात आणि आपल्याला समृद्ध करतात. ज्या गोष्टींनी आपण एकेकाळी कोलमडून गेलो होतो, उन्मळून पडल्यागत झालो होतो, कालांतरानं त्या गोष्टींचं मोल आणि जीवनातलं स्थान कळतं. मग जे दु:खाचं होतं, तेच योग्य होतं, त्या दु:खानंच आपल्याला खूप काही शिकवलं, ही जाणीव होते. श्रीनिसर्गदत्त महाराजही म्हणत की, ‘‘सुख आपल्याला झोपवतं आणि दु:खं जागवतं!’’ थोडक्यात आसक्तीला अनुकूल जेव्हा काही घडतं तेव्हा जो सुखाभास होतो तो आपल्याला मोह आणि भ्रमात झोपवतच असतो. आपल्या जाणिवा तो निद्रिस्त करतो. दु:खं मात्र त्या मोहनिद्रेतून खडबडून जागं करतं. तेव्हा अशा दु:खाची आठवण जरूर ठेवावी. पण मनाला सतत निराशेच्या, नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलणाऱ्या गतस्मृतींमध्ये रमणं थांबवा, असंच महाराज सुचवत आहेत. मग, ”मागे होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण ठेवू नकोस,’’ या पाठोपाठ ते सांगतात की, ‘‘भविष्यात काय होईल याची कल्पना करू नकोस.’’ म्हणजे काय? तर या कल्पनेचे सुखमय आणि दु:खमय असे दोन भाग आहेत. म्हणजे पुढे काय होईल, याची चिंता हळूहळू पुढे वाईटच होईल, या धारणेत रूपांतरित होते आणि भयगंड बळावतो. त्याचबरोबर पुढे कसं कसं छान छान घडेल, याचं स्वप्नरंजनही वरकरणी सकारात्मक भासलं, तरी अखेर ते भ्रामक कल्पनांत गुंतवणारं ठरतं. महाराज सांगतात की, ‘‘मनुष्य आपल्याला अपार संपत्ती मिळाल्यावरची परिस्थिती, पत्नी-मुलं, आप्त-मित्र यांनी अत्यंत प्रेम केल्यानंतरची परिस्थिती इत्यादी अनेक परिस्थितीची कल्पना करीत, त्या प्राप्त झाल्या की आपल्याला विशेष मान-सन्मान मिळालेली परिस्थिती, इत्यादी अनेक परिस्थितींची कल्पना करीत त्या प्राप्त झाल्या की आपण सुखी होऊ, असे समजतो.’’ म्हणजे माणूस पुढे वाईटच घडेल, संकटंच येतील, अपमानाचं जिणंच वाटय़ाला येईल, अशा कल्पनांतच रमतो असं नव्हे, तर पुढे मी खूप श्रीमंत होईन, मग मला लोकांकडून मानसन्मान मिळेल, लोक माझ्याभोवती गोळा होतील, माझा प्रत्येक शब्द झेलतील, अशा कल्पनांतही रमू शकतो. त्यातून अंतरंगातली वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा म्हणजेच पैशाचं प्रेम, पत्नी आणि कामनांचं प्रेम तसंच लोकांकडून स्तुती व्हावी, या इच्छेचं प्रेम अधिक पक्व होत असतं. तेव्हा सुखकल्पनांत रमणं असो की दु:खकल्पनांत खचणं असो; या दोन्हीत ‘आज’चं म्हणजेच चालू क्षणाचं विस्मरण असतं, अनवधान असतं.