समाज ज्या ज्या गोष्टींना पाप मानतो, त्यात गिरीशचंद्र आकंठ बुडाले होते. त्या अवस्थेत ते रामकृष्णांच्या सहवासात आले होते. त्या सहवासानं त्यांच्यात किती आमूलाग्र परिवर्तन घडलं, ते त्यांच्या चरित्रातून मुळातच वाचलं पाहिजे. मात्र इथं एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. गिरीशचंद्र ज्या दिवशी झिंगत असतानाही रामकृष्णांकडे गेले होते आणि रामकृष्ण त्यांच्या अंतर्मनीची प्रेमओढ जाणून भावप्रविष्ट झाले होते त्याचे गिरीशचंद्रांना अप्रूप वाटले होते. त्यानंतर ते जे म्हणाले की, ‘‘आता मला पापाचं भय राहिलं नाही. कारण ते मला दूर लोटणार नाहीत, ही खात्री झाली,’’ त्याबद्दल काहींच्या मनात शंका येईल की, याचा अर्थ सद्गुरू आधारावर पाप करायची मुभा आहे का? तर गिरीशांच्या म्हणण्याचा रोख वेगळा आहे. आपल्याकडून बेसुमार पापर्कम झाली असूनही ती रामकृष्णांच्या भेटीच्या आड आली नाहीत, याचाही गिरीशचंद्रांना विस्मय वाटला. ती पापर्कम भेटीच्या आड आली नाहीतच, पण त्यांच्या प्रेमाच्या आडही आली नाहीत! पाप खरं स्थूलापेक्षा सूक्ष्मातच अधिक असतं. म्हणजे प्रत्यक्ष देहानं पापकर्म जेवढं घडत नाही त्यापेक्षा कैकपटीनं मनाकडून पापर्कम अधिक घडत असतात! अनीतीला आपण पापकर्माचं लेबल लावलं आहे आणि त्या नीती-अनीतीच्या कल्पना लैंगिकतेशीही जखडल्या आहेत. पण अहंकारापायी दुसऱ्याचं मन दुखावणं,   दुसऱ्याला शब्दानं दुखावणं हे वाचिक, मानसिक पाप कायिक पापकर्माइतकंच किंवा काकणभर जास्तच मोठं असतं, हे लक्षात येत नाही. परनिंदा हेदेखील पापच आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही. सर्व पापांमध्ये प्रमुख पाप आहे, शाश्वताचं विस्मरण! ते पाप कधी सुटतं का हो? क्षणोक्षणी जीव अशाश्वतातच गुंतत असतो. देहओढीनुसार घडणाऱ्या पापकर्माना एकवेळ काळाची मर्यादा असते, पण या विस्मरणाच्या पापाला काही मर्यादा आहे? तेव्हा आपण दिवस-रात्र पापरत असतोच आणि आपल्या मनाची ही घडण सत्पुरुषाच्या सहवासात बदलू लागते. एकदा श्रीगोंदवलेकर महाराज भेटीस आलेल्या काहीजणांबरोबर बोलत होते. तेवढय़ात त्यांच्या एका शिष्याचा लहान मुलगा शौच करून तसाच घरात आला होता आणि आपल्याला धुण्यासाठी आईला हाका मारत होता. महाराज लगेच पुढे झाले आणि त्यांनी त्याची घाण धुवून टाकली. तेवढय़ात तो शिष्य धावतच आला आणि अतिशय संकोचून म्हणाला, ‘‘महाराज, तुम्ही कशाला ही घाण धुतलीत? तुम्हाला त्रास झाला. मी धुतली असती ना?’’ त्यावर महाराज म्हणाले, ‘‘अहो तुम्हा लोकांची वासनेची घाण यापेक्षा जास्त असते. ती धुवावीच लागते ना?’’ तेव्हा कुणी पापी आहे, म्हणून खरा सद्गुरू जो असतो तो त्याला दूर लोटत नाही. अशा सद्गुरूच्या सहवासात राहीलं आणि त्या सहवासाचं स्मरण जर

दृढ होत गेलं, तर मनात सतत असलेलं पाप-इच्छेचं स्मरण टिकेल का? त्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या पापीपणाचं ओझं बाळगण्यापेक्षा मनानं पापमुक्त नसूनही खऱ्या शुद्ध सत्संगात जो टिकतो त्याच्या मनातल्या विचारांचा प्रवाह हा शुद्ध होत जातोच, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेवटी पापाइतकंच पुण्यही घातकच असतं कारण पाप नरकात, तर पुण्य स्वर्गात अडकवतं. सद्गुरू त्याही पलीकडे शाश्वतात स्थिर असतो!  त्यामुळे तो शिष्याला जसा पापातून सोडवतो तसाच पुण्याच्या अहंकारातूनही सोडवतो आणि शाश्वत विचारात स्थिर करतो!

चैतन्य प्रेम