काही शब्द आपण सहज वापरतो. ‘साधक बाधक’ हा असाच एक शब्दसमूह. म्हणजे, ‘कोणताही निर्णय घेण्यापूर्वी साधक-बाधक विचार केला पाहिजे,’ असं आपण म्हणतो. इथं ‘साधक बाधक’ म्हणजे साधणाऱ्या आणि न साध्य होणाऱ्या, अशा गोष्टींचा विचार करून निर्णय घेणं, अपेक्षित असतं. आपण ‘साधक-बाधक’ म्हणत आहोत ते साधकाला काय काय बाधक ठरू शकतं, या अर्थानं! पू. बाबा बेलसरे यांनी साधकाला त्या दृष्टीनं विपुल मार्गदर्शन केलं आहे. साधकाच्या आड काय येतं, हे ते एका शब्दात सांगतात. साधकाच्या आड येतं ते ‘अज्ञान’! पण गंमत अशी की जो खराखुरा अज्ञानी आहे, त्याला आपल्या अज्ञानाचं ज्ञान तरी कुठून होणार? या अज्ञानानं काय काय घडतं? पू. बाबा सांगतात की, ‘‘अज्ञानातून अहंकार जन्म पावतो आणि त्याच्या पायी जीव अविवेकाने वागतो. म्हणून संतांच्या सहवासात किंवा सत्शास्त्राच्या चिंतनात विवेक बळकट करून आपल्या ‘अहं’ला भगवंताच्या चरणी लीन केले म्हणजे साधक तरतो!’’ आता आधीच म्हटल्याप्रमाणे आपल्या अज्ञानीपणाचं ज्ञान आपल्याला नसतं. त्यामुळे आपण स्वत:ला ज्ञानी मानूनच जगत असतो. म्हणजे मला कुणी काही सांगायची गरज नाही, मला सगळं माहीत आहे, या भावनेनं शेफारून आपण जगू लागतो. जेव्हा जे माहीत नसूनही ते माहीत असल्याचं आपण मानू लागतो तेव्हा खोटा अहंभावच पोसला जाऊ लागतो. त्या अहंभावातून अविवेक जागा होतो. म्हणजे कुठे काय बोलावं, काय बोलू नये,  कसं वागावं, कसं वागू नये, याचं तारतम्य संपतं. मनात येईल तसं वागणं-बोलणं सुरू होतं. तेव्हा आधी आपण अज्ञानी आहोत, हे समजण्यासाठी तरी जो खरा ज्ञानी आहे त्याच्याच सहवासात रहावं लागतं. त्या सहवासातून अनेक संस्कार आपसूक चित्तावर होत असतात. जर खऱ्या सत्पुरुषाचा असा प्रत्यक्ष सहवास अप्राप्य असेल, तर मग सत्शास्त्राचा आधार घ्यायला पू. बाबा सांगतात. म्हणजेच धार्मिक प्रवृत्तीचे ग्रंथ, आध्यात्मिक ग्रंथ आणि आपल्या सद्गुरूचा बोध ग्रथित केलेला ग्रंथ असेल, तर तो ग्रंथ; हे सारे सत्शास्त्र ग्रंथच झाले. त्या ग्रंथांची नुसती उच्चारी पारायणं करू नयेत, तर त्यांत परायण व्हावं. अशा सहवासानं किंवा ग्रंथांच्याही सहवासानं मनातला अविवेक जाणवू लागतो आणि मग तो दूर करण्याचा प्रयत्न सुरू होतो. अविवेक दूर होत विवेक जागृत झाला की तो बळकट करायला सांगितलं आहे. म्हणजेच प्रसंग येताच आधी योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव झाली की त्या शुद्ध जाणिवेला अनुसरून जे योग्य आहे ते आचरणात आणण्याचा मन:पूर्वक अभ्यास करावा. त्यात कधी यश येईल कधी अपयश. पण अभ्यास सोडायचा नाही, असा निर्धार ठेवावा. मग आपल्या ‘अहं’ला भगवंताच्या चरणी लीन करायला सांगितलं आहे. हे या घडीला निश्चितच कठीण आहे. पण हे ध्येय आहे, एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे. अहंला भगवंताच्या चरणी लीन करणं म्हणजे काय? तर आपला सर्व संकुचितपणा व्यापकपणात विसर्जित करणं! आता हे साधण्यासाठी आपल्याला वाटेल की साधक म्हणून नेमकं काय केलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे? नेमकं स्मरण कशाचं साधलं पाहिजे आणि विस्मरण कशाचं साधलं पाहिजे? थोडक्यात साधनेत साधक असं काय आहे आणि बाधक असं काय आहे? आणि जे बाधक आहे ते कसं सोडावं?

चैतन्य प्रेम

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
vandana gupte shares her experience to working with madhuri dixit
वंदना गुप्तेंनी माधुरी दीक्षितसमोर ठेवलेली ‘ही’ अट; किस्सा सांगत म्हणाल्या, “ती खूप घरंदाज, संसार सांभाळून…”