अहंकारामुळेच कलह उत्पन्न होतात, अहंकारामुळेच परिनदा, द्वेष, मत्सर बळावतात. अहंकारामुळेच माणूस अनेकदा इतरांचं सुख हिरावतोच, पण स्वतही सुखाला पारखा होतो. कन्नूर येथे होऊन गेलेले साक्षात्कारी सत्पुरुष गणपतराव महाराज सांगतात की, ‘अहंकाराने प्रपंच चांगला होत नाही. परमार्थ बुडतो. यश, कीर्ती, प्रताप सर्व काही उडून जातात! अहंकाराने मत्री मोडते, विकल्प निर्माण होतो. वैराग्य आक्रसते आणि मुख्यत्वे आत्मानुभव येत नाही!’ मुळात प्रपंच हा अहं-ममतेनंच माखलेला असतो. त्यात आपला अहंकार जपण्याचाच प्रयत्न जो-तो कमी-अधिक प्रमाणात करीत असतो. त्यामुळे प्रपंच कधी ‘सुखा’चा वाटतो, कधी ‘दु:खा’चा वाटतो. कधी ‘अनुकूल’ भासतो, कधी ‘प्रतिकूल’ भासतो. कधी मनाजोगता होतो, कधी मनाविरुद्ध वाटतो. जितका अहंकार जास्त तितका संघर्ष जास्त. जितका संघर्ष जास्त, तितकं मानसिक अस्थर्य जास्त. त्यामुळे, अहंकाराने प्रपंच चांगला होत नाही, हा आपला अनुभव असतो. तरीही अहंकार सोडवत नाही! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, कळतं पण वळत नाही हेच अज्ञान. तर अहंकारानं सुख मिळत नाही आणि टिकत नाही, हे कळतं, तरीही तो सोडवत नाही. यश मिळालं, पण अहंकार त्या यशानं तीव्र होत गेला, तर काही काळानं माणूस समाजात असूनही एकाकी होतो. मग कीर्तीही खालावते, प्रतापही ओसरतो. हे झालं सगळं प्रपंचाचं. परमार्थात तर ‘मी’चा लय अनिवार्य आहे. ‘मी’ म्हणजे देहबुद्धी जोपासणारा स्वार्थ आणि ‘तू’ म्हणजे आत्मबुद्धी जोपासणारा परमार्थ. तेव्हा परमार्थात ‘मी’पणा जोपासणारा अहंकार चालणार नाही, यात शंकाच नाही. या अहंकारानं विकल्प निर्माण होतो आणि वैराग्य आक्रसते. अध्यात्माच्या वाटचालीत विकल्प अर्थात वितर्क हा अडसर असतो. वितर्कानं कुतर्क निर्माण होतो आणि कुतर्कानं संशय वाढून वाटचाल अडखळते. मन जेव्हा अशुद्ध स्वार्थबुद्धीनं व्याप्त असतं तेव्हा विशुद्ध आत्मानुभव कसा येणार? तेव्हा परमार्थ मार्गावर वाटचाल करताना अहंकार असा घात करतो. या अहंकाराचं बोट घट्ट धरूनच आपण आत्मसाक्षात्काराची इच्छा बाळगत असतो. श्रीगणपतराव महाराज सांगतात, ‘आपण काय करतो तर जीवभाव ठेवून एक एक दुर्गुण सोडण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला विरोध, शासन करून ते घाणेरडे गुण नाहीसे करावेत म्हणून साधन करू लागतो. पण आपल्यातच राहणारा त्याचा दुसरा सहकारी त्याला परत बोलावून आणतो.’ म्हणजे आपण रागावर नियंत्रण आणू पाहतो, तो घालवू पाहतो. मग काही वेळा राग यावा, असे प्रसंग घडूनही आपण ‘शांत’ राहतो आणि मग आपल्यालाही वाटतं की, आपल्यातला राग आता गेला आहे. आपण रागावर विजय मिळवला आहे. तर आपण राग या दुर्गुणाला घालवल्याचं मानतो खरं, पण लोभाचा त्याग करीत नाही. त्यामुळे होत काय की, काही काळानं हा लोभच राग या आपल्या जिवलग साथीदाराला परत घेऊन येतो आणि आपल्या अंतकरणात पुन्हा विराजमान करतो! तेव्हा साधकानं आपल्या आंतरिक स्थितीचा सदोदित अभ्यास करीत राहिलं पाहिजे. निव्वळ बाह्य साधनांनी साधत नाही. अहंकार कायम राखून कितीही बाह्य साधनं म्हणजेच जप, पूजा-अर्चा, भजन करीत राहिलो तरी त्यानं आंतरिक पालट होणार नाही. महाराज सांगतात, ‘साधकाला पूजा, भजन, सेवा इत्यादी भक्तीकार्ये करायलाच हवीत; असे असले तरी त्या क्रिया आंतरिक साधनेला पुष्टी देण्यासाठीच आहेत हे लक्षात ठेवून त्याने प्रामुख्याने आंतरिक साधना करत त्याला पूरक म्हणून बाह्यकम्रेही आचरायला हवीत.’