जो खरा सत्पुरुष असतो त्याचीच बुद्धी शुद्ध, स्वतंत्र आणि निरपेक्ष असते. त्याला परहिताची खरी कळकळ असते. त्यामुळेच तो दुसऱ्याचा भ्रम पोसायला मदत करीत नाही. तो जसा प्रेमळ असतो, तितकाच दुसऱ्याचा भ्रम तोडण्यासाठी प्रसंगी अत्यंत कठोरही होतो. तेव्हा अशाच्या बोधानुसार जीवन जगू लागणं म्हणजे परावलंबी होणं नव्हे. उलट खऱ्या स्वातंत्र्याकडे वाटचाल करू लागणंच आहे. कारण आपण आपल्या मोहासक्त बुद्धीनुसार जे निर्णय करतो आणि त्यानुसार जी कृती करतो ती अखेरीस आपलं अहितच साधणारी असते. त्यामुळे आपली बुद्धी, मन, चित्त शुद्ध होण्याची प्रक्रिया ही वास्तविक निर्णयानुसार वास्तविक कृती करण्यापासूनच सुरू होत असते. सत्पुरुषाच्या सहवासात आल्यावर माणसाला प्रथमच नि:स्वार्थी प्रेम म्हणजे काय असतं, याचा अनुभव येऊ लागतो. याचं कारण जगात त्याच्यावर इतरजण जे प्रेम करतात किंवा तोदेखील इतरांवर जे प्रेम करतो ते स्वार्थप्रेरितच असतं. याला अपवाद असू शकतो, पण तरीही माणसाचं नि:स्वार्थी राहणं टिकत नाही आणि अत्यंत सूक्ष्म आणि सुप्त असलेला स्वार्थ कधी उफाळून येईल, ते सांगता येत नाही. खऱ्या सत्पुरुषाच्या प्रेमात मात्र तसूभरही स्वार्थ नसतो आणि म्हणूनच त्या प्रेमाच्या प्रभावात माणसातल्या शुद्ध भावना जागृत होतात आणि विकसित होऊ लागतात. त्या सहवासात दुरावा येऊ नये, असं माणसाला वाटू लागतं. सत्पुरुषाच्या प्रेमाला माणूस कसा वश होतो, हे अनेकानेक लीलाचरित्रांत ग्रथित आहेच. श्रीगुळवणी महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आठवतो. बरेचदा संध्याकाळी महाराज फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडत. त्यावेळी उपस्थितांमधील काहीजणांनाही त्यांच्यासोबत जाण्याचा लाभ घेता येत असे. एकदा अशीच दुपार टळून गेली आणि संध्याकाळ जवळ येऊन ठेपत असताना महाराज बाहेर जाण्यासाठी म्हणून निघाले. मग कुणी त्यांची काठी आणून दिली, कुणी टोपी आणली. ज्यांना बरोबर जायचं होतं तेही लगबगीनं तयारी करू लागले. तोच जिन्यात कसला तरी गलका झाला. काही क्षणांतच काही साधकांनी एका मुलाला बळानं धरून महाराजांच्या पुढय़ात आणलं. म्हणाले, ‘‘महाराज गेले काही दिवस चपला चोरीला जात होत्या, तो चोर हाच. आज त्याला चपला चोरताना पकडलंय.’’ मुलाच्या कपडय़ांवरून त्याच्या घरची गरीबी डोकावत होती. सगळेचजण त्याच्याकडे घृणेनं पाहात असतानाच महाराज मात्र त्याला प्रेमानं म्हणाले, ‘‘अशा चपला चोरू नयेत बाळ. तुला चपलाच हव्यात ना? मग थांब..’’  असं म्हणून महाराजांनी एका शिष्याला बोलावलं त्याच्या हाती काही पैसे ठेवले आणि म्हणाले, ‘‘याला घेऊन बाजारात जा आणि चांगल्या चपला घेऊन द्या.’’ दुसऱ्या दिवशी तो मुलगा दर्शनाला आला आणि कुणाशी काही न बोलता दर्शन घेऊन निघून गेला. मग तो अधेमधे येऊ लागला आणि नंतर तर एका मोठय़ा कार्यक्रमात सेवेकरी म्हणूनही आला. बाबा जे म्हणतात की, ‘‘संतांच्या सहवासात जो येतो तो त्यांच्या नि:स्वार्थी प्रेमाला वश होतो आणि त्यांच्या सेवेत आयुष्य घालवतो.’’ त्याचा प्रत्यय इथं येतो. जो चपलाचोर होता, तो महाराजांच्या चरणांपाशी असा सहजतेनं आला आणि त्यांच्या चरणसेवेत सहभागीही झाला! आता सेवा म्हणजे सेवन! त्यांच्या बोधाचं सेवन करून घेऊन त्यानुसार आपलं आयुष्य घडवणं, हीच खरी सेवा आहे आणि त्या सेवेत आयुष्यही सार्थकी लागतं!