आपल्या अंतरंगात अतिशय सुप्तपणे असलेले दोष काढून दुसऱ्याचे गुण कसे अंगी बाणवायचे, याची जी प्रत्यक्ष शिकवण श्रीगोंदवलेकर महाराज यांनी पू. बाबांच्या निमित्तानं दिली, ती आपण जाणून घेत आहोत. जालन्याला पू. बाबांना महाराजांनी पाच दिवस प्रवचने करण्यास सांगितले आणि अखेरच्या दिवशी नानाचार्य या सद्गुरूमय झालेल्या श्रेष्ठ भक्ताला प्रवचन करू देण्यास सांगितले. नानाचार्याचा शास्त्री म्हणून आणि प्रवचनकार म्हणूनही लौकिक होताच. महाराजांच्या सांगण्यावरून पू. बाबांनी पाच दिवस आपण काय काय बोललो आणि आज काय बोलण्याचा आपला मानस होता, ते सांगितलं. नानाचार्यानी सर्व ऐकून घेतलं, पण प्रत्यक्ष प्रवचनात बाबांनी जे सांगितलं त्या मुद्दय़ांना त्यांनी स्पर्शही केला नाही. त्यामुळे पू. बाबांच्या मनात जी खळबळ उत्पन्न झाली तिला महाराजांनी रात्रीच्या संवादात वाट मोकळी करून दिली. मग महाराज त्यांना जे म्हणाले ते साधकासाठी फार महत्त्वाचं आहे. केवळ महाराज आणि आपल्यात झालेला संवाद पू. बाबांनी उघड केला, यात त्यांच्या मनाचा मोठेपणा, सरळपणा तर दिसतोच, पण साधकाला त्याचा लाभ व्हावा, ही खरी कळकळही दिसते. तर महाराज म्हणाले, ‘‘‘‘केशवराव तुम्ही विद्वान आहात आणि तेही महाविद्वान आहेत. पण मी एक सांगू का? तुम्हाला परमार्थ समजलाय आणि त्यांना उमजलाय! त्यांना जो परमार्थ उमजलाय त्याच्याकडे बघावं आणि तो आपल्याला केव्हा उमजेल, यासाठी सतत रामरायाला प्रार्थना करावी! नानाचार्याना परमार्थ उमजला आहे. त्यांची दिनचर्या बघा, त्यांची उपासना बघा, याला उमजणं म्हणतात. आणि परमार्थ जेव्हा उमजतो तेव्हा पुढे वाटचाल होते. नुसत्या विद्वत्तेच्या भरारीवर काही होऊ शकत नाही. पहा उमजणं तितकंच जरूरीचं आहे आणि उमजणं म्हणजे काय, हे नुसतं सांगून कळत नसतं. प्रत्यक्ष देहात ती व्यक्ती तुम्हाला दाखवावी याकरिता हा प्रपंच केला. तेव्हा नानाचार्यासारखे यापुढे तुम्ही परमार्थ उमजून घ्यावा आणि तसं वागावं!’’ आता हे ‘समजणं’ आणि ‘उमजणं’ यात नेमका फरक काय? बाबांनीच तो सांगितलाय. परमार्थ नुसता माहित असणं, सांगता येणं पण आचरणात न येणं म्हणजे तो समजणं! आणि तो करून कळून आचरणात येणं म्हणजे उमजणं!! तर उमजण्यात परमार्थ हा शाब्दिक राहात नाही. तो नित्याचा अनुभव होतो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर प्रेमकथा वाचून कल्पनेनं प्रेम समजणं वेगळं आणि प्रेम काय हे माहीत नसताना, प्रेमात पडल्यावर प्रेम होणं अनुभवणं हे वेगळं! तसं भगवंतावरचं प्रेम हा अनुभवाचा विषय झाला पाहिजे. कित्येकदा आपण वरकरणी अतिशय साध्या भासणाऱ्या साधकांच्या संपर्कात येतो, पण आपल्याच आढय़तेमुळे त्यांचं खरं मोठेपण आपल्या लक्षातही येत नाही. स्वत:ला अगदी सामान्य मानणारे, आपल्याकडून सद्गुरूची भक्ती काही होत नाही, नव्हे आपली कोणतीही योग्यता नसताना सद्गुरूंनी आपल्याला जवळ केलं आहे, अशी शुद्ध भावना असलेले साधक दूर एकांतात साधनामग्न असतात. त्यांच्याकडून शुद्ध भावनेच्या संस्कारांची श्रीमंती सहज लाभू शकते, पण आपणच विकल्प आणि अहंमग्नतेमुळे हा लाभ गमावतो. तेव्हा माझ्यासारखी साधना कुणीच करीत नाही, या भावनेनं सात्त्विक अहंकाराचा लोंढा मनात शिरू देण्याआधीच आपल्या समजापलीकडे पाहिलं पाहिजे. मग काही उमजण्याची शक्यताही प्रकाशमान होईल!

– चैतन्य प्रेम