आपण अध्यात्माच्या मार्गावर चालत होत, असं नुसतं मानून उपयोग नाही. गणपतराव महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण अध्यात्मपर होण्याचा अभ्यास करीत राहिलं पाहिजे! म्हणजेच आपली उक्ती, कृती अर्थात विचार, उच्चार आणि आचार यांचं सदोदित निरीक्षण-परीक्षण करीत त्यात अध्यात्मानुकूल सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. महाराज सांगतात, ‘सदैव आपल्या स्वरूपस्थितीचे अवलोकन करत विवेकाच्या साहाय्याने दिवसेंदिवस सुखी होत जाणे हेच अध्यात्म!’ तेव्हा असं सदोदितचं निरीक्षण-परीक्षण करीत गेलो, तरच आपलं ध्येय आणि आपलं वागणं, यातील विसंगती लक्षात येतील. अनवधानानं ज्या चुका होत, त्या अशा अवधानानं कमी होत जातील. अवधान आलं की, अविचारीपणा, आततायीपणाला लगाम बसेल. मग तेवढय़ानंही वाटय़ाला येणारं किती तरी दुख कमी होईल आणि दिवसेंदिवस खरं सुख लाभत जाईल. ते अवधान जगण्याबाबत आणि जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीबाबत आलं पाहिजे. गणपतराव महाराज सांगतात की, ‘साधकामध्ये मुख्यत्वे अभ्यासू वृत्ती असावी. गप्पा मारणे, अन्य विषयांचे वाचन यात कसा तरी वेळ घालविणारा तो साधकच नव्हे! साधकामध्ये प्रामुख्याने सर्व काही बाजूला सारून साधना करण्याकडेच प्रवृत्ती असावयास हवी.’ आता हे ‘सर्व काही बाजूला सारणं,’ म्हणजे काय? म्हणजे केवळ साधना करीत राहायची आणि जगण्यात वाटय़ाला येणारी सर्व र्कम धुडकावून द्यायची का? तर नव्हे. हे जे बाजूला सारणं आहे, ते मनानंच आहे. महाराज सांगतात, ‘कर्तव्यासाठी कर्तव्य या अलिप्त भावनेनं काम केलं तर समाधान भंगत नाही.’ अर्थात, कर्तव्य करायला विरोध नाही. पण कर्तव्यापलीकडे मन जेव्हा कर्मात अन्य ‘मी’केंद्रित हेतूंनी अडकू लागते तेव्हा ती कर्मच बाधक होऊ लागतात. तेव्हा हे मोहजन्य अडकणं जे आहे ते प्रामुख्यानं बाजूला सारून साधन करण्याकडेच प्रवृत्ती असली पाहिजे. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे, आपण अध्यात्मपर जगत आहोत का, याचं अखंड निरीक्षण- परीक्षण करीत जाणं हेच प्रारंभिक साधन आहे. तेव्हा खरा ओढा या आंतरिक परीक्षणाकडे हवा. ते भान गमावून फुटकळ गप्पांमध्ये, निर्थक विषयांवर बोलत बसण्यात वेळ घालविणे, जे अशाश्वत आहे त्याच्यावर मोहासक्तीनं चर्चा करीत राहणे आणि निर्थक अवांतर वाचन करण्यात वेळ घालविणे, हे साधकासाठी तरी निषेधार्ह आहे. याचं कारण, आयुष्य खरं कशासाठी जगायचं आहे, हे कळल्यावर आपल्याकडे किती बेभरवशाचा वेळ आहे, किती कमी वेळ आहे, हे ही उमगतच. मग ते उमगूनही ज्याचा वेळ निर्थक गोष्टींत सरतो, तो साधकच नव्हे, असं महाराजांना सांगायचं आहे. इतकंच नव्हे, रोजची कामं करीत असतानाही त्यात सहज मिळणारा वेळ अभ्यासाकडे वळविता येतो, असं गणपतराव महाराजांनी सांगितलं होतं. म्हणजे समजा आपण रस्त्यानं चालत आहोत किंवा बसने प्रवास करीत आहोत किंवा दवाखान्यात नाव नोंदवून डॉक्टर केव्हा केबिनमध्ये बोलावतात, याची वाट पाहत बसलो आहोत, तेव्हा आपल्याकडे करण्यासारखं खरं तर काहीच नसतं. तरी तो वेळ निर्थक कल्पनांबरोबर वाहून जातो. मग त्या वेळातही आत्मपरीक्षण आणि सद्गुरूबोधाच्या मननानं आत्मबोध करीत तो वेळ सत्कारणी लावणं शक्य असतं. तेव्हा साधकानं वेळ निर्थक तर घालवू नयेच, पण जो वेळ अन्य कामांत सरत असतो तोही जमेल तितका सत्कारणी लावावा, असंच महाराजांना सुचवायचं आहे.

– चैतन्य प्रेम