जो खरा सत्संग असतो, त्या सत्सहवासात साधनेचं आणि अध्यात्म मार्गाचं महत्त्व कळू लागतं. जगायचं नेमकं कसं आणि कशासाठी, हे उकलू लागतं. मूल्यनिश्चिती होते आणि चित्तावर भावसंस्कारही होऊ लागतात. याचा प्रत्यय देणारे अनेकानेक प्रसंग अनेक सत्पुरुषांच्या चरित्रात आहेत. मग मास्तर महाशयांवर श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या प्रथम दर्शनानं झालेले संस्कार असोत की हरिदास बसु यांच्यावर जटियाबाबा ऊर्फ विजयकुमार गोस्वामी यांच्या सहवासात झालेला पालट असो, ई. दर्यालाल कपूर यांच्या जीवनावर राधास्वामी सत्संगात सद्गुरूंच्या सहवासानं आलेली अंतर्मुखता असो.. अनेकानेक चरित्रांतून हेच जाणवतं की कोणतंही पूर्वनियोजन नसताना जीव अवचित असा एखाद्या सत्पुरुषाच्या संपर्कात येतो आणि नंतर त्या सहवासातील माधुर्य, प्रेम आणि निष्कपट तळमळीचा अमीट असा ठसा त्याच्या चित्तावर उमटल्याशिवाय राहात नाही. जो संतसत्पुरुषांच्या सहवासात राहतो त्याला साधनाचा अनायास लाभ कसा होतो, हे पू. बाबा यांनीही सांगितलं आहे. त्यांनी पाच प्रमुख लाभ सांगितले आहेत. ते असे : १) संतांच्या तोंडून भक्ताच्या आणि भगवंताच्या कथा वारंवार ऐकल्याने साधकाचे मन त्यांच्यातच आवडीने रमून जाते. २) अध्यात्माचे अखंड श्रवण घडून आपोआपच त्याचे मनन होऊ लागते आणि त्यातून विरक्ती उदय पावते. ३) संताच्या नि:स्वार्थी प्रेमाने माणूस पूर्णपणे वश होतो आणि त्या संताच्या सेवेमध्ये आपले आयुष्य घालवतो. ४) संतापासून मिळालेल्या मंत्रावर दृढ श्रद्धा ठेवून माणूस त्याचा जप करण्यात रंगून जातो आणि हळुहळू देहबुद्धी विसरतो, किंवा ५) सत्संगाच्या प्रभावाने मनातील विकार क्षीण  होत जातात आणि माणसाला शरणागत होण्याची तळमळ लागते. ज्याला संतसत्पुरुषाचा दीर्घ सहवास लाभतो, त्याच्यात कसा सहज पालट होत जातो आणि त्याची उपासनाही कशी नकळत अनायास होते, हे पू. बाबा यांनी इथं सांगितलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जो खरा सत्पुरुष आहे त्याच्याकडे सदोदित भगवद्चर्चा आणि  भगवद्गुणसंकीर्तनच सुरू असतं. म्हणजे काय? सदोदित भगवंताच्याच कथा कानावर पडत असतात, असंच नव्हे, पण जी चर्चा आहे ती शाश्वताला सोडून नसते! म्हणजेच दुनियादारीच्या गप्पांमध्येही भगवत्प्रेमाची सम वेळोवेळी गाठली जातेच. भौतिकातला किंवा प्रपंचातला कोणताही विषय कुणी काढला वा कुणी उगाळू लागले की मोठय़ा प्रेमानं सद्गुरू त्या विषयापासून सोडवतात! त्या विषयातलाच एखादा मुद्दा असा पकडतात आणि मग चर्चेला वळण लावून पुन्हा साधकाला त्याच्या मुख्य उपासनामार्गावरच आणतात. त्याच्या ध्येयाचं स्मरण करून देत राहतात. बरं, प्रथम आपण त्यांच्या सहवासात आलो, तरी भगवंताच्या कथांचं जे प्रेम त्यांना आहे, ते आपल्याला नसतं! म्हणजे सदोदित भगवत्प्रेमानं कुणी भारला जाऊन त्यातच कुणी प्रगाढ भावनेनं बुडून जाऊ शकतो, हे आपल्या आकलनातही नसतं. त्यामुळे सुरुवातीला त्या कथा किंवा ती भगवद्चर्चा नाइलाज म्हणून ऐकली जाते! पण मग नित्याच्या जीवनसंघर्षांत त्या कथांमधलंच एखादं वाक्य अवचित आठवतं आणि मनाचा ठावच घेतं. ज्या जीवनाला आपण वास्तविक मानतो त्या जीवनासमोर, ज्या जीवनाला आपण काल्पनिक मानतो त्या जीवनाचा आरसा धरला जातो. आपल्या जगण्यातल्या संघर्षांचा, दु:खाचा, त्रासाचा फेरविचार सुरू होतो.

चैतन्य प्रेम