अध्यात्मानं खरं काय साधायचं आहे, अध्यात्म खरं कशासाठी आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. एकाची आमराई होती. आंब्याच्या फळांनी झाडं लगडलेली असत. ती आमराई पाहायला पाहुणा आला. सगळी आमराई त्यानं फिरून पाहिली. आंब्यानं लगडलेली झाडं पाहिली. खाली पडून वाळलेले, खराब झालेले आंबेही पाहिले. त्याला वाटलं, आमराईचा मालक आपल्याला आंबे खाऊ घालेल. पण तसं लक्षण दिसेना. अखेर त्यानं विचारलंच की, एवढय़ा या आमराईचं करता काय? तो म्हणाला, ‘‘झाडंच तर आहेत नुसती. पण पहा ना, सावली किती छान असते त्यांची. या झाडांच्या सावलीत फार आनंद वाटतो. गारवाही छान असतो.’’ मग पाहुण्यानं विचारलं, ‘‘या झाडांचा बाकी काहीच उपयोग नाही?’’ मालक म्हणाला, ‘‘नाही!’’ जमिनीवर पडलेल्या उपेक्षित आंब्यांकडे पाहात पाहुण्यानं  आश्चर्यानं विचारलं, ‘‘आणि एवढे आंबे येतात, ते खाता की नाही?’’ मालक म्हणाला, ‘‘फळ येतात खरी, पण कशी असतात कोण जाणे! हिरवी असताना खावीत की पिवळी-केशरी झाली की खावीत, तेही कळत नाही. मुळात खावीत की नाही, हेच माहीत नाही. आणि तशीही झाडावरही किती छान दिसतात नुसती! कशाला तोडा आणि खा!!’’ तर अशी गत आहे का? अध्यात्मानं थोडय़ा वेळाची सावली मिळवायची आहे की पूर्णफळ प्राप्त करून घ्यायचं आहे, हेच कळत नाही. आमराईचा मालक आहे जीव. म्हणजे तो आनंदस्वरूप आहे. पण तरीही थोडय़ाशा सावलीतच तो आनंद शोधतो आणि मानतो आहे. पूर्ण निर्भय, निश्चिंत, नि:शंक करणाऱ्या अध्यात्माच्या वाटेवर असूनही तो भय, चिंता आणि संशयाच्या पकडीतच सुख शोधण्याची धडपड करत आहे. त्या धडपडीलाच तो साधना मानत आहे! मोहासक्तीचे निखारे छातीशी घट्ट धरून तोडक्यामोडक्या ‘साधने’नं हृदय शांतीनं भरून जाईल, असं तो मानत असतो. मग त्याला वाटतं, इतकं साधन केलं, तरी अजून काहीच का साधत नाही? पण साधना नुसती बाहेरून करीत राहून आंतरिक पालट होईल का? साधनेचं बाह्य़रूप छान भासतं, तेवढंच पार पाडायचं आहे का? देवांच्या मूर्ती सुंदर वस्त्रालंकारांनी सजवल्या, फुलांची आरास आकर्षक केली, त्यापुढची रांगोळी, दिव्यांची रांगही नेत्रदीपक होती, पण त्या साऱ्याचा मनावर काहीच संस्कार झाला नाही. दृष्टीसुख तेवढं मिळालं, पण अंतर्दृष्टी लाभली नाही, मन स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलंच नाही, तर काय उपयोग? मग अशा वेळी बाह्य़ देखाव्यातच अडकणाऱ्या, त्या देखाव्यालाच अध्यात्म मानणाऱ्या आणि यापेक्षा अधिक काही आपल्याला करण्यासारखं नाही, असं मानणाऱ्या मनाला भानावर आणण्यासाठी कठोर बोधाचे फटकारेही आवश्यक असतात! दगडातून शिल्प घडवताना छिन्नीनं कधी नाजूक आघात केले जातात, तर कधी आघात जोराचे असतात. तरीही त्यांचा हेतू दगडातून देखणं शिल्प साकारावं, हाच असतो. त्यामुळे ते तीव्र आघातही आवश्यकच असतात. मी दगडासारखा दगडच राहीन, माझ्यावर छिन्नीनं आघात न करताच माझं उत्तम शिल्पात रूपांतर करा, असं दगडानं म्हटलं तर काय उपयोग? तेव्हा बोधाच्या छिन्नीनं अंतर्मनातली आसक्ती छिन्न होत नाही, मोह-रति नष्ट होत नाही, तोवर जीवरूपी पत्थरातून खरी शिवमूर्तीही साकार होत नाही! तात्पर्य? वरून कठोर, पण आतून प्रेमार्त अशा बोधाकडे आता वळत आहोत!