News Flash

१३०. चोर!

लोखंडी पेटीचं कुलूपही त्यानं शिताफीनं तोडलं आणि नोटांची गड्डी त्यानं उचलली,

स्वातंत्र्याआधीच्या कालखंडातली गोष्ट आहे. पंजाबात गंगू नावाचा एक अट्टल दरोडेखोर होता. त्याच्या निर्दयतेच्याही अनेक कहाण्या प्रसिद्ध होत्या.  एकदा तो दारूच्या नशेत धुत्त होऊन रस्त्यावरच बसून होता. तेव्हा राधास्वामी पंथाचे सदगुरू सावनसिंहजी ऊर्फ हुजूर महाराज हे अमृतसरला सत्संगासाठी निघाले होते. अचानक गाडीसमोर आलेल्या मद्यधुंद तरुणाला पाहाताच चालकानं घाबरून गाडी थांबवली. हुजूर महाराज गाडीतून उतरले. आपल्या हातांनी त्यांनी त्याला उठवलं खरं, पण तो लडखडत्या पावलांनी पुन्हा खालीच कोसळला. अखेर काही भक्तांनी त्याला रस्त्याच्या कडेला नेलं आणि मग गाडी जाऊ लागली. त्या अवस्थेतल्या क्षणभराच्या दर्शनानंही गंगू मुग्ध झाला होता. हुजूरांची कारुण्यमयी दृष्टी आणि सहजप्रेम याचा ठसा तेवढय़ाशा सहवासातही त्याच्या मनावर उमटला होता.  गंगूनं शेजारच्या माणसांना विचारलं की तो कोण होता? उत्तर मिळालं. ‘हा राधास्वमी पंथाचा प्रभु आहे! लोकांना नरकापासून वाचवतो.’ संध्याकाळी दर्शनार्थीच्या रांगेत गंगू होता. तो जेव्हा हुजूरांपाशी आला तेव्हा त्याच्या अंतकरणात आर्तभाव उचंबळून आला. हुजूर महाराजांचे पाय घट्ट धरून तो रडतच म्हणाला,‘तू प्रभू आहेस, मला वाचव.’ महाराज हसून म्हणाले,‘छे! मी एक सामान्य माणूस आहे!’ तरीही त्यानं पाय सोडले नाहीत आणि वारंवार आळवू लागला की, ‘माझा उद्धार करा!’ संध्याकाळी हुजूरांनी मोजक्या लोकांना नामदीक्षा दिली त्यात गंगूही होता. तत्पूर्वी हुजूरांनी त्याला विचारलं की, ‘तुझं उदरनिर्वाहाचं साधन काय?’ त्यानं उत्तर दिलं,‘चोरी आणि दरोडा!’ हुजूर म्हणाले,‘हे तुला सोडावं लागेल. दुसरं काहीतरी काम करावं लागेल.’ त्यानंही होकार भरत तसा शब्द दिला. आपणही सदगुरूंना त्यांच्या बोधानुरूप वागू, असा शब्द देतो. तरीही जुन्या सवयींनुसार त्या बोधाच्या विपरीत वागतोही! मग गंगूचंही तसंच का होणार नाही? आपल्याजवळची सर्व पुंजी त्यानं गरीब आप्ताला देऊन टाकली. एके रात्री मग तो एका सावकाराच्या वाडय़ात चोरीच्या इराद्यानं घुसला. लोखंडी पेटीचं कुलूपही त्यानं शिताफीनं तोडलं आणि नोटांची गड्डी त्यानं उचलली, तोच पेटीचं अवजड झाकण आपोआप खाली आलं आणि त्याचे दोन्ही हात अडकले! आता अंगातलं त्राणच गेलं होतं आणि पळून जाण्याची आशाही उरली नव्हती. तोच त्याला दिसलं की हुजूर महाराज पुढे उभे आहेत. ते म्हणाले, ‘तू करार केला होतास की चोरी कधी करणार नाहीस!’ गंगूनं क्षमा मागितली. महाराजांनी त्याचे हात सोडवत त्याला ती संपत्ती तशीच ठेवून निघून जायला सांगितलं. त्यानंतर त्यानं कधी चोरीचा विचारही मनात आणला नाही. तत्त्वाशी विपरीत वर्तन हीसुद्धा चोरीच आहे आणि अशा ‘चोरी’तून सद्गुरूच सोडवतात. आपणही शब्द देतो की, परत ही चूक करणार नाही! पण करतो. कारण गंगूसारखा एका अनुभवानं शहाणं होऊन दिल्या शब्दाला जागण्याचा ‘अडाणीपणा’ आपल्यात नसतो! गंगूच्या जीवनात सद्गुरू निष्ठेचे अनेक प्रसंग आले. १९४८मध्ये महाराजांनी देह ठेवल्यावर जगण्यातला अर्थच गेला, असं गंगूला वाटू लागलं. जंगजंग पछाडून ज्याला पकडणं साधलं नव्हतं तो गंगू पोलिसांना शरण आला. खटला चालला. त्यानं सर्व गुन्हे मान्य केले. त्याला फाशीची सजा झाली. फाशीच्या दिवशीही तो मोठय़ा आनंदात होता. फासावर जाताना त्यानं सांगितलं, ‘मनुष्यजन्म घेऊन त्याचा खरा लाभ घेतला नाही, हे एकच दुख माझ्यासोबत आहे. पण धन्य आहे माझ्या गुरूंची ज्यांनी माझ्यासारख्या पाप्यालाही स्वीकारले आणि तारले आहे!’

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 3:40 am

Web Title: loksatta chintan dhara part 130
Next Stories
1 १२९. सेवा-लाभ
2 १२८. आत्माभ्यास
3 १२७. संस्कारबीज
Just Now!
X