जे घडून गेलं त्याच्या आठवणींमध्ये कैद व्हायचं नाही. पुढे काय घडेल, याच्या कल्पनाचित्रांतही अडकायचं नाही. त्याचबरोबर परिस्थिती जशी आहे तशी प्रथम स्वीकारायची आहे. थोडक्यात परिस्थितीला धीरानं सामोरं जायचं आहे. परिस्थितीनं घाबरून, गांगरून गेलो, तर त्या परिस्थितीचा पेच सोडविण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास, मानसिक आणि बौद्धिक तयारी ्नराहणार नाही. याचबरोबर आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळी किंवा अधिक चांगली परिस्थिती असली, तर मी सुखी होईन, अशीही माणसाची कल्पना असते. तसंच अगदी छोटय़ा छोटय़ा इच्छाही प्रसवत राहतात आणि गुंतवत राहतात. गणपतराव महाराज सांगतात त्याप्रमाणे, ‘‘आज घरी अमुक एक मित्र येणार आहे. तो नक्की येऊदे.. ’’ इथपासून ते वाटेत अमका भेटू दे, अमकं काम पूर्ण झाल्याचं कळू दे, अशा अनेक इच्छा आपल्या मनात क्षणोक्षणी डोकावत असतात. त्या इच्छांपाठोपाठ त्यांच्या पूर्ततेची प्रतीक्षा करण्यातही मन गुंतून जातं. इच्छांच्या पूर्तीचं हे वाट पाहणं म्हणजे वेळ आणि क्षमता वाया घालवणंच असतं. ते घडेपर्यंत मनाला चैन पडत नाही. ते घडलं नाही, तर मनाची जी तगमग होते, त्यानं जी अशांती उत्पन्न होते त्यानं मनाची एकाग्रता लयाला जाते. याचबरोबर अगदी लहान-सहान गोष्टींचं वाईट वाटून घेण्याची सवयही आपल्याला जडली असते. म्हणजे महाराज सांगतात त्याप्रमाणे शर्टवर डाग पडला, हातातून वस्तू अचानक खाली पडून फुटली, तर चुटपूट लागते. बेफिकीर वा बेपर्वा राहू नये, पण अशा लहानसहान गोष्टींचं वाईट वाटून घेता कामा नये. आणखी एक गोष्ट महाराज सांगतात ती ‘विशेषाची आवड सोडणं’! म्हणजे काय? तर विशेष स्थानाला जायची ओढ मनात बाळगू नकोस. महाराज सांगतात, ‘‘रम्य ठिकाणी जावे, डोंगर-दऱ्या, नदीकाठी वास्तव्य करावे, अशी अपेक्षा का करतोस? असह्य़ नरक किंवा दिव्य नंदनवन तुझ्या मनोवृत्तीतच आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. आहे त्या जागेतच परमानंदाचा अनुभव घे. विनाकारण दोलायमान होऊ नकोस.’’ याचबरोबर स्थलविशेषत्वाचाही प्रभाव मनावर असता कामा नये, असं महाराज सांगतात. ते म्हणतात, ‘‘शेतामध्ये अमुक एका झाडाखाली, एकांतात अमुक एका खोलीत, आपल्या घरात, प्रवासामध्ये, प्रतीक्षालयात किंवा मुंबईसारख्या शहरात तुला कसलाही वेगळेपणा वाटू नये. तू परमानंदरूप आहेस, म्हटल्यावर तुला सर्व ठिकाणी एकसारखा आनंदाचा अनुभव यायला हवा ना? तुला एका ठिकाणी सुखी राहता आल्यानंतर इतर ठिकाणीही त्याच सुखरूपतेने का राहता येऊ नये?’’ म्हणजे अध्यात्म साधनेसाठी विशिष्ट ठिकाणी जायची इच्छा मनात निर्माण होते. त्या इच्छेचं ओढीत रूपांतर होतं. मग निसर्गसौंदर्यानं नटलेल्या परिसरात वास्तव्य साधलं, तर साधना चांगली होईल, दिव्य होईल, असं मन मानू लागतं. अशा मनाला महाराज सांगतात की, भीषण नरक म्हणजे नकारात्मक स्थिती आणि दिव्य नंदनवन म्हणजे आत्मतृप्त स्थिती शेवटी मनातच आणि मनावरच अवलंबून आहे. नकारात्मक विचारांच्या खाईत कोसळलेलं मनच नरकयातना भोगतं आणि उदात्त विचारांच्या धारेत बुडालेलं मन दिव्यत्व भोगतं. तेव्हा जिथे आहोत तिथे सतत परमानंदाच्या धारणेत राहता आलं पाहिजे. जर अंतरंगातून खऱ्या अर्थानं पूर्ण सुखी असू, तर बाह्य़ जगात सर्वत्र त्या पूर्ण सुखाचाच अनुभव येत राहील. मग अमुक एका स्थानाचा हट्ट उरणार नाही.

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com