बा साधने कशासाठी असतात? आपण साधन करतो, त्याचा हेतू काय असतो? तर आंतरिक पालट, हाच सर्व साधनांचा एकमेव उद्देश असतो. अंतरंगात पालट करायचा म्हणजे तरी नेमकं काय करायचं? तर जी देहबुद्धी आहे, जीवभाव आहे, अहंकार आहे त्यात पालट करायचा आहे. अर्थात देहबुद्धीची आत्मबुद्धी करायची आहे. म्हणजेच देहभावात सदैव स्थित असलेली आपली बुद्धी, आपली विचार क्षमता, आपली भावना, धारणा, कल्पनाशक्ती या साऱ्या आत्मबुद्धीत स्थित होऊ द्यायच्या आहेत. त्यांचा केंद्रिबदू ‘मी’ नव्हे, तर परम तत्त्व झाला पाहिजे. जो संकुचित जीवभाव आहे तो आत्मभाव होऊ द्यायचा आहे. जो अहं आहे त्याचं त्वममध्ये परिवर्तन होऊ द्यायचं आहे. आता इथं ‘होऊ द्यायच्या,’ म्हटलं आहे. म्हणजेच ती स्वाभाविक सहज प्रक्रिया आहे! या चराचरातील प्रत्येक जीवमात्र अपूर्ण भासत असला, तरी त्याची वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू आहे. त्या गतीत अपूर्ण जेव्हा स्वतचं अपूर्णत्व आणि अस्तित्व टिकवू पाहत असतो तेव्हाच अडथळे येतात. ती गती मंदावते. सद्गुरू त्या अपूर्णाच्या अंतकरणात पूर्णत्वाची ओढ जागृत करतात आणि गतीला वेग देऊन ती प्रक्रिया पूर्णत्वास नेतात. तर जे स्वाभाविक आहे त्यात जीवस्वभाव आड येत असतो. त्या जिवाभावाचा पाया अहंकार आहे.  कन्नूरचे सत्पुरुष गणपतराव महाराजही सांगतात की. ‘साधनेने परिपूर्णता कुठून मिळवायची नाही. आपण पूर्णच आहोत, हे जाणून घ्यायचं आहे!’ मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे होतं उलटंच! आपण पूर्णत्व मिळविण्याची इच्छा दाखवीत साधना करीत असतो आणि प्रत्यक्षात त्या साधनेनं अपूर्णताच पोसत असतो, जोपासत आणि वाढवत असतो! अर्थात आपल्या पूर्णत्वाच्या आड येणाऱ्या अहंकाराचीच जपणूक व्हावी, तो अहंकार भौतिकातील ज्या ज्या गोष्टींवर अवलंबून आहे, तग धरून आहे, असं आपल्याला वाटतं, त्या त्या गोष्टी मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठीच साधना करण्याची वृत्ती बनली असते. त्या अपूर्णासाठीच बहुतांश साधना खर्च होत असते. तेव्हा साधनानं अहंकार वाढता कामा नये. जे जे बा साधन आहे, त्यानं अंतकरणात काही पालट झालाच पाहिजे. बाहेरून कितीही साधना केली, पण मनच जर त्यात ओवलेलं नसेल, तर काय उपयोग?  तर साधना अंतकरणातील अहंकार कमी होत होत पूर्ण लयाला जावा, यासाठी आहे. ती प्रक्रिया होत आहे की नाही, याकडे आपलं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. गणपतराव महाराज सांगतात, ‘तुम्ही अध्यात्मपर होण्याचा अभ्यास करा. सदैव आपल्या स्वरूपस्थितीचे अवलोकन करत विवेकाच्या साहाय्याने दिवसेंदिवस सुखी होत जाणे हेच अध्यात्म!’ किती सूक्ष्म सांगितलं आहे पाहा! ‘तुम्ही अध्यात्मपर व्हायचा अभ्यास करा!’ आपण अगदी बेलाशक मानतो की आपण अध्यात्माच्या मार्गावर आहोत, पण आपण ‘अध्यात्मपर’ असतो का हो? अध्यात्मपर म्हणजे ज्याच्या जीवनातली प्रत्येक कृती ही आध्यात्मिक अवधानानं होत आहे! म्हणजेच मी जसं वागत आहे, मी जो विचार करीत आहे, मी जी स्वप्नं रचत आहे, ते सारं अध्यात्माला अनुकूल आहे का, हा विचार सदोदित जपणे आणि त्यानुसार कृतीत, उक्तीत आणि विचारात बदल करणे! आणि हा अभ्यास आहे आणि तो सदैव करायचा आहे, असं महाराज स्पष्ट सांगतात. मग अध्यात्मपर व्हायचं म्हणजे काय, हे कळण्यासाठी ‘अध्यात्म’ म्हणजे काय, हेही कळलं पाहिजे ना? म्हणून अध्यात्म शब्दाची मार्मिक व्याख्या करतात, ‘सदैव आपल्या स्वरूपस्थितीचे अवलोकन करत विवेकाच्या साहाय्याने दिवसेंदिवस सुखी होत जाणे हेच अध्यात्म!’